Wednesday, November 27, 2013

भुतं

त्‍या  क्षणांच्‍या गूढ जगामध्‍ये
कुठपर्यंत हरवत जाऊ मी?
तिथं गेल्‍यानंतर येण्‍याची परवानगी मिळत नाही
माझी मलाच...

आठवणींच्‍या प्रदेशात मुशाफिरी करता येते. अगदी खुशाल... मनसोक्‍तपणे...
मनाला विसावा लाभेल म्‍हणून तिथे येणं होतं. प्रत्‍यक्षात तो कधीच लाभत नाही. सगळंच फसवं असतं. त्‍या कुपीत कायमचं कैद झालेलं. कधी जबरदस्‍तीने, कधी नकळतपणे बाहेर ओढून आणतो आपण आणि चावी देतो त्‍याला. मग ते घडलं, पाहिलं, अनुभवलं, दिसलं त्याप्रमाणे चालत राहतं. आपल्‍या मनावर भूतकाळाच्‍या प्रक्षेप पडत राहतात. काळ्या-पांढ-या सावल्‍या दिसत राहतात. आपण स्‍वतःलाच भुल देत राहतो.

मनाच्‍या भिंतींवर भूतं नाचू लागल्‍यावर काळ सगळ्यांच्‍या दुःखाचा गाभण राहतो. त्‍याचे डोहाळे आपल्‍याला समजत नाहीत. समजते तर भोवती एवढं दुःख नसतं. त्‍यापेक्षा वर्तमानात राहिलेलं काय वाईट?

तिथं जाता येतं पण थांबता येत नाही. जगता येत नाही. जगायचंच झालं तर त्‍याची मोठी किंमत भरावी लागते. ती आपल्‍याला परवडण्‍याजोगी नसते. झालेले बदल स्‍वीकारावेच लागतात. त्‍यांना मान द्यावा लागतो. त्‍यांपासून अलिप्‍तही रहावं लागतं. उलटून गेलेला काळ मागे जाऊन बदलायचा प्रयत्‍न केला तर गुंतागुंतच अनुभवाला येते.

म्‍हणूनच वर्तमान बरा. जसा आहे तसा आहे. भविष्‍यकाळ तर त्‍याहूनही चांगला. त्‍याच्‍याकडून काही अपेक्षा तरी करता येतात...

Tuesday, November 5, 2013

गेले ऋतू...

उरल्‍या-लाभल्‍या क्षणांचे
मज दुःख वाटे की समाधान ते?
जरी नसे त्‍या क्षणा परतीची वाट
पण वाट होती ना हळूवार ती!

जरी मोहरला भूतगंध तो
तरी आवरावे तू तुझ्या मना
नको आठवू तू गेले ऋतू
थांबू नको, साचू नको

Thursday, October 3, 2013

उधाण

त्‍या उधाणल्‍या सागराकाठी
किती गलबते ती उभी?
म्‍हणे होऊ दे त्‍याला शांत
मग पाण्‍यामंजी घालू होडी

कैसा सागर तो वेडा
गलबतांची वाट पाह
रिक्‍त उधाण तो त्‍याचा
लोका का हो भय त्‍याचे?

एक होडी मग हळूच
उधाणल्‍या सागरासी भेटे
एका क्षणामाजी त्‍याचा
उधाण लोपलाहो कुठे?

Monday, September 30, 2013

बंध


कल्पिलेली भिती अस्तित्‍वात येण्‍याचं भय मोठं असतं
स्‍वतःला न कळेल एवढं मोठं
आपण किती घाबरलोय ते आपल्‍याही कळत नाही कधी कधी
मग आपल्‍याच हातांनी आपण कुंपण बांधत जातो
काटेरी...
आपल्‍याला बोचणारं... रक्‍तबंबाळ करणारं
पण कुंपण बोचलं तरी कुंपणापलिकडून सय येतेच!

आपण ती कुंपणं पार करायची नाहीत असं ठरवतो
आणि पलिकडून बंध आपल्‍या रोखाने चालून येतात
ते हवेसे असले तरीही आपण टाळतो त्‍यांना
'अरे कोण तुम्‍ही?' असा  सवाल करतो
ते हिरमुसतात... कोमेजतात...
पुन्‍हा अंगावर चालून येतात

त्यांचा आवेग कुंपणांच्‍या तारा तोडत जातो
आपल्‍याला ते कळत नसतं
आपण ढळायचं नाही असं मानून गुपचूप ढळत असतो
आपल्‍याला तेही कळत नसतं
आपल्‍याला काहीच कळत नसतं

आपलं कुंपणांच्‍या आडून बंधांशी हितगुज सुरू होतं
आपण पुन्‍हा मोकळे होतो
मागे वळलो तर कुंपणं दूर राहिलेली दिसतात
आपण पुढे आलेलो असतो
खूप पुढे...

मग रोखून धरलेल्‍या श्‍वासांना निःश्‍वांसांची साथ मिळते
त्‍यांच्‍यावर हुंदक्‍यांची फुलं उमलू लागतात
वसंत फुलत असतो
निर्मळ झरे वाहू लागतात...

Thursday, August 22, 2013

कड्या

नको शोधूस तू पुन्‍हा
लोपलेले हितगुज
तू ठोठावशी ते बंद दरवाजे
ज्‍यांना कड्या घातल्‍यास तूच

Wednesday, August 21, 2013

धुंद होते शब्‍द सारे

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना
सई ये रमुनी सा-या जगात रिक्‍त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे...

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना

मेघ दाटूनी गंध लहरूनी बरसला मल्‍हार हा
चांद राती भाव गुंतुनी बहरला  निशीगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा,

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना

चित्रपट - उत्‍तरायण
गीतकार - कौस्‍तुभ सावरकर
गायक - रविंद्र साठे, रविन्‍द्र बिजूर, बेला शेंडे
संगीत - अमरत्‍य राऊत

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या - See more at: http://manik-moti.blogspot.in/2011/04/blog-post.html#sthash.MzEdvBwK.dpuf
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या - See more at: http://manik-moti.blogspot.in/2011/04/blog-post.html#sthash.MzEdvBwK.dpuf

Tuesday, August 20, 2013

प्रवाह

गात्रं गेली थकून सारी
मज सावराया येशील का?
पाय डगमगता वाटेवरी
हा हात हाती घेशील का?

मी कोरडा भासे मला
सारे पाणवठे सुकले कसे?
फुंकण्‍या जीव या मनी
माझ्यात तू पाझरशील का?

हाती धरिला जो कुंचला
तू रंग त्याचा होशील का?
होवोनी चित्र मज वेडीयाचे
अवतीर्ण तू होशील का?

मी चुंबिल्या बासरीतूनी
मधुतान होवून उमटशील का?
सुरावटीच्‍या वृक्षापरी
मनअंगणी बहरशील का?

प्रातःकाली अलगदपणे
प्राजक्‍त येतो ओंजळीत या
त्‍या फुलांच्‍या गंधातूनी
आसमंत माझा व्‍यापशील का?

उमलून जाईल हे भावफूल
रात्रीच्‍या अंधःकारी कधी
तू ओलेती दवबिंदूपरी
मज एकदा स्‍पर्शशील का?

Monday, August 19, 2013

अंबराचा रंग

रंग उडाले आकाशी मी सांभाळल्‍या अंबराचे
शिंपल्‍यात जपलेला मोतीही न जाणे कुठे विरुन गेला?

ज्‍या झाडासाठी आणला होता मी पाऊस ओंजळीतून
मोहर त्‍याचा न जाणे अवचित कसा जळून गेला?

विस्तवांनी शिलगावलेली वाट साधी, सोपी, सरळ भासे
सुखाच्छादित वाटेवरचं होरपळणं ते टाळू कसं?

पण आता त्‍या विस्‍तवांचीही झालीय सवय मला
त्‍यांच्‍या नसण्‍यानेच कदाचित होरपळत जाईन मी

मज सुखातली बधीरता नकोशी का भासते?
अन् विरहातली समीपताही सुखाऊन का जावी बरे?

त्या अंबराचे रंग हरवलेत कि बदललेत?
का झालेत ते कुठतरी कैद? कायमचे…

कुणालाही बदलता येणार नाहीत असे…
अगदी सूर्यास्तालाही नाहीत!

हेच खरं असावं बहुधा…

Sunday, August 18, 2013

दावण

शांत निज तू गं राणी
नको आणू डोळा पाणी
तुझ्यासाठीच बांधिली
दावण ही मी माझ्या मनी

Tuesday, August 13, 2013

रान हे उठले उठले

रान हे उठले उठले मुक्‍त आभाळ झाले
तिच्‍या नुसत्‍या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्‍य फुलोरा त्‍याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्‍या पल्‍याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्‍त हा गोजिरा गेली सई मोहरुन

जाऊ चालत जाऊ निःशब्‍द याच देखण्‍या वाटेवरुनी
ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्‍या फुलाफुलातूनी
जीवनातूनी येई बहर असा, जीवनातूनीअशी लहर फुले
बंध हे रेशमी ऐसे किती दिसांचे दिसांचे
कुणी तोडता तुटेना तुझ्या नी माझ्या संगतीचे

रान हे उठले उठले मुक्‍त आभाळ झाले
तिच्‍या नुसत्‍या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्‍य फुलोरा त्‍याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्‍या पल्‍याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्‍त हा गोजिरा गेली सई मोहरुन

चित्रपट - उत्‍तरायण
गीतकार - कौस्‍तुभ सावरकर
गायक - रविंद्र साठे

Monday, August 12, 2013

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

Friday, August 9, 2013

ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी

- ग्रेस

Thursday, August 8, 2013

प्रज्‍वलित

स्‍वनिर्मित पाशाच्‍या तिमिरास भेदूनी
पुन्‍हा होतोय प्रज्‍वलित मी
वेचीन-वाटीन कण सुखाचे
जरी प्रगल्‍भ दुःखाचा मी धनी!

Wednesday, August 7, 2013

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)

Tuesday, August 6, 2013

मर्म

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!

…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये

- ग्रेस
(चंद्रमाधवीचे प्रदेश)

Monday, August 5, 2013

मोर

इथं माझ्या निर्णयांची, कर्तृत्‍वाची वाहवा होतेय
माझं केवळ असणंही केवढं मौल्‍यवान वाटतंय त्‍यांना
त्‍यांच्‍याकडून पावलोपावली मिळणारा मान
आतून सुखावून जातो मला
... पण आता तेही शिळं झालंय
प्‍लास्टिकमध्‍ये बंद असलेल्‍या खाण्‍यासारखं

बुटातल्‍या पायांची तगमग होताना
मी तिसाव्‍या मजल्‍याच्‍या खिडकीतून बाहेर पाहत असतो
वा-याचा झोत माझ्या दिशेने झेपावतो
मी त्‍याला कवेत घेण्‍यासाठी बाहू पसरतो
आणि वारा काचेवरूनच परतून जातो
... माझं कोरडंपण आणखीनच कोरडं होत जातं

कधीकाळी हातांना लागलेले रंग
आता कुठच्‍या कुठे उडून गेलेत
त्‍या रंगांनी चितारलेल्‍या रेघोट्या
अस्‍पष्‍ट झाल्‍यात आता
स्‍पष्‍ट दिसतात ते केवळ कागदांवरचे आकडे
आणि आरशात दिसणारं एक बुजगावणं
...भवतीच्‍या रंगात बेरंग झालेलं

पाण्‍यात सोडलेल्‍या होड्या
कधीच्‍या दूर निघून गेल्‍यात
त्‍यामागे धावणारी इवलीशी पावलं
थिजली आहेत किना-यावर
दूरवर जाणा-या त्‍या होड्या पाहात...

आतलं मोरपिस धुळीनं माखून गेलंय
भिती वाटतेय, त्‍याला वाळवी तर लागली नसेल ना?
कधीतरी आठवण येते त्‍याची आणि थोडी धूळ झटकतो मी
मग दिसतं त्‍याच्‍या पंखांवरचं सुकलेलं पाणी
ते ओघळ पोखरुन टाकतात मला
मी माझ्या निष्क्रियतेच्‍या शरशय्येवर हळूच निजतो
मनातलं मोरपिस माझ्यात कणाकणानं रुतत जातं
मी मनातल्या मनात वणवणत राहतो 
पंख हरवल्‍या मोरासारखा...

Sunday, August 4, 2013

सोस

मनातलं गुज सांगावं तरी कुणाला?
पण अंतरीची तगमग बाहेर मांडावी तरी कशाला?
जर स्‍वतःपुरतं ठेवणं जमत नसेल
तर या भावनांचे सोस हवेत तरी कशाला?

Saturday, August 3, 2013

पाऊस आला

उत्‍तररात्रीचा पाऊस आला
सुगंध मातीचा कोमल आला

फांद्यांनी मिटले हिरवे डोळे
जांभळा डोंगर झोपेत न्‍हाला

झेलून सरींची ओलेती मिठी
वा-याच्‍या मनाचा झोपोळा झाला

कौलारांवरती अदृश्‍य परी
थेंबांच्‍या फुलांचा घेऊन झेला

मेघांची पालखी आभाळी झुले
पाऊसराजाचा सन्‍मान झाला

सरींनी घातली स्‍वप्‍नांना मिठी
पाऊस आला रे, पाऊस आला

- मंगेश पाडगावकर

Friday, August 2, 2013

अजून काही

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या ?
सणाणती बंडखोर वारे अजून काही

थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका–
‘अजून गा रे.. ‘अजून गा रे .. अजून काही..’

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही!

विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही

- सुरेश भट

Thursday, August 1, 2013

शोध

तुझ्याकडून येणा-या प्रत्‍येक वा-यात
स्‍वतःला शोधणं असतं
सापडलं की हरकून जाणं असतं
नाही सापडलं तर खट्टू होणं असतं

Wednesday, July 31, 2013

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली।

- भाऊसाहेब पाटणकर

Tuesday, July 30, 2013

किती?

प्रश्‍नांचं निवडुंग उगवावं ते किती?
काट्यांची अधीरता रुतावी ती किती?
किती वेळा छाटावं त्‍या मुजोर रोपांना?
पुन्‍हा फुटणारे कोंब उपटावेत तरी किती?

निसटून गेलेल्‍या क्षणांमागे धावावं तरी किती?
त्‍या क्षणांचे स्‍वतःला दोष द्यावेत तरी किती?
पाडव्‍यात तरी किती भेगा त्‍या जीवाला?
त्‍या भेगांचे भोग आता भोगावेत तरी किती?

आपुलीच दैना आपण पाहावी तरी किती?
उसने हसू मागून आणावे तरी किती?
आपल्‍याच पाठीवर किती फेरावा हात तो?
त्‍या गदगदल्‍या हातापासून डोळे लपवावेत तरी किती?

जन्‍मोजन्‍मीचे हे दुरावे साहावेत तरी किती?
निष्‍पर्ण कोरड्या सरी झेलाव्‍यात त्‍या किती?
या अनवाणी पावलांनी हुंदके का दाबले?
दबल्‍या हुंदक्‍यांचे काटे आता बोचावेत तरी किती?

Monday, July 29, 2013

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळ्या कळ्यांनाही
आसवांचा येतो वास

- आरती प्रभू

Sunday, July 28, 2013

वाट

आली आली पहा सर
अशी धावून धावून
माझं अवघडलंपण
गेलं वाहून वाहून

फुलं उमलली पहा
सांदी कोप-यामधून
त्‍यांचा गंध तो पसरे
अंगप्रत्‍यंगामधून

वादळाच्‍या सा-या छाया
गेल्‍या दूर त्‍या निघून
माझा आसमंत सारा
गेला मोकळा होऊन

चिंब भिजल्‍या तनाला
साथ भिजल्‍या मनाची
हितगुज करी मन
अंतरीच्‍या त्‍या घनाशी

घन निनादतो थोडा
त्‍याचाही निचरा होऊ दे
कधीतरी माझं रोप
समाधानानं न्‍हाऊ दे

नाही बोलावलं त्‍याला
तरीही धावून तो येतो
माझ्या अंतरीचं गुज
हळूच समजून घेतो

ओलसर त्‍या सरींनी
थबथबलेली वाट
अनवाणी मी चालतो
पुढे दिसेल का ती पहाट?

Saturday, July 27, 2013

एवढे दे पांडुरंगा

माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे!

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा!

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी!

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामया हाती बनावे
हे जिणे गोपाळकाला!

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे!

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात माझ्या
मी मला वाटून द्यावे!

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा!
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा!

- सुरेश भट
(रंग माझा वेगळा)

Friday, July 26, 2013

शिदोरी

रंगल्‍या आकाशाची छाया
पडे मनावरी माझ्या
भावगंध तो दाटला
त्‍याच्‍या काठी विसावून

चांद डोईवर त्‍याच्‍या
सखे शेजारी तू माझ्या
माझी भरती का तो पाहे
अनिमिष नेत्रांनी

मंदावला तो वारा
की मंदावला हा श्‍वास?
तुझ्या येण्‍याची ती आस
कधी मिटेल का गं सये?

ऊनपावसाचा खेळ
रंगे माझीया मनात
स्‍वस्‍थ-अस्‍वस्‍थतेचा भार
मी क्षणाक्षणा वाहे

मी ऐकी आठवांना तुझ्या
तू पुसशी माझ्या आठवांना
हे क्षण सोबतीचे तुझ्या
सखे आठवणी उद्याच्‍या माझ्या...

Thursday, July 25, 2013

Let it be!

I read somewhere...
The most painful goodbyes are the ones
that are never said and never explained...
So let it be...

I always said,
"Our goodbye should not be unspoken!"
But it happened!
So let it be...

I waited so long to tell you something
From the first day I felt your need
But I was too late & you were gone
So just let it be...

I spent every second just like ages
Only to tell you...
"I feel incomplete without you."
But nobody allowed me to say it
So let it be...

Buy yet I said so many things to you
Sometimes in daydreams
Sometimes between the line
But have you got that?
Leave it... Just let it be...

I am walking alone on that parallel road
Just hoping that you are walking on other side
& suddenly I relies you can't walk there...
So let it be...

Yes... I have many beautiful things
But yet Sometimes I feel,
I just missed the way of my life
May be that is LIFE!
So LET IT BE!

Wednesday, July 24, 2013

आळ

बांधल्‍या ओठांचा दोष नाही
थांबल्‍या शब्‍दांवर रोष नाही
ज्‍या वादळाशी झगडलो आकांताने
त्‍या ठिकाणी माझा अवशेष नाही

शब्‍दांचा थांग लागत नाही
या गझलेस अंत लाभत नाही
बरसणारा पाऊस ओतावा कुठे?
दुवा साधणारा पूल गवसत नाही

ओले काठ सोडवत नाही
भिजण्‍याचा मोह आवरत नाही
परतीची पावलं जड आहेत खरी
पण कृतघ्‍नतेचा आळ सोसवत नाही


Tuesday, July 23, 2013

निदान एका क्षणासाठी!

ए खिडकीतून दिसणा-या पावसा...
तुझ्या सरींची सरगम किती सुरेल आहे रे!
तुला माहितीय का तू संगीतकार आहेस ते?
पार वरच्‍या मजल्‍यावरुन तुला पाहताना ऐकू येणारा तुझा मंद नाद
चाळीतल्‍या घराघरांच्‍या छपरांवर निनादणा-या तुझ्या धारा
झोपड्यांच्‍या छतांतून गळणा-या थेंबांची खालच्‍या भांड्यात होणारी टपटप
शेंड्यावरच्‍या पानांवरुन खाली गळून पडलेल्‍या पानापर्यंत वाहताना
पानोपानी तुझा बदलत जाणारा स्‍वर...
नदीत, समुद्रात, तळ्यात, रानात, रस्‍त्‍यावरच्‍या खड्ड्यांमध्‍ये कोसळताना
प्रत्‍येकवेळी तुझ्यातून उमटणारी धून निराळी असते
तू प्रत्‍येक वेळी वेगळा ऐकू येतोस
मीही ऐकू येत असेन का रे असाच वेगळा?
माझ्यातूनही बरसावेत असे मंदमधुर नाद
स्‍वतःला चिंब भिजवून टाकता यावं मला
बरसण्‍याच्‍या आनंदात तू विसरत असशील ना स्‍वतःला!
मग मलाही बरसू दे!
निदान एका क्षणासाठी!

पूर्णविराम

त्‍या दोन वाक्‍यांच्‍या मध्‍यभागी पसरलेल्‍या
विस्‍तीर्ण, अफाट प्रदेशात
अस्‍वस्‍थतेच्‍या लाटा उठवत
ती भयाण शांतता नांदते...

आता समोर काय येऊन उभं राहिलं?
या विचाराचं ओझं घेऊन मी त्‍या प्रदेशातून चालू लागतो
मनःपटलावर अनेक भुतं नाचत असतात
मी एकेक भूत मानगुटीवर बसवून घेतो

ती शांतता भेदून मेटाकूटीला येतो मी
मला पैलतीर गाठायचाच असतो
तिथून बाहेर पडायचंच असतं
पुढचं वाक्‍य ऐकायचंच असतं
त्‍याशिवाय माझी मुक्‍तता नसते

अचानक डोळे उघडले माझे
मी त्‍या प्रदेशात एकटाच उभा होतो
तिथे ना शब्‍दांच्‍या सावल्‍या होत्‍या
ना विचारांची आवर्तनं होती
ना जुनी वादळं होती
ना पावलोपावली खोल विवरं होती

होता तो सपाट प्रदेश
आयुष्‍याच्‍या अंतापर्यंत पसरत गेलेला
अंतहीन आणि निरस
झाड करपून गेल्‍यासारखा

सगळं काही खूप कोरडं असं होतं
पार आतमध्‍ये भेगा पडायला लागल्‍या होत्‍या
वर्षानुवर्ष पाऊस न पडल्‍यासारखं
आतून येणारा शांततेचा आवाजही हरपला होता

... आणि माझ्या समोर एक खूप मोठा पूर्णविराम होता.

गुरूदक्षिणा

पावलापावलावर तू काहीतरी देत गेलास
अनुभवाच्‍या नावाखाली
नवी माणसं, नव्‍या घटना,
नव्‍या आशा, नव्‍या उमेदी,

कधी मला थकवलंस, कधी जोजवलंस
कधी कुरवाळलंस, कधी खडसावलंस,
त्‍या वाटांवर मी एकटा असताना
तू अदृश्‍यपणे होतास माझ्या सोबत

त्या वाटा कधी धुक्‍यात हरवल्‍या
कधी डोक्‍यावर वीजा कडाडल्‍या
तर कधी आत वणवा पेटला
आशेचा खांब डगमगताच तू धावलास...
... पाठीवर थाप देण्‍यासाठी

आणि समोरच्‍या वाटा नितळ होत गेल्‍या
रोमारोमाला पानं फुटली
चिंतीत मनानं कात टाकली
डोळ्यांच्‍या कोनातून माझ्यातला तू दिसू लागलास

मी शिकत गेलो की तू मला शिकवत गेलास?
मी घडत गेलो की तू मला घडवत गेलास?
तू नेमकं काय केलंस?
तू आहेस तरी कोण?

तू माळी आहेस का रे?
मग मला असं फुलासारखं सुंदर का वाटावं बरं?
का तू शिल्‍पकार आहेस?
मग मी घडवल्‍यासारखा का भासतो मला?

तुझे प्रयत्‍न समजतात मला
माझी आवरणं दूर करतोयस तू
एक दिवस तो अखेरचा कोष भेदून
मला फुलपाखरु व्‍हायचंय...
तिच तुझी गुरूदक्षिणा असेल...

Monday, July 22, 2013

प्रवास

निशेच्‍या गाभा-यात चंद्र मंदपणे तेवतोय
त्‍यातून पाझरणा-या चांदण्‍यानं
अंतरंग उजळून निघतंय...
रात्रीचं आणि माझं...

धुक्‍याच्‍या शालीसारखा चंद्रप्रकाश
आसमंतावर येऊन विसावलाय
चंद्राचं पाणी दिल्‍यासारखा
कणन् कण उजळलाय...

त्या भारलेल्‍या कणांतून प्रकट होते तुझी सावली
माझ्या पावलांना सोबत करत चालत येते ती पुढे
एकामागोमाग एक अशा सावल्‍यांची रांग लागते
मी उगाच तिष्‍ठत राहतो त्‍या रांगेत...

प्रत्‍येक सावलीचं मला येऊन बिलगणं होतं
आमचं हसणं होतं, रडणं होतं
समुद्रावर बसून बदलल्या वा-याचा आवाज ऐकत
एकमेकांत उतरणं होतं...

जुन्‍या सुकल्‍या तळांना खरवडत राहतो मी
पाण्‍याचा टिपूसही लागत नाही हाताला
जाणवत राहते डोहातली कोंदट हवा
माझ्यातच साचून राहिलेली...

ह्रदयाच्‍या देठापासून निघालेला कोंब
जमिनीत गाडून आता मुक्‍त होतोय
माझे बंध आता मलाच ठाऊक
आता स्‍वतःच्‍याच जाचातून मोकळा होतोय

तुझ्या सावलीच्‍या पदरात दान देऊन
मी पहाटेच्‍या उंब-यावर येऊन उभा आहे
ठरवलेली पहाट... ठरवलेली जागा...
ठरवलेला आनंद... ठरवलेला प्रवास...


Sunday, July 21, 2013

काहूर

घन झाकळती नभ
घंटा निनादते दूर
मला कळेना कशाचे
मनी दाटते काहूर...

अशा काहूरास नाही
रूपरेषा नावगाव
हिमकालातील धुके
नसे आशय ना भाव...

तरी करपते त्‍याने
माझ्या चेतनेचे पाख
नसे निवारा ना जाळ
तरी साचे मनी राख...

- कुसुमाग्रज

Saturday, July 20, 2013

मल्‍हार

पुन्‍हा एकदा सुरू जाहला लपंडाव तो शब्‍दांचा
तू सामोरी येशील तेव्‍हा असेल शुकशुकाट या ओठांचा

लपवून ठेवीन तुझ्यासाठी उमलणारी ती गीते
ओरखडे त्‍यांच्‍या तिक्ष्‍ण नख्‍यांचे उमटतील आता तिथे

हिरव्‍या रानात माझ्या कधीकाळी वसंत होता तो बहरला
कुणीही ना पेटवली आग तरीही प्राजक्‍त माझा करपला

हरवल्‍या चंद्राच्‍या नभीची अवसेची रात्र सरणार कधी?
आल्‍या पावली परत चालल्‍या मेघांच्‍या मनी बरसण्‍याची भीती

नाही कोपला तरी चालला भरल्‍या घटाचा मेघ तो दूर
बांध घालूनी कणाकणाला शोधतो तो हरवला सूर

हरपला सूर शोधता शोधता पुन्‍हा कानी मल्‍हार तो येतो
मेघ मल्‍हाराचा आता अखेरचा निरोप घेतो...

Friday, July 19, 2013

बहर

मंद चांदण्‍यात उभा
नभ मोकळे समोर
लाटा पुसती हळूच
उरी कोणता दगड?

धुंद वारा तो बोचतो
रात्र येते अंगावर
डोळा घन हा दाटला
दाटूनी आली सर

सरसर आल्या सरी
त्‍यांना सावरू मी कसा?
उंब-यावरी दाटे मेघ
त्‍याला आवरु मी कसा?

डोळा उघडता रोज
तुला पहावंस वाटे
मन गुंतवू गं कुठे
क्षणाक्षणा सय दाटे

कसं जाऊ वाटे तुला?
मज एकला सोडून
काही क्षणांचा तो डाव
रोज जाशी तू मोडून

माझ्या समींदराच्‍या काठी
वारा घुमतो तो कानी
येणाजाण्‍या-यास सांगे
मोडल्‍या डावाची ती कहाणी

कहाणी ती नाही साधी
त्‍यास फुटला अंकुर
तुझ्या आनंदाचं फुलं
उगवेल त्‍याच्‍यावर

फुलं तारकांची अशी
माळ तुझ्या तू केसात
हळूच पाहिन दूरून
दोन पावलांची साथ

छान रंगू दे तो विडा
सजू दे ते रान सारं
दवबिंदूलाही येवो
समाधानाचा बहर


Thursday, July 18, 2013

समुद्रावर

काल सहज समुद्रावर गेलो.

हवेत मुसळधार पावसानंतरचा गारवा जाणवत होता. तशीच शांतताही होती. समुद्राशेजारच्‍या बागेत जाऊन बसलो. गर्दी नव्‍हती. मला अगदी समुद्राच्‍या समोर असलेली जागा मिळाली. बसलो.

तो शांत नव्‍हता. पावसामुळे थोडी खळबळ चालली होती त्‍याची. चालायचीच. माझीही होते. माझ्याजवळ एक छान रागदारी आहे. ती सुरू केली. ऐकत बसलो. समोरून थंडगार वारा वाहत होता. कानावर त्याचाच आवाज येत होता. मी कसलाच विचार करत नव्‍हतो. मनावरचा लगाम सैल सोडला होता. त्‍याला खूप राबवल्‍यासारखं वाटत होतं. ते उधळलं खरं, पण त्‍यानेही माझी अवस्‍था समजून घेतली असावी. त्‍याने मला त्रास दिला नाही. काही उकरलं नाही, काही सूचवलं नाही, कसला हट्ट केला नाही. अगदी शहाण्‍या मुलासारखं ते खेळत राहिलं. आधी ते किना-यावर उतरलं. पाण्‍यात पाय बुडवून लाटांशी खेळलं. मग परतीच्‍या एका लाटेसोबत तेही निघून गेलं दूर. तिथे गार वा-यासोबत हेलकावे खात राहिलं. ते हसतं होतं. खूप दिवसांनी मी त्याला हसताना पाहत होतो. पण त्याच्‍या डोळ्यात कसली आतूरता होती कुणास ठाऊक? ते मला काही सांगत नव्‍हतं, पण मला समजल्‍याखेरीज राहिल का?

त्‍यानं आता बोलावण्‍याची वाट का पाहावी? एवढं छान रमलंय असं वाटत असताना त्‍याला हा पाश का नाही सोडवता यावा? समुद्राशी त्‍याच्‍या खूप गप्‍पा चालल्‍या होत्‍या. ते मोठमोठ्यानं हसत होतं, खेळत होतं. त्‍याचे ते प्रयत्‍न मला ओळखीचे आहेत. मीही दुर्लक्ष केलं. उगीच मला समजलंय हे त्‍याला कळायला नको! पण त्‍याला न समजता राहिल का?

मग काही काळासाठी ते अलिप्‍त होऊन गेलं. एवढं की माझ्याकडे परतायचंय याचंही भान त्‍याला राहिलं नाही. पण त्‍याला त्‍यात आनंद लाभत होता. तो माझ्यापर्यंत पोचत होता. सगळ्या भावना दूर ठेवल्‍या आणि खूप बरं वाटू लागलं त्‍याला. अगदी शांत. स्‍तब्‍ध झालेल्‍या ओल्या रानासारखं. पानही हलत नव्‍हतं. फक्‍त शांततेचा आवाज. आयुष्‍य अचानक विस्‍तारत गेल्‍यासारखं वाटलं. समोरचा तो समुद्र पाहून ते अतिव समाधानानं भरून आलं.

मी त्‍याला पाठमोरा पाहत होतो. मला क्षणभर असं वाटलं, की त्‍यानं तसंच निघून जावं दूर कुठेतरी. अगदी पलिकडे. माझ्यापासून खूप दूर. इथं त्‍याला मी काय देणार आहे कुणास ठाऊक. तिथं जाऊन ते स्‍वतःचा आनंद तरी शोधेल. मी त्‍याला  तो शोधण्‍यात खूप मदत केली. मला नाही जमलं. ते आपलं तक्रार करत नाही, पण त्याच्‍याही आत काहीतरी चाललेलं असतं. त्‍याची घालमेल, एकटं न राहण्‍याची धडपड, जे वाटेल ते करायची निकड, भावूक होण्‍याची त्‍याची गजर... सारं सारं काही जाणवतं मला. मला प्रत्‍येक वेळी त्याच्‍या कलानं वागता येत नाही. मला वाईट वाटतं त्‍याचं. मलाही त्‍याच्‍यासारखं हवं तेव्‍हा हवं तिथे जाता आलं असतं तर? मी नेहमीच त्‍याला शहाण्‍यासारखं वागण्‍यासाठी समजावत असतो. खरं तर मी त्‍याला या चौकटींमध्‍ये कसं रहावं हे शिकवत असतो. ते नेहमीच धुसमुसळेपणा करतं. मला ते समजून घेता येतं, पण ते शहाण्‍यासारखं वागू लागलं की मला भीती वाटते त्‍याची. त्‍याच्‍या आत काय चाललंय ते मला समजेनासं होतं. आताही ते थोडं शहाण्‍यासारखंच वागत होतं. ते शांत बसलं होतं तिथे. समोर काहीतरी पाहत होतं. पुन्‍हा माझ्या मनात आलं, की त्‍यानं सरळ वाट पकडून निघून जावं दूर...

तेवढ्यात त्‍यानं मागे वळून पाहिलंच! त्‍याचे डोळे शांत होते. खूप काही अनुभवल्‍यासारखे. मी त्‍याच्‍या डोळ्यांत पाहत होतो. खूप दिवसांनी आम्‍ही एकमेकांकडे असे पाहत होतो.

ते माघारी आलं. येणारच होतं. त्‍यानं माझ्या बोटांत त्‍याची बोटं गुंफली. त्‍याचा किती विश्‍वास व्‍यक्‍त होत होता त्‍याच्‍यातून. आम्‍ही चालू लागलो. त्‍याच्‍या डोळ्यांच्‍या कडांवर रेंगाळत असलेली प्रतिक्षा माझ्या डोळ्यातून सुटत नव्‍हती. काहीतरी ऐकण्‍यासाठी किती आतूर होतं ते! त्‍यानंतर भडाभडा बोलत गेलं असतं ते. असं उंब-यावर येऊन थांबणं जिवघेणं असतं. त्‍याला तशी सवय नाही, पण अनुभव बराच आहे. ते सवयीचं होत नाही तेच बरं.

मध्‍येच कधीतरी त्‍यानं माझ्याकडे पाहिलं. मघापेक्षा ते वेगळं दिसत होतं. त्‍याच्‍या डोळ्यांतले भाव झरझर बदलत होते. रिकामी संध्‍याकाळ झेपावत होती. मला आच जाणवत होती. मी त्‍याला घेऊन गर्दीत शिरलो.


तेवढ्यापुरतं

मी घराबाहेर पडतो तेव्‍हा थेंबांनी भरलेलं आभाळ जणू काही माझीच वाट पाहत असतं. मी चालू लागतो तेव्‍हा सगळे थेंब माझ्याचकडे पाहत असतात. टक लावून. एवढ्या उंचावरून माझा चेहरा दिसत नसावा त्‍यांना, पण माझी पावलं दिसतात. कधी विश्‍वासानं पडलेली, कधीच आपल्‍याच धुंदीत चाललेली, कधी गुणगुणत तर कधी मिणमिणत.

माझ्या मनाचा सूर त्‍यांना कसा सापडतो कुणास ठाऊक? पण तो सापडतो एवढं मात्र खरं!

एकदा का तो सूर सापडला, की ते एकेका थेंबांने डबडबलेलं ते आभाळ माझ्याकडे झेप घेतं. त्‍यांच्‍या त्‍या झेपेत माझीच आतूरता असते आणि मी तिकडे माझ्याच विचारात असतो. ते आभाळ असं अनेकदा पावसासोबत माझ्याकडे झेपावलं आहे. मला मात्र मान वर करून पहायची भीती वाटत असते. जर ते धावून येताना नाही दिसलं तर अपेक्षाभंग होणार! कितीदा करून घ्‍यावा? त्‍यापेक्षा न पाहिलेलंच बरं. तो नाही आला तरी काही वाटत नाही, पण तो येतो तेव्‍हा मोठं समाधान मिळत असतं.

मग ते सारे थंडगार थेंब आवेगानं येऊन बिलगतात मला. पाण्‍याची मोठी लाट रोंरावत येऊन आदळते जणू. मला त्‍या थेंबांना कधीच कवेत घेता येत नाही. पण मी खूप आसुसून अनुभवतो त्‍यांना. मोहरुनही येतो. अंतर्मुख होतो. फुलतो देखील.

पण हे सगळं खूप कमी काळासाठी असतं. जेवढा वेळ मी माझा सभोवताल, जग, माणसं सारं विसरुन त्‍यात रममाण होतो केवळ तेवढ्याच क्षणांसाठी. त्‍यानंतर पुन्‍हा ओहोटी सुरू. पावसाचा अनुभव तोच असतो. आनंदही तोच असतो. मात्र काही क्षणांपुरता त्‍याचा झालेला स्‍पर्श हरपलेला असतो. तो स्‍पर्श तेवढ्यापुरताच असावा.

चला, तेवढं तर तेवढं...

साफसाफ

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

– सुरेश भट (एल्गार)

Wednesday, July 17, 2013

एकांत

त्‍या एकांतात तुला भेटण्‍याचा वेगळाच आनंद असतो
तुझा येण्‍यास कधी नकार नसतो
तुझी जाण्‍याची घाई नसते
कल्‍पनेच्‍या पलिकडे पसरत गेलेली वेळ
हात जोडून समोर असते  उभी... नतमस्‍तक होऊन!
मला हवं तेवढा वेळ तुझ्यासोबत बसता येतं, तुला पाहता येतं
तिथे ना कुणाची भीती असते ना कुणाचा विचार असतो
सगळं काही आपलंच असल्‍यासारखं...

मी तुझे संवाद रचतो
तू ते तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलतेस
अगदी आत कुठंतरी खोलवर स्‍पर्शतील असे...
त्‍या वेळी किती ओलावा असतो गं तुझ्या शब्‍दांत!
इतर वेळी तू प्रकर्षाने टाळतेस तो...
तू माझ्या प्रश्‍नांना मला हवी तशी उत्‍तरं देतेस
मी मला जे ऐकायचंय ते ऐकतो
मग मी कधीतरी सुखावून घेतो
अनेकदा दुखावून घेतो
आपण परस्‍परांशी बोलत राहतो
न दिसणा-या वाटेवर चालत राहतो

मला सारं जग गोठवून टाकता येतं तिथे
वेळ मूठीत घेता येते, हवं तसं जगता येतं
तुझ्यासोबत राहून गेलेला डाव मांडता येतो
तिथल्‍या कणाकणावर माझं स्‍वामित्‍व चालतं
पण ती माझ्या मनाची समजूत...

खरं तर डावं कधीच चार घरांपुढे सरकत नाही
सालं त्या एकांतातही तुझा हात धरायचं मनात येत नाही
तू तसं का करत नाहीस हे विचारण्‍याचं धाडस होत नाही
तिथंही तू निघून जाण्‍याची भीती पाठ सोडत नाही
असं का व्‍हावं?

शेवटी माझा स्‍वतःचा असा एकांतही उरत नाही
जिथं तो आहे तिथं जाता येत नाही
त्‍या तिथं, जिथं माझ्यासमोर मीच असतो
स्‍वतःच्‍याच डोळ्यात पाहत...
स्‍वतःला स्‍पर्शत...
स्‍वतःच्‍याच आत उतरत...

एक अख्‍खं विश्‍व हरवल्‍याचं दुःख मोठं असतं
स्‍वतःला न भेटण्‍याची सल तेवढीच बोचरी असते
थोडा गारवा, थोडा विसावा, थोडं जगणं खूप दुर्मिळ असतं
उघड्या बोडक्‍या वाटा अंतापर्यंत धडपडत गेलेल्‍या असतात
त्‍यांचं दुसरं टोक लवकर येईल तर बरं...

Tuesday, July 16, 2013

किती वेळा?

किती वेळा मी तुझं असं दूर जाणं पहायचं?
किती वेळा मी असं वारंवार पोरकं होत जायचं?

हात धरलाच ना कधी तू माझा
कल्‍पनेत तरी कितीदा तू हात सोडवून पळायचं?

तुझ्या येण्‍याच्‍या आशेनं स्‍वप्‍नं रंगत गेली ती आपसूक
त्‍या हिरमुसल्‍या स्‍वप्‍नांना मी आता कसं समजवायचं?

तू घातलेले बांध रोज आडवे येतात मला
त्‍या बांधांना सावरत मी आता कसं जगायचं?

तुला न गुंतवण्‍याचं वचन देऊन फसलो मी
तुझी आस लावून बसल्‍या मनाला कसं फसवायचं?

तू पलिकडून चालत असशील माझ्यासोबत
या भ्रमात मी कुठपर्यंत एकटं चालायचं?

Monday, July 15, 2013

ज्‍योत

माझीया डोळ्यास भासे
तू रोखल्‍या आसवांचा भार
त्‍या अव्‍यक्‍त शब्‍दांची धार
किती दुधारी सांगू कशी?

चमकत्‍या झिरमीर पडद्यांच्‍या आड
नांदते एकले दुःख माझे
पाहते निमूट स्‍वप्‍ने सुखाची
कसे सांगू तयास काय वाटे?

तव पावलांची चाहूल ती
मन वेडे थरारे पाण्‍यापरी
मनतरंगांच्‍या त्‍या लाटेवरी
मी वाहूनी चाललो कुठे?

कधी शांत, कधी मृदू, कधी मंद छाया
शब्‍दांनी तुझीया जी लाभली मला
ते क्षण कैसे चितारून ठेऊ?
जमतील का कधी ते कैद कराया?

दूरूनी गोजिरा दिसे
माझ्या नभीचा प्राण तो
स्‍पर्शू कसा भीती वाटे मला
डागाळेल का गं चांद तो?

मग चालशील का तु सवे?
तुझ्याच पसरल्‍या चांदण्‍यात
मी चाललो अंतापरी तरी
भागेल का तहान ती?

साकाळल्‍या अंधारातूनी
हे तेज कैसे पाझरे उरी?
डोकावूनी पाहे गाभ्‍यात मी
तू का दिसे ज्‍योतीपरी?

Sunday, July 14, 2013

वणवण

रुणझुणत राहिलो किणकिणत राहिलो
जन्‍मभर मी तुला 'ये' म्‍हणत राहिलो

सात्‍वनांना तरी ह्रदय होते कुठे?
रोज माझेच मी मन विणत राहिलो

ऐकणारे तिथे दगड होते जरी
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो

शेवटी घर राहिले सुनेच्‍या सुने
उंब-यावरच मी तणतणत राहिलो

विझत होते जरी दीप भवतालचे
आतल्‍या आत मी मिणमिणत राहिलो

दूर गेल्‍या पुन्‍हा जवळच्‍या सावल्‍या
मी जसाच्‍या तसा रणरणत राहिलो

मज न ताराच तो गवसला नेमका
अंबरापार मी वणवणत राहिलो

- सुरेश भट

Saturday, July 13, 2013

आग

आत पेटलेल्‍या वणव्‍याच्या ठिणग्‍या
पडू नयेत कधी कुणाच्‍या घरावर
त्‍याने भडकलेल्‍या आगीत
पुन्‍हा मलाच होरपळायचं असतं

कितीही सावरलं तरी काही चुकार ठिणग्‍या
निसटतातच नजरकैदेतून
आणि समोर उभा राहतो
अनर्थाचा अग्‍नीडोंब

मी फक्‍त पहात रहायचं असतं
उंब-यावरच... सचिंत मनानं...
मग आतल्‍या आगीतूनच एक प्रार्थना जन्‍म घेते
समोरची आग विझण्‍यासाठी...

प्रार्थनेत अश्रू मिसळत जातात
रक्‍ताचा एक पाट वाहत येऊन मिसळतो
मनातली अस्‍वस्‍थता आत कोंडून टाकून
मी धावा करत असतो... आग विझवण्‍याचा...

त्‍या आगीत स्‍वतःची समिधा टाकावी का?
मग विझेल का ती भूकेली आग?
तिचा स्रोत माझ्या अंतरात तर दडलेला नाही ना?
... आता विचारांचाही जाळ भडकू लागतो

भूतापासून भविष्‍यापर्यंत सगळंच बदलावंसं वाटतं
माझ्याच पाऊणखुणा पुसाव्‍याशा वाटतात
स्‍वतःलाच भूल द्यावीशी वाटते
मी वाढवलेलं रोपटं उपटून फेकावंसं वाटतं

आगीचे लोळ विचारांचं कवच जाळू लागतात
माझं हिरवगार रान होरपळत जातं
मी माझीच होळी पाहत असतो
माझ्या कानावर माझीच बोंब ऐकू येत असते

Friday, July 12, 2013

समजावुनी व्यथेला समजावता न आले!

समजावुनी व्यथेला समजावता न आले!
मज दोन आसवांना हुलकावता न आले!

सर एक श्रावणाची आली … निघुन गेली…
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले!

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आले!

- सुरेश भट

Thursday, July 11, 2013

हे वागणे बरे नाही

नखशिखान्‍त ओलाचिंब मी
अन् तू उभी आडोशाला तिथे
सर्वांग ओलावले माझे
आता तुझे कोरडे राहणे बरे नाही

डोळ्यांत तुझीया मी शोधता किनारा
तुझे ते पापण्‍या झुकवणे बरे नाही
मी बंध तोडून मुक्‍त होत असता
मला तुझे वचनांत बांधणे बरे नाही

वेचित असता मी तुझी आठवे
तुझे मला ते हटकणे बरे नाही
मी इथे धगधगतो क्षणाक्षणा
अन् तुझे विझून जाणे बरे नाही

उमलून येतो रोमारोमात मी
अन् तुझे मिटून जाणे ते बरे नाही
मी कणाकणांतून सांधता तुला
तुझे मला विखरून टाकणे बरे नाही

मज आस लागली विठ्ठलाची
निती कल्‍पनांचे जाच हे बरे नाही
श्‍वास तुझाही कोंडतो तिथे
तुझ्या श्‍वासात मी अडकणे हे बरे नाही

नाम उरी जपता तुझे
तुझे ते नामानिराळे राहणे बरे नाही
अथांग पसरला हा दुरावा
तुझे आणखी दूर जाणे हे बरे नाही...

आसवांचे जरी हसे झाले!

आसवांचे जरी हसे झाले!
हे तुला पाहिजे तसे झाले!!

चंद्र आला निघुनही गेला!
ऐनवेळी असे कसे झाले?

शोधुनी मी तुला कुठे शोधु?
चेह-याचेच आरसे झाले!!

पाहिले दुःख मी तुझे जेव्‍हा!
दुःख माझे लहानसे झाले!!

आग ओकून मी किती ओकू?
शब्‍द सारेच कोळसे झाले!!

संपले हाय बोलणे माझे!
जे तुझ्याशी कसेबसे झाले!!

- सुरेश भट


Wednesday, July 10, 2013

एकदा तरी...

गुंतल्‍या या मनाची ही गाठ तू सोडवून जा
बंध त्‍यागूनी या जगाचे एकदा तरी भेटून जा

वाळवंटाच्‍या उन्‍हाचा दाह मी साहू कसा?
तापल्‍या या जीवाची झुळूक तू होऊन जा

तुजपासून दूर जाता भय जीवनाचे वाटे मला
श्‍वासात अडकल्‍या त्‍या भयाची समजूत तू घालून जा

कैद करु दे काळ तो तू बैस माझ्या जवळी जरा
ना स्‍पर्श हवा, ना साथ तुझी, हा भाव माझा समजून जा

सामोरी येशी अन् खुले एकेक कळी ती अंतरीची
त्‍या कळ्यांच्‍या पाकळ्यांचा मृदुगंध तू होऊन जा

शांत गहि-या रात्रीस कधी तू चाल सोबत माझ्यासवे
मी चांदणे होतो तुझे तू चांद माझा होऊन जा

का तुला मी जीव लावे, हा ध्‍यास कसला वेडा उरी?
हातात धरशील हात तू हे स्‍वप्‍न तू पेरुन जा

दे जगायाला मला क्षण चार आयुष्‍याचे तुझे
''रे सख्‍या'' अशी मज साद दे अन् अर्थ मजला देऊन जा

हे वेड सारे या जीवाचे तू व्‍यर्थ येथे गुंतू नको
गाणे स्‍फुरे मज जेथूनी ती भेटही विसरुन जा

वाळूत बांधिला गाव मी तो गाव कुचकामी असे
उधळून माझा गाव तो तू सागरा मिसळून जा

Tuesday, July 9, 2013

सुटका

जखम ठसठसत असते
रक्‍त वाहत असतं
मी गात असतो
सारं काही आलबेल असतं

चिरे ढासळत जातात
धूळ उडत असते
माझ्या शब्‍दांची धार
आता मलाच चिरत असते

माझ्या अस्‍वस्‍थ होण्‍यानं
मी पुन्‍हा अस्‍वस्‍थ होत जातो
माझ्या हातातला भाला
रक्‍तानं माखत जातो

मला पाऊलखुणांचा पाठलाग
आता सोसवत नसतो
धावून जमिन संपलेली असते
मी आता कड्यावर उभा असतो

स्‍वप्‍नं अस्‍पष्‍ट होत जातात
सूर्य मावळत जातो
खाली कोसळत्‍या दरीत
पावलांचा तोल जातो

कोसळता कोसळता
मन बधीर होऊन जातं
भावनांचा ससेमिरा
क्षणभरासाठी रोखला जातो

पण मनातली सुटकेची आशा
क्षणभंगुरच ठरते...

अस्‍वस्‍थ लाटा उसळू लागतात
रिकामे वारे घुमू लागतात
पुन्‍हा रक्‍त वाहू लागतं
पुन्‍हा चिरे ढासळू लागतात...

Monday, July 8, 2013

धारा

वाट पाहूनी उशाशी निजेलाही निज आली
डोळीयाच्‍या कडेवर दिसे आकाशाची लाली

पहाटेचं प्रतिबिंब माझ्या गालावर दिसे
मी मावळत जाई ती तिथे हळूवार फुले

तिनं फुलायाच्‍या आधी मी आत डोकावून पाही
पांढ-यावरी ते काळं हळूच पसरत जाई

माझ्या शब्‍दांचा प्रवाह मला भिजवूनी टाकी
शब्‍दा फुटणारे भय मला थिजवून टाकी

आतून येणारा ओघ दाटल्‍या कंठाशी तो अडे
त्यांचा तणाव तो किती माझा आसमंत डळमळे

धूर कोंडूनच राही जरी दिली त्‍याला मी वाट
सोडवावी आता कशी मारलेली मीच गाठ?

बांध घालता घालता रात्र सरे सारी माझी
कसं सांगू माझं मन नाही कुंपणास राजी

कधी मिळेल का आकाश? मिळेल का कधी निवारा?
चातकालाही मिळाव्‍या कधी हव्‍याहव्‍याशा धारा!

Sunday, July 7, 2013

चार क्षण

तुझ्या सान्निध्‍यात असताना
मी गारव्‍याचे चार क्षण शोधत असतो
तू निघून गेलीस की
त्‍यांच्‍यासोबत जगण्‍यासाठी...

सूर

कसं गावं बरं सांग माझ्या आयुष्‍याचं गाणं?
सावलीच्‍या मागेमागे जिथं उन्‍हाचं गं येणं
अस्‍वस्‍थतेच्‍या त्‍या काट्यांचं उरी बोचत ते जाणं
निःश्‍वासांच्‍या उंब-यावर पुन्‍हा भयाचं भेटणं

असा चुकार हा श्‍वास उरी अडकत जाई
माझ्या आठवणीही अशा जे कधी घडलंच नाही
माझ्या पाझरांची नदी अशी पोरकीच वाही
घर शोधत पाखरु नभी उडतच राही

ओंजळीनं माझ्या वाट पदराची ती पाहिली
सुन्‍या सुन्‍या या मनानं विराणी किती गायली
माझ्या स्‍वप्‍नांना गेले ते तडे असे ठायी ठायी
मन भांबावले वेडे चिते हेही काही बाही

तुझ्या जगाची सोडली सखे केव्‍हाची मी साथ
रंगवू कसं ते चित्र ज्‍यात नसे तुझी बात?
किती ढोल मी हा पिटू माझ्या आनंदी जगाचा?
किती खोल हा कोसळू थांग लगे नही डोहाचा?

माझी उसनी पावलं मना घे तू समजून
माझ्या अस्‍तराच्‍या खाली भीती बसली साचून
कवितेचे शब्द सारे गेले मुके गं होऊन!
कसा शोधू मी तो सूर कुठं गेला हरवून?

Friday, July 5, 2013

सकाळ

सांजरंग उधळून बघ गेला तो शिणून
सूर्य चालला पल्‍याड माझा दिन सजवून

रंग पहाट मनीचे डोळा विसरत नाही
माझ्या निजल्‍या स्‍वप्‍नास भूपाळी ती ऐकू येई

पळभराचा असेल आता अंधाराचा काळ
तिमिराच्‍या वेशीवर वाट पाहते सकाळ

Thursday, July 4, 2013

... Until We Meet Again

Those special memories of you
will always bring a smile
if only I could have you back
for just a little while

Then we could sit & talk again
just like we used to do
you always meant so very much
and always will do too

The fact that you are no longer here
will always cause me pain
but you are forever in my heart
until we meet again.

Sunday, June 30, 2013

मी पाऊस असायला हवं होतं...

मी पाऊस असायला हवं होतं
मग मला कधीही, कुठेही
बरसता आलं असतं तुझ्यावर
सर्वांदेखत...

तुही मग आनंदानं स्‍वीकारलं असतंस मला
दोन्‍ही हात पसरून
मला जवळही घेतलं असतंस
सर्वांदेखत...

तू छत्रीतून पाहत राहिली असतीस माझ्याकडे
तिच्‍या कडांवरून थेंबाथेंबानं कोसळणा-या मला
तू अलगद तळहातात झेललं असतंस
सर्वांदेखत...

मला पाहताना, मला स्‍पर्शताना, मला आपलं म्‍हणताना
तुला भिती वाटली नसती, मनी अपराध वाटला नसता,
तू सदैव सोबत केली असतीस मला
तीही सर्वांदेखत...

हे 'सर्वजण' किती महत्‍त्‍वाचे असतात ना?
त्‍यांची साक्ष, त्‍यांची अनुमती, त्‍यांचा होकार, त्‍यांचा स्‍वीकार, त्‍यांचे नियम...
हे सारं सारं काही प्रचंड महत्‍त्‍वाचं असतं!
भावनांपेक्षा!
मनाच्‍या इच्‍छांपेक्षा!
मोकळ्या जगण्‍यापेक्षा!
आणि ते चूक नाहीत
त्‍यांची कुंपणं अगदी योग्‍य जागी आहेत
मला वाटतंय...

मी चुकलोय या जगाची वाट
किंवा जगचं चुकलंय माझं
म्‍हणूनच वेड्यासारखा मूकपणे किंचाळत फिरतो मी
सर्वांदेखत...

पुढच्‍या वेळी मी पाऊस म्‍हणूनच जन्‍माला येईन
मला नकोत कुणाची बंधनं, नकोत कुणाची मनं सांभाळण्‍याचे व्‍याप
पाऊस होण्‍याचा प्रयत्‍न केला एकदा
सर्वांदेखत...

पण शक्‍य नसतं या तुमच्‍या जगात
आता बरसतो तो डोळ्यांत खुपतो त्‍यांच्‍या
तेव्‍हा बरसेन तर निदान हवाहवासा तरी वाटेन
सर्वांदेखत सर्वांनाच...

मुक्‍त... स्‍वच्‍छ... आनंदी...

वसंत

का अडखळला शब्‍द तुझा?
का फेरला चेहरा असा?
तू इच्छिले मनी तसा
मी मार्ग माझा शोधीला!

तुजसवे समांतर चालू कसा?
वाट आडमुठी वळण घेते अशी
नको भेदाया रस्‍ता तुझा
मी मार्ग माझा सोडीला!

तो किनारा तू स्‍पर्शीला
अन् डोह बघ हा आटला
थेंबापुरी तृष्‍णा उरी
मन साद घाली पावसा

आठवांचे मेघ ते
डोईवरी दाटे पहा
मी तिष्‍ठलो युगेयुगे
वसंत माझा हरवला

Saturday, June 29, 2013

आत... बाहेर...

माझी बाहेर पडायची वाट बंद झालीय
चिंचोळा रस्‍ता होता तो
खूप लहान पण माझ्यासाठी खूप महत्‍त्‍वाचा
आता तो बंद झालाय आणि मी आत कोंडला गेलोय
खिडक्‍यांच्‍या सापट्याही बुजवून टाकल्‍या आहेत
आत येणारा सूर्यप्रकाशही उंब-यावरच थांबलाय
मी काय करू आतमध्‍ये?
ओरडू?
किंचाळू?
आदळआपट करू?
धडका मारू का कवाडावर?
श्‍वास जोरजोरात येतोय आता
छाती भात्‍यासारखी वरखाली होतेय
कुणीतरी पार आतमधून ठोसे मारतंय जोरजोरात
हसतंयही आतून... मधेच रडण्‍याचाही आवाज येतोय
मला इथे करण्‍यासारखं काहीही नाही
या अंधारात करू तरी काय?
इथे राहण्‍याला जगणं म्‍हणत नाहीत. नुसतं जिवंत राहण्‍यास मला रस नाही.
माझ्या हातात तलवार लागली पाहिजे. सपासपा वार करायचेत मला. सापडेल त्‍याच्‍यावर. मीच सापडेन बहुधा माझ्या हातात. त्‍याला तर अजिबात सोडणार नाही. म्‍हणे मनसोक्‍त जगायचंय? बघतोच कसा जगतोय ते? गळाच आवळून टाकेन त्‍याचा. कोंडू दे श्‍वास जरा. जीव गेला तर मज्‍जाच. तलवारीने का कापू? त्‍यापेक्षा हातोड्याने ठेचेन. त्‍याहीपेक्षा दगड बरा. पार चेंदामेंदाच होईल. चेह-यापासून पार पायापर्यंत सगळ्याचाच. ठार नाही मारायचं. पण मरणाच्‍या उंब-यावर आणून सोडायचं. पार रक्‍तबंबाळ करून सोडायचा.
हवं ते करायचं काय? हवं तसं जगायचं? कातडीच सोलून काढतो. मग ढकलतो त्‍याला एका कोनाड्यात. सरपटत पुढे येतो काय? घालतोच हातोडे हातापायावर. आता कसा निपचित पडला कोप-यात!
आत फळ्यांच्‍या बाजूला फळ्या उभ्‍या करतो. ओंडक्‍यांच्‍या बाजूला ओंडके. भिंतींच्‍या बाजूंना भितीं. पार कोंडून टाकतो त्‍याला. हरामखोराच्‍या किंकाळ्या कानाचे पडदे फाडतायत. एकही फट ठेवणार नाही. गुदमरूदे चांगला. कुत्र्याला एवढा मारलाय तरीही कुठून जीव येतो ओरडायला? प्रकाशाची तिरीपही जाणार नाही आतमध्‍ये आता.
त्‍याची बाहेर पडायची वाट बंद झालीय...
बरं झालं

Wednesday, June 26, 2013

भल्या पहाटे निघून आले!

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा-या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेही नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !

- सुरेश भट

झंझावात…

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे!
माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा


बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कुठल्याच दारी मी कधी केली न कागाळी तुझी


मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका 
माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी


जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी
मीही अताशा ऐकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी?


तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा? बदनाम झंझावात मी!

- धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी!
उमटेल मी धरतीवरीचमकेन त्या गगनात मी!

- ''एल्गार'', सुरेश भ

गारवा

काल पाऊस आला आणि मनसोक्‍त भिजलो
जोरात सुटलेला वारा, त्‍यावर स्‍वार होउन शरिरावर बरसणा-या धारा
मैदानात सुटलेला मातीचा घमघमाट
सगळंच किती मोहक...!
अशा वेळी वर आकाशाकडे पहायचं
चेह-यावर पाऊस झेलताना खूप छान वाटतं
कालचा पाऊस चिंब भिजवून गेला
अन् जाताना तो गारवा माझ्या उशाशी ठेवून गेला...


Monday, June 24, 2013

जखम

त्‍यानं सोडलेलं ब्रम्‍हशिरस्‍त्र त्‍याला माघारी घेता आलं नाही. शब्‍द माघारी न घेता यावेत तसे. व्‍यास कोपले.
त्‍याला अमृतबिंदूपासून कपाळाच्‍या मध्‍यभागी तयार झालेला जन्‍मजात चिंतामणी काढून द्यावा लागला. नव्‍हे, अर्जुनाने त्‍याच्‍याकडून तो ओरबाडून घेतला. मण्‍याच्‍या जागी जखम झाली. भळभळून वाहणारी. कृष्‍णानं शाप दिला त्‍याला.
तो आजही ती जखम भरावी म्‍हणून दारोदार तेल मागत फिरतो म्‍हणे...
उरात शाप घेऊन मस्‍तकावर जखम वागवत त्‍याची वणवण सुरू आहे!
एवढ्या मोठ्या कालखंडात त्‍याला साधं तेल देणारा एकही मनुष्‍य का भेटला नाही?
कदाचित त्‍याची जखमही शापित असावी.
तो कधीही मरणार नाही आणि ती कधीच भरणार नाही.
ती जखम कधी भरलीच तरी त्‍याला मण्‍याविनाचं आयुष्‍य कंठावं लागणारच!
दुहेरी शाप...
पण जखम भरली तर मण्‍याच्‍या अस्तित्‍वाची खूणही पुसली जाईल. त्‍याला चालेल का ते?
तो नक्‍की जखम भरण्‍यासाठी दारोदार फिरतो का?
जखमा या अशाच असतात का?
मिटवायच्‍याही असतात आणि टिकवायच्‍याही...


Sunday, June 23, 2013

चमचा

चमच्यांच्या स्टॅंडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला.
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हंदका फुटला
' ती असती तर ' - ते उद्गारले,
तो हरवला नसता.
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेऊन
सहांच्या हंदक्यात
सामील झालो - आणि
पुटपुटलो :
खर आहे, मित्रांनो,
ती असती तर
मी हरवलो नसतो.
- कुसुमाग्रज.

पहाट

पहाटेचे बहु रंग
सूर्य उधळील आता
सखे उघड तू डोळा
नवा दिवस हा आला

नव किरणांनी सजो
तुझा संसार सुखाचा
लागो कुणाची ना दृष्‍ट
तुझ्या भरल्‍या घरला

तुझ्या आनंदाचे सूर
भिडो उंच गगनाला
लाभो उदंड आयुष्‍य
तुझ्या सख्‍या साजणाला...

अंतर?

तो गाभा-यातून बाहेर आला
आणि शांतपणे म्‍हणाला,
''उद्यापासून देवळात यायचं नाही''
मी गपगुमान मान डोलावली

त्‍यानं लाटांसोबत निरोप धाडला
आणि शांतपणे म्‍हणाला,
''उद्यापासून किना-यावर यायचं नाही''
मी गपगुमान मान डोलावली

तो थेंबावाटे तळहातावर आला
आणि शांतपणे म्‍हणाला,
''उद्यापासून मी बरसताना भिजायचं नाही''
मी गपगुमान मान डोलावली

मला तेवत ठेवणारं सगळं काही
माझ्याकडे पाठ फिरवून चालत राहिलं
मी शक्तिपात झाल्‍यासारखा
आतल्‍या आत कोसळलो

किनारा दूरावला पण
लाटा अजूनही कानावर येतायत
पावसानं नाकारलं पण
त्‍याचा ओलावा अजूनही जाणवतोच आहे...
आणि कुणी सांगितलं की देव देवळात असतो म्‍हणून?

ओलावा

तुझ्या गारव्‍याने पडे
मनी पाऊस सुखाचा
मज भूल ती पडते
होतो पाऊस मी ओला

ओलावले सारे अंग
रान ओले झाले सारे
मन घेतसे भरारी
तुझ्या आठवांच्‍या संगे...

निवारा

अगं माझ्या भावनांचा
सखे तूच तू निवारा
कसा जाऊ सांग दूर
माझ्या लाडक्‍या पाखरा

सोबत

तुझ्या सोबत सोबत
सजली ती सांज माझी
तुझ्या आठवांचा गंध
दरवळे माझ्या एकांती

Saturday, June 22, 2013

रस्‍ते

फसवून मी स्‍वतःला फसवायचे किती?
नुसतेच सावल्‍यांना बिलगायचे किती?

जे बोललो तुझ्याशी ते सांग नेमके!
मी शब्द ऐन वेळी विसरायचे किती?

तुजला कधी न आला माझा सुगंधही...
वैराण ऐकटे मी उमलायचे किती?

मज तुच सांग माझ्या थकल्‍या वयातही-
''वय मी खुळ्या मनाचे लपवायचे किती?''

अजुनी कशी तरुंना फुटली न पालवी?
धरतीवर नभाने बरसायचे किती?

दिसती जिथे तिथे ही जखमीच माणसे;
मी माझियाचसाठी विव्‍हळायचे किती?

शोधू कुठे कुठे मी स्‍वप्‍ने अजूनही?
मी श्‍वास राहिलेले उधळायचे किती?

मी कोणत्‍या अभागी देशात जन्‍मलो?
प्रेतांस इथल्‍या मी उठवायचे किती?

दुनियाच ही अशी अन् उपदेश हे असे...
मी अंतरास माझ्या विझवायचे किती?

मागे कधीच माझे आयुष्‍य संपले!
अवशेष आपुले मी सजवायचे किती?

अद्याप न माझा मज गाव भेटला!
मी रोज रोज रस्‍ते बदलायचे किती?

- सुरेश भट

Tuesday, June 18, 2013

गडद रात्रीच्‍या गर्भात

गडद रात्रीच्‍या गर्भात
खवळलेल्‍या समुद्राच्‍या काठावर
मी उभा असतो...
अशांत... अस्‍वस्‍थ... भळभळणारा!

माझ्या काळजातून वाहणारा पाट मला भिजवून चाललेला असतो
माझ्या डोक्यावर माझ्याच खुनाचा आळ असतो
मी पिंज-यात येऊन उभा राहतो
सभोवताली नजर फिरवतो

त्‍या सा-या खुर्च्‍यांवरच्‍या बसून मी पिंज-याकडे पाहत असतो
माझ्यावरचे सारे आरोप केव्‍हाच सिद्ध झालेले असतात
मला स्‍वतःला शिक्षा सुनावण्‍याची घाई झालेली असते
मी मूकपणे माझी बाजू मांडतो
जी ऐकण्‍यात कुणालाच रस नसतो
मलाही नाही

मला चाबकाच्‍या फटका-यांची शिक्षा सुनावली जाते
मी दयेची आर्जवं करतो
पण मला माझी दया येत नाही
मग करकचून दोर आवळून
मी ओढत नेतो स्‍वतःला... भर चौकात

दातओठ खात माझा हात चाबूक उगारतो
एक लाट गर्जत येते
अद्याप मला माझी चूक उमगलेली नसते
मी सपकारे ओढत असतो... सोसत असतो
चहुबाजूंनी बघणारे माझे डोळे भेदरलेले असतात

मी विद्ध होऊन कोसळतो
माझ्याच हातांनी मी आधार देतो स्‍वतःला
त्‍यांच्‍या साह्याने मी पावलं टाकत पुढे येतो
पुन्‍हा पिंज-यात येऊन उभा राहतो
नव्‍या शिक्षेसाठी सज्‍ज होतो...

गडद रात्रीच्‍या गर्भात
खवळलेल्‍या समुद्राच्‍या काठावर
मी उभा असतो...
अशांत... अस्‍वस्‍थ... भळभळणारा!

Monday, June 17, 2013

एका पहाटे...

मी पहाटे तुला उठवायला आलो होतो
मिठीत निजलेली तू मोहक दिसत होतीस
बाहेर अजून उजाडायचं होतं
तुझी हालचाल करणारी बुबुळं
तुझ्या स्‍वप्‍नांची कथा सांगू पाहत होते
तू या कुशीवर वळलीस आणि मला सामोरी आलीस
तिथेच तुझ्या शेजारी तुझ्या चेह-यासमोर निजलो
मी इतक्‍या जवळून तुला प्रथमच पाहत होतो
मला तुझ्या श्‍वासांची लय ऐकू येत होती
त्‍यांची उब जाणवत होती
तुझा सहवास, तू जवळ असल्‍याची जाणिव किती वेगळी होती!
हात हातात घ्‍यावा का तुझा? मनाशी थोडावेळ हुज्‍जत घातली.
शेवटी मनानंच माघार घेतली. हात धरला तर सोडवेल काय?
मग तुझ्या विस्‍कटलेल्‍या बटा तुझ्या कानामागे सारल्‍या
तुला तसाच स्‍पर्श करून जागं करावं असा विचार केला...
फक्‍त विचार...
मी काय म्‍हणून तुला जागं करावं?
कोण मी तुझा? काय करतोय इथे?
मला उत्‍तरांची गरज नाही, पण तुला भासली तर कुठून देऊ?
मी नाही तर तो जागं करील... आपलीच समजूत...
तुझी झोप चाळवली गेली होती
मी माघारी फिरलो
दवबिंदू पडायची वेळ झाली होती...

Saturday, June 15, 2013

काय होशील तू माझ्यासाठी?

काय होशील तू माझ्यासाठी?

तू सूर्य हो
मी तुझी पृथ्‍वी होतो
तू तळपत राहा
मी तुझ्याभोवती फिरतो

तू वारा हो
मी आग होतो
तू वाहत रहा
मी जळत राहतो

तू किनारा हो
मी तुझी लाट होतो
तू तटस्‍थ रहा
मी झेपावत राहतो

तू चंद्र हो
मी तुझी रोहिणी होतो
तू नभात डौलात रहा
मी तुला न्‍याहाळत राहतो

पण ठाऊक आहे मला
तू यातलं काहीच होणार नाहीस
मग फक्‍त एक विनंती मान्‍य कर...

तू माझी कृष्‍ण होऊन जा
मला होऊ दे तुझी मीरा
तू फक्‍त निश्‍चल रहा दगडासारखी
मला तुझ्याशी एकरूप होऊ दे जरा

चालेल मला माझं स्‍वत्व हरवणं
परमात्‍म्‍याशी जोडला जाऊ दे मला
चालेल मला तुझ्या चराचरात सामावणं
क्षणभरासाठी तरी अमर होऊ दे मला...

एका रात्री...

मी तिला म्‍हटलं,
''ये तुझ्यासाठी गाणं गातो.''
तर म्‍हणाली,
''काय रोज रोज गाणं? काहीतरी बोल तू!''
''तुला आवडत नाही का मी गाणं गायलेलं तुझ्यासाठी?''
पण तीचं आपलं एकच. बोल तू.
मी म्‍हटलं, ''ठिक आहे. सकाळी केलेली कविता तू वाचलीस का?''
ती म्‍हणाली, ''विसरले.''
मी म्‍हटलं, ''तू माझ्या आधीच्‍या तरी कुठे वाचल्‍या आहेत?''
ती म्‍हणाली, ''तू काय सारख्‍या कविता करतोस? काहीतरी बोल!''
''अगं वेडे, मी माझ्या कवितांमधून बोलतो.''
ती खट्टू झाली.
तिला माझी भाषा समजत नाही.
मला दुस-या भाषेत सहजता लाभत नाही.
माझी भाषा समजण्‍याचा ती प्रयत्‍न करत नाही.
मी तिच्‍या भाषेत बोलूनही तिला विश्‍वास बसत नाही.
मग मी तिला म्‍हटलं,
''चल. तुझ्यासाठी मी माझी कविता वाचतो.''
मी कविता वाचली.
''बबली, तू किती छान कविता केली.'' असं म्‍हणून तिनं तिचा हात कौतुकाने माझ्या चेह-यावरून फिरवला.
पण तिचं पुन्‍हा ये रे माझ्या मागल्‍या...
''तू झोप. दोन वाजलेत.''
''अगं मला सुचलं, की लिहावंच लागतं. नाहीतर झोप येत नाही.'' - इति मी.
''असलं कसलं जगावेगळं वागणंय हे? सकाळी उठून लिही.''
''मला तुमच्‍या जगाच्‍या व्‍यवहारात बांधू नकोस. मी मुक्‍त आहे. मी समुद्र आहे. मी पाऊस आहे.''
ती माझ्या चेह-यासमोर बोट नाचवत जोराने हसत म्‍हणाली,
''बबली, याचा अर्थ तू वेडी आहेस.''
ती हसत राहिली. हसत हसतच झोपली.
वेडी कुठची...

Friday, June 14, 2013

निःश्‍वास...

मी साखरझोपेत असतो तेव्‍हा
हलक्या पावलांनी तू येतेस माझ्याजवळ
माझ्या स्‍वप्‍नांच्‍या निःश्‍वासातून
हलकेच... अगदी अलगद...

तुझ्या पैजणांचा नाद माझ्या कानी पडतो
आणि माझं स्‍वप्‍नं कूस बदलतं हळूच
तू रुप धरू लागतेस माझ्यासाठी
माझ्या स्‍वप्‍नांचं प्रतिबिंब होत

मी निजलेला असताना
तू वेचत राहतेस माझी स्‍वप्‍नं... शब्‍दरुपाने
माझ्या अस्‍वस्‍थेवर फुंकर घालतेस
मी डुचमळत राहतो... झोपेतेच

मी डोळे उघडतो आणि
मनापासून डोळ्यांपर्यंत तू साकारत जातेस
तुला पाहून सुखावत जातो मी
तू हलकेच माझ्या पांघरूणात शिरतेस

तू कवटाळतेस मला तुझ्या छातीशी
माझ्या केसांतून हात फिरवत राहतेस
तुझ्या स्‍पंदनांचे श्‍वास ऐकू येतात मला
मी शोधू लागतो स्‍वतःला त्‍यात

मी गुज साधतो तुझ्याशी
तू स्‍तब्‍धपणे ऐकून घेत राहतेस मला
मी जडावत जातो आतल्‍या आत
तुझं मोरपीस होऊन गेलेलं असतं...
थोडं गहिरं... थोडं सुंदर

पहाट उमलत असते बाहेर
मी गुदमरत जातो आतल्‍या आत
तोपर्यंत तू जन्‍मलेली असतेस
स्‍वतःच्‍या पोटात मला घेऊन

माझ्या चुकार होत चाललेल्‍या
श्‍वासाला सावरतेस तू
माझ्या ओठांवर अलगद ओठ ठेवतेस
तुझा मंद नाद ऐकू येतो मला
तू पाझरू लागतेस माझ्यातून...


दिवस हे जाती कसे?

दिवस हे जाती कसे अन् ऋतु असे छळतात का?
विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?

निसटुनी आयुष्‍य गेले त्‍या तुझ्या पदरांसवे...
पण मुक्‍या रक्‍तात सारे अर्थ मग जुळतात का?

जवळ तू नाहीस... उरली एकटी माझी मिठी
चुकुन तव निःश्‍वास गाली माझिया रुळतात का?

बिलगुनी बसली तुझी ही मधुरविव्‍हल चिंतने!
चांदण्‍या रात्री नकोशा टाळुनी टळतात का?

रोज वासंतिक तुझे मी शब्‍द... स्‍वर नाकारितो
अन् तुझी गीते तरीही मजकडे वळतात का?

मी कधी म्‍हटले, ''तुझी मज चरणचिन्‍हे भेटली!''
पण सुन्‍या डोळ्यांत माझ्या दशदिशा चळतात का?

कुंद ह्या वेळी तुझ्याविण प्राण बघ मंदावला...
मग असे भवती अचानक दीप हे जळतात का?

जर तुझा एकांत केव्‍हा गुणगुणाया लागला,
शोध तू ह्रदयात... माझी स्‍पंदने मिळतात का?

- सुरेश भट

Thursday, June 13, 2013

स्‍पर्श...

सांगू कसा शब्दात मी?
ही ओढ कैसी दाटे उरी
मज वाटते तू जवळी असावी
अळवावरच्या थेंबापरी

ना स्पर्शण्याचा हट्ट असे
ना स्वामीत्वाची आस ती
तू बैस माझ्या संगे जरा
थांबे युगांतराचा श्वासही!

तू घरंगळशी मंदगतीने
माझ्यात असुनी नसल्यापरी
मी अभागी राहिलो बघ
अतृप्त ओल्या पावसातही

तू सखे द्वार माझ्या
आजन्म तिष्ठलो त्या मुक्ततेचे
तू उंब-यात रोखले मज
अन् मी त्‍याजली दुनिया तिथे

थांबशील का तू चार घटका?
थोडा अर्थ मजला लाभू दे
पण थेंब होवुनी घुटमळे तू
झेप घेण्या सरोवराकडे!

प्रश्न पडे मी का नाही सरोवर?
का नाही मी तू आहे जिथे?
का वेगळी तू माझ्यातुनी?
का वेगळे अस्तित्‍व हे?

चार घटीका संपल्‍या
तू चालली संपूर्णतेकडे
तव स्पर्श लाभूनीही कोरडा दिसे मी...
अजी कोरडा राहिलो कुठे?

Wednesday, June 12, 2013

ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्‍हा?
माझियाच स्‍वप्‍नांना गाळलेस का तेव्‍हा?

आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्‍हा?

हे तुझे मला वाचणे सुरू झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेव्‍हा?

बोलली मिठी माझी - 'दे प्रकाश थोडासा!'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्‍हा?

कालच्‍या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्‍हा?

चुंबिलास तू माझा शब्‍दशब्‍द एकांती,
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्‍हा?

- सुरेश भट

Tuesday, June 11, 2013

होडी आणि किनारा

किना-यानं स्‍वतःच्‍या हातानं होडी पाण्‍यात सोडली
म्‍हणाला, ''खूप विस्‍तरत जा. खूप मोठी हो. माझी पर्वा न करता''
आणि होडी निमूटपणे निघाली...
मनाविरूद्ध...

तिचा किनारा दूर जाऊ लागला
अनिवार ओढीनं तिनं मागं वळून पाहिलं
तर किना-यानं पाणी लोटून तिला पुन्‍हा दूर ढकललं
होडी पुन्‍हा पुढे निघाली...

तिला राहून राहून तो दिसत राहिला... नजरेआडही
त्‍याच्‍या सोबतीनं पाहिलेली संध्‍याकाळ आठवली
त्‍याच्‍या सोबतीचा पाऊस आठवला
जे अनुभवायचं राहून गेलं ते प्रकर्षानं आठवलं

तिच्‍यापुढे होता विस्‍तीर्ण समुद्र
आता तिला हवं तिथं जाता येणार होतं
हवं ते पादक्रांत करता येणार होतं
हवं ते मिळवता येणार होत
हवं ते? खरंच? मिळतं का कधी ते?

ती पुढे जात होती
तिला विश्‍वास होतो, की किनारा पाहतोय तिला
वादळात, भर समुद्रात, पावसात किंवा दुस-या किना-यावर
आपण कुठूनही दिसू त्‍याला...
फक्‍त तिला डोळे भरून पाहता येणार नाही त्‍याला... एवढंच!

रिकामी होडी कायम डुचमळत राहिल
समुद्रातून उसन्‍या बळावर जात राहिल
पाण्‍याच्‍या मध्‍यभागीही कोरडीच राहिल
तिचं अस्तित्‍व... तिचं बळं...  तिचा ओलावा...
सारं सारं काही किना-यापाशी राहिलंय...

तिला राग आला त्‍या समुद्राचा
त्‍या आभाळाचा... त्‍या वा-याचा...
आणि स्‍वतःच्‍या आयुष्‍याचाही...
किनारा तिला विसरला तर ती कुणालाच माफ करणार नाही...
स्‍वतःला तर नाहीच नाही... कधीच नाही!

ए... तू विसरणार नाहीस ना मला?

व्‍यर्थ

सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा!

तू मला, मी तुला पाहिले,
एकमेकांस न्‍याहाळिले,
- दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
- खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे;
- मी तरीही जसाच्‍या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
- हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला गीत माझे कळे?
व्‍यर्थ हा अमृताचा वसा!

- सुरेश भट

Monday, June 10, 2013

काठावर

अनवाणी चालत होतो... तुझ्या काठावरून
तुझ्या स्‍पंदनांची गाज ऐकत
तू हळूच स्‍पर्शून गेलीस माझ्या पावलांना
मला हवीहवीशी ओल मागे ठेऊन

उजवीकडे सुरूची बाग पसरत गेलेली
डावीकडे तू अथांग पहुडलेली
आणि मधोमध मी...
घरटं शोधणा-या पाखरासारखा... अस्‍वस्‍थ!

मी जेव्‍हा जेव्‍हा येतो ना तुझ्याजवळ
मला भरतं येतं आपसूकच
तुझ्या काठावर डोकं ठेऊन
निवांत पडावंसं वाटतं

मी माझ्याच आभाळाखाली चालत असतो
मंदपणे... तुझे समाधानी डोळे पाहत...
त्‍या प्रत्‍येक क्षणी तू भिनत जाते माझ्यात
अगदी समरसून एकरूप होतेस

तुझी ओढ वाटते म्‍हणून
एकदा झेप घेतली कड्यावरून
तर तू अगलद बाहेर काढलंस मला
तुझ्यावर रागवावं का नाही ते कधी कळलंच नाही...!

काठावरून तुझं आणि क्षितीजाचं मिलन
शांतचित्‍तानं पाहत बसतो मी
तुझी एक लाट माझ्यापर्यंत येत असते
मी आकंठ बुडत असतो

तुझ्या किना-यावर मी रेखाटलेले शब्द
कर्तव्‍यदक्ष लाटा येऊन मिटवून जातात
एकदा त्‍या परतीच्‍या लाटांवर
मला माझे शब्‍द ओझरते दिसले होते

हा किनारा माझा आहे
इथे माझ्याशिवाय कुणीही नसावं
ना काळ असावा, ना बेड्या असाव्‍यात
ना प्रश्‍न असावेत, ना उत्‍तर असावं

असावा केवळ एक उद्गार...!
माझ्या मनातून निघालेला
तुझ्या जाणिवेपर्यंत पोचलेला
तुला अंर्तबाह्य तृप्‍त करेल असा...

इथलं आभाळही माझं असावं
तो सूर्यही माझा असावा
तुही माझी असावीस
आणि मी?.....

मला ना शांतपणे चालायचंय तुझ्या काठानं
तू जेवढी पसरत गेली आहेस तिथपर्यंत
मला बोलायचंय खूप तुझ्याशी
पण शब्द हरवलेत कधीचे
मी फक्‍त चालू शकतो तुझ्या काठाने... समांतर असा!
मला चालू दे...!

खिडकीतला पाऊस

या क्षणी बाहेर पाऊस पडतोय
रात्रीच्‍या अंधारात तो केवळ जाणवतोय
कधी वाढतोय
कधी मंदावतोय
मी खिडकीत बसून त्‍याचे तुषार अंगावर झेलतोय
त्‍याचा नाद मोहक आहे
मला गुंगी येतेय
या क्षणी तुला एक छान स्‍वप्‍न पडो...


मोग-याचा गजरा

तुझा मोग-याचा गजरा
कधीचा रुतून बसलाय मनात
हळूच उचलायला जावं तरी
आठवण भळाभळा वाहते

त्‍या गज-याच्‍या पाकळ्या विखुरल्‍या आहेत
माझ्या जाणिवेच्‍या पटलावर
त्‍यांना हलकेच सारशील का गं जरा बाजूला?
श्‍वास गुदमरतोय माझा!

तुला सुखावण्‍याचा एक क्षण
अवचितपणे हातातून निसटला माझ्या
वेळेच्‍या घड्याळातून वाळू कायमची निसटावी तशी...
मी कसा गं माफ करू स्‍वतःला?

त्‍या निसटल्‍या क्षणानं पेरलेली बाभळ
झपाट्यानं फोफावली आहे
त्‍यांच्‍या अगणित काट्यांवर मी झेपावत राहतो वारंवार
मोगरा अधिकच रुतत जातो आत

किती धावू त्‍या क्षणामागे? असे किती क्षण मी धरू?
ते क्षणच घेरतात मला एकट्याला
एका बोच-या वर्तुळात...
मी भांबावून जातो त्‍या गर्दीत... विद्ध होतो!

आणि तरीही...

मी तुझ्या येण्‍याच्‍या वाटेवर उभा असतो
सोबत मोग-याचा गंध असतो
तुझ्या पावलांची चाहूल असते
मोगरा उगीच फुलायला लागलेला असतो...


Saturday, June 8, 2013

पुन्‍हा...!

तू घराबाहेर पडण्‍याची तयारी करत असशील
आणि माझं आभाळ भरून येत असेल
तू ''येते रे'' म्‍हणून उंब-याबाहेर पडशील
तेव्‍हा मी कोसळण्‍याच्‍या कड्यावर असेन
तू बाहेर पडशील
मी झेपावत येईन
हलकेच स्‍पर्श करेन तुझ्या कपाळाला
तू वर आभाळाकडे पाहशील
मी ओघळू लागेन
तुझ्या भुवयांना वळसा घालत
मी खाली येईन
जाताना मान वेळावून
मी डोळ्यात पाहिन तुझ्या
तुझे डोळे तेव्‍हा पर्समधला रुमाल शोधण्‍याची खटपट करत असतील
मी खट्टू होईन
पण तुला तो सापडणार नाही
मग तू हात उंचावशील तुझा
तुझ्या गालावरून हलकेच वाहताना
मी मंदावलेला असेन
तू चार बोटांनी पुसून टाकशील मग मला
चिंब भिजेन मी...
आता मला घाई असेल
पुन्‍हा आभाळात जाण्‍याची
पुढच्‍या पावसात
पुन्‍हा झेपावण्‍यासाठी...

Friday, June 7, 2013

मन

आज सकाळी डोळे उघडले
खूप भडभडून आलं होतं.
पाहिलं तर मन उशीखालून निसटून गेलं होतं कुठेतरी.
मी एक उसासा टाकला
ते हवं तसं भटकत होतं.
एकटंच. कुठल्‍यातरी प्रदेशातून. विवरांतून. अंधारातून. उन्‍हातून.
जिथं मला जायची मनाई होती.
मला क्षणभर हेवा वाटला अन् वाईटही
ते माघारी आलं तेव्‍हा मी समोरच उभा होतो.
ते थबकलं.
मी म्‍हटलं, ''काय हे?''
त्‍यानं काहीच म्‍हटलं नाही. ते कधीच म्‍हणत नाही.
मी थोडा जवळ गेलो.
''असं करून कसं चालेलं. तेही सकाळ सकाळ?''
ते शांत उभं. त्‍याच्‍याकडे उत्‍तर नाही हे ठाऊक होतं मला.
''मी समजून घेऊ शकतो रे तुला, पण हे सारं शक्‍य आहे का?''
ते खिडकीबाहेर आभाळ पाहत राहिलं.
''थोडी जनरित पाहायला नको का''?
ते पुन्‍हा शांत. पण ते गोंधळलेलं असणार.
त्‍याचं काय करावं ते कळेना.
मी त्‍याचा हात धरला आणि म्‍हटलं,
''चल, आपण गुंतू या कुठंतरी!''
ते बिलगलं मला आणि चालू लागलं सोबत.
पाहू आता किती गुंतता येतं ते.

साहिर म्‍हणतो...

वो अफसाना जिसे
अन्‍जामतक लाना ना हो मुमकीन
उसे इक खुबसूरत मोड देके
छोडना अच्‍छा

चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाए हम
- साहिर

Thursday, June 6, 2013

आभाळ

आपण खिडकीतून बाहेर डोकावून बघतो
पावसाचं चिन्‍ह नसतं
म्‍हणून आभाळ भरलेलं नसतं
असं थोडंच आहे!

कविता


''हं विचार''
''काय विचारू?''
''अरे विचार ना काय विचारणार होतास ते?''
''मला नाही काही विचारायचं?''
''असं काय करतोस? विचार ना? देईन मी उत्‍तरं''
''अगं काही नाही गं! झालं! मिळालं मला माझं उत्‍तर.''
''ते पूर्णपणे योग्‍य नसेल तर? मी देतेय ना आता उत्‍तर!''
''तोही भाग आहेच. पण नको.''
''काय नको नको लावलंयस? काल तर मारे मोठा म्‍हणत होतास की उद्या चांगल्‍या तयारीत ये. मोठा पेपरच देणार आहे. आता काय झालं?''
''...''
''...''
''...''
''तू तिरस्‍कार करतोस का माझा?''
''नाही ग. अजिबात नाही. तुझा तिरस्‍कार करून मला जगता यायचं नाही.''
''What's wrong then? Are you trying to keep me away?''
''नाही. तसं काही नाही. तू नेहमीच माझ्याजवळ आहेस आणि नेहमी राहशील.''
''ठिक आहे. तुला जे योग्‍य वाटेल ते कर. मी नाही अडवणार.''
''मी कुठे काय करतोय? आणि तू ही अशी नाराज होत जाऊ नकोस बघ माझ्यावर. मला नाही आवडत ते... तू माझ्यावर नाराज झालीस कि वाईट वाटतं मला.''
''मी नाराज नाही. चालू दे तुझं.''
''...''
''...''
''...''
''...''
''...''
''मी कशी वागू तुझ्याशी ते पण सांग.''
''जशी आहेस तशी राहा. छान... आणि वागणं काय ठरवून करता येत असतं का?''
''म्‍हणजे नेमकी कशी?''
''तू नेहमी आनंदी राहा. उदास राहू नकोस. आणि तुला माझ्याशी जसं हवं तसं वाग. तुला पूर्ण मुभा आहे.''
''मंद...''
''...''
तू माझ्याशी कसा वागणार आहेस?''
''तुला त्रास होणार नाही असा.''
''नीट काय ते सांग...''
''...''
''I think I will miss something.''
''...''
''...''
''...''
''...''
''...''
''Are you happy?''
''...''
''अरे बोल ना! Are you happy?''
''अजून ठाऊक नाही.''
''मग आता काय कळलंय?''
''तुझं काम कसं चाललंय? मेहतांसोबत ती डिल फायनल झाली का तुमच्‍या फर्मची?''
''चांगलं चालू आहे. काही नवे अपडेटस् आहेत. मेहतांचं काम झालेलं नाही, पण गळाला लागेल तो... पण प्रश्‍नाचं उत्‍तर कसं टाळावं हे कुणीतरी तुझ्याकडून शिकावं...''
''...''
''तुझं प्रेझेन्‍टेशन छान झालं त्‍या दिवशी.''
''अरे वा! आवडलं तुला? मी तुला त्‍यावरची तुझी प्रतिक्रिया विचारणारच होतो. थॅंक्‍यू... पण काय गं, तुला आधी तर आवडलं नव्‍हतं ना ते?''
''त्‍या दिवशी मी म्‍हटलं होतं की ते प्रेझेन्‍टेशन माहितीच्‍या अंगाने योग्‍य नाही आणि मी आज ते पहिल्‍यांदाच पूर्ण पाहिलं.''
''बरं...''
''...''
''...''
''तू त्‍या दिवशी ती कविता पाठवलीस बघ! ती दोन पाखरांची! ती स्‍पष्‍ट करून सांग ना.''
''वेडी आहेस का? कविता काय अशी स्‍पष्‍ट करून सांगायची असते? नाही सांगणार.''
''एsss असं रे काय करतोस तू? सांग ना. प्लिजsss नाही समजली मला.''
''नाही म्‍हणजे नाही.''
''प्लिज प्लिज प्लिज प्लिज. अरे त्‍यात ती दोन पाखरं म्‍हणजे काय तेच समजत नाही.''
''अगं किती सोपंय ते.''
''तरीही सांग.''
''जsssरासा डोक्याला ताण देशील ना तर चटकन समजेल.''
''तरी पण सांग.''
''अगं प्रयत्‍न तर कर.''
''राहू दे ते. कंटाळले मी. सांग नाsss.''
''एक पाखरू तू आणि एक पाखरू मी.''
''अय्या! खरंच! पण त्‍यातलं कोणतं पाखरू मी आहे? आणि कोणतं तू?''
''ते स्‍वतःचं स्‍वतः ठरवायचं असतं. स्‍वतःला दोन्‍ही ठिकाणी ठेऊन पाहा. जे मनाला योग्‍य वाटेल ते पाखरू आपण आहोत असं मानावं.''
''एss असं कसं होईल? कविता तुझी आहे. तू ठरवायचंस.''
''अगं तसं नसतं... कविता एकतर वाचणा-याची असते किंवा ज्‍याच्‍यासाठी लिहिली गेली त्‍याची. इथे ती दोन्‍ही परिस्थितीत तुझीच आहे. तुझ्यासाठीच लिहिली होती. तू इथे काहीही ठरवू शकतेस... शेवटी काय आहे, तुला जे पाखरू आवडेल तेच तुझं असेल ना!''
''तू ना एक नंबरचा खडूस आहेस. यापुढे मी तुला काही विचारणार नाही. जा...''
''मी काय खडूसपणा केला?''
''जा!  बोलू नकोस''
''अगं,....... जे आहे ते सांगितलं. तुझ्यासाठी कविता लिहिली आहे. कोडं नाही. सोपं आहे ते.''
''पण नाही ना जमतय मला. सांग ना रे...''
''कदाचित कविता ना वाचणा-याची असावी ना ज्‍याच्‍यासाठी लिहिली आहे त्‍याची... कवितेत ज्‍याची भावना गुंतते ना... कविता त्याची असावी... असो, त्‍यात एक पाखरू जरा तटस्‍थ आहे. ती तू...''
''...''
''...''
''सॉरी... मीच माठ आहे.''
''का गं?''
''मला काहीच समजत नाही.''
''असं काही नाही. तू फक्‍त लक्ष देऊन पाहात नाहीस.''
''असं काही नाही. मी पाहिलं. तरीही नाही समजलं.''
''नाही पहात तू. कारण त्‍याची तुला तेवढी गरज वाटत नाही.एकदा ती गरज वाटली ना की समजेल सगळं आपोआप....''
''...पण तू ती कविता स्‍वतःहून समजून घेतली असतीस तर बरं वाटलं असतं मला.''
''...''
''...''
''...''
''...''

एक दिवस ग्रेसच्‍या गाण्‍यासोबत...

एक दिवस ग्रेसच्‍या गाण्‍यासोबत...
स्‍वतःला पाहणं आहे
कधी विरसणं आहे
कधी समजणं आहे
कधी गुंतणं आहे...


ते शब्द...
कधी वेडावून जातात
कधी दुखावून जातात
साध्‍या शब्दांच्‍या ओळी
मानसीची तार छेडून जातात

त्‍या शब्‍दांसह थोडं स्‍पष्‍ट दिसतंय
आपलं काय परकं काय ते समजतंय
मी कुठं आहे ते कळतंय
दुस-यांनी आखलेल्‍या माझ्या सीमारेषांचं भानही येतंय

सीमारेषा आली...
आता थांबावं

Wednesday, June 5, 2013

भय इथले संपत नाही


भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो,
तू मला शिकवली गीते

ते झरे चंद्र सजणांचे,
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया

त्‍यावेळी नाजूक भोळ्या
वा-याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणु अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्‍या बुबूळापाशी
मी उरला सुरला थेंब

संध्‍येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्‍या भवती रिंगण
घालती निळाईत पाने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेदुतून ढळली माझ्या
निष्‍पर्ण तरूंची राई

कवी - ग्रेस

     काय सुरेख लिहिलंय ग्रेसने!
     आत पाझरत जातंय सारं. एकटेपणातलं भय किती नेमकं चितारलंय इथे! त्‍यामागोमाग येणा-या आठवणींतून पुन्‍हा दाटून येणारं एकटेपणाचं भय. न तुटणारी साळखीच जणू.
     सीता वनवासात असताना तिच्‍या अंगावर जर खरोखर राघवाचा शेला पडला असता तर? काय भाव उमटला असता बरं तिच्‍या मनी? किती आश्‍वस्‍त झाली असती ना ती! ते निबिड अरण्‍य, तो रावण, ते पहारेकरी, त्‍या दोघांतलं ते अंतर... सारं सारं काही क्षणात नाहीसं झालं असतं. मग तो शेला केवळ शेला राहिला नसता.
सीतेचा प्राण झाला असता तो!
तिच्‍या आयुष्‍याचा सोबतीही झाला असता तो.
त्‍या शेल्‍यात काय काय गुंफलं असतं तीने!
तिच्‍या भावना, तिची स्‍वप्‍नं, तिच्‍या अपेक्षा, तिचं जगणं, तिचं वाट पाहणं.
तिच्‍या प्रतिक्षेत त्‍यानेच तिला धीर दिला असता.
त्‍यानं डोळे पुसले असते तिचे.
तो नजरेआड झाला असता तर ती सैरभैर झाली असती.
जवळ असता तर निश्चिंत झाली असती.
हरवला असता तर जवळचं माणूस गेल्‍याप्रमाणं रडली असती.
माणसं अशीच जीव गुंतवत असतात ना! त्‍याला सीताही चुकली नसती.
तिच्‍या इंद्रियांनी गुणगुणलेलं दुःख कधी कुणाला ऐकू गेलं असेल का? ज्‍याच्‍यासाठी ते सारं होतं त्‍या रामाने तरी ऐकलं असेल का?
जीवाची काहीली झालेली असताना चांदण्‍या रात्रीत रामाला आठवताना ती चकोर झाली असेल ना? पण तृष्‍णा भागली असेल का तिची? काय केलं असेल मग तिनं?
तिनं भोगलेला वनवास माझ्या अंगावर काटा आणतो. तिच्‍या भोवतीचं अरण्‍य मला घेरतं चहुबाजूंनी. कोंडून टाकत जातं. आजूबाजूला उभ्‍या असलेल्‍या पहारेक-यांचे वटारलेले डोळे भिती घालतात मला. मनात असूनही मला इथून बाहेर पडता येत नाही.
माझ्या या वनवासाला अंत नाही, कारण माझा राम मला न्‍यायला येणार नाही.
वाट पाहण्‍याची अंतहीन धडपड उरलीय.
आणि राघवाचा शेलाही हरवलाय...