Sunday, September 16, 2012

एक कवडसा प्रकाशाचा...

मोडलेल्‍या छतातून हळूच आला
एक कवडसा प्रकाशाचा
अंधा-या कोप-यातही आता
आभास चैतन्‍याचा

कवडशाच्‍या अंतरंगी जणू
लक्ष काजव्यांच्या माळा
सोबत्‍यांसोबत फेर धरलेल्या
सोनरंगी धूलीकणांचा सोहळा

प्रकाशाच्‍या घसरगुंडीवरून मजेत घरंगळताना
अंधाराच्या कुशीत त्यांचं नाहीसं होणं
जन्म-मृत्यूचं एक सहज चित्र
जणू असावं निसर्गानंच चितारलेलं


जमिनीवर आता तयार झालंय
प्रकाशाचं एक छोटं राज्‍य
प्रकाशानं सारवलीय जमीन
आणि बसलीय खीळ अंधाराला

कवडसा हळूहळू सरकतोय पुढं
अंधार धावतोय त्याच्यावर झडप घालायला
कवडशाच्या डोक्यावरचा तो सूर्य
पाहतोय मजेने हा खेळ पाठलागाचा

प्रकाशाच्‍या सीमेवर वाट पाहतोय
खट्टू झालेला अंधार
प्रकाश गमतीनं पाहतोय
त्‍याच्‍या चेह-यावरचे भाव

उजळलेल्‍या कडांवरून
चहुबाजूंना झेपावणारा प्रकाश
शिरतोय अंधाराच्‍या
काळोख्‍या कुशीत सावकाश

प्रकाशाच्या अस्तित्वानं थोडी जाग आलीय
अंधारात गडप झालेल्‍या जगाला
खेळ बाजूला सारून अंधारही पाहतोय
मोठ्या डोळ्यांनी नव्‍या जगाला

अंधारालाही वाटतेय गम्‍मत
त्‍याला ठाऊकच नव्‍हतं पोटातलं हे जग
त्‍याच्‍या ओठांच्‍या कडांवर फुटलंय स्मित
अगदी प्रकाशाच्‍या चेह-यावर आहे तसंच

दिवसभर अंधाराशी खेळून
प्रकाशाचं राज्य चाललं अस्ताला
अंधार पाझरतोय वर्तुळात
मनाविरूद्ध... काहीसा नाखुशीनेच... 

आता आहे सर्वत्र त्‍याची एकट्याची सत्‍ता
तरी का भेडसावते ही विचित्र अस्‍वस्‍थता?
त्‍याच्‍या मनी जाणवे एक विचित्र हुरहुर
काळोखानं भरल्‍या घरात आता अंधारच एकटा

मोडलेल्‍या छतापल्‍याडच्‍या प्रकाशाला
अंधार घालतोय हळूच साद
पहाट आहे येण्‍याच्‍या वाटेवर
अंधार पाहतोय उद्याच्‍या कवडशाची वाट... 

Tuesday, April 3, 2012

इच्‍छा...

ओंजळीतल्‍या गोष्‍टी देता नाही आल्‍या
तरी सुगंधाचा दरवळ माग काढतच जातो
ओल्‍या पायवाटेवरचं सुकून गेलेलं दवसुद्धा
काही वेळासाठी मग तरारून उठतं

जुन्‍या रोपांना क्षणभरासाठी का होईना
पुन्‍हा अंकुर फुटतो
कधीकाळी फुललेल्‍या चित्‍तवृत्‍ती
निमित्‍तमात्राने पुन्‍हा होतात ताज्‍या












आकाश अन् धरेच्‍या सीमा 
क्षीतीजावर जुळलेल्‍या दिसतात फक्‍त
प्रत्‍यक्षातलं मिलन नाही 
पण स्‍पर्श कुठेतरी भासतोच ना

सुगंधाचे दरवळ उडून गेल्‍यावर
आठवणींची जिर्ण पानं मागे दिसतात
नभ व्‍याकूळलेलं राहतं तरी
भासाचे सांजरंग आकर्षक वाटतात

भरलेली ओंजळ कदाचित भरलेलीच राहिल
दानाचं पुण्‍य नाही लाभावं तिला
कधीकाळी त्‍यात चुकून पडलेल्‍या बीजांचं
आता आनंदाचं झाड व्‍हावं ही इच्‍छा...!

Saturday, March 3, 2012

पानगळ

माणसाला माणूस म्‍हणून समजून घेणं खरंच एवढं अवघड असतं का?
राग, लोभ, वर्चस्‍वाची आपणच चढवलेली आवरणं गळून पडायला अजून किती वेळ लागावा?
पिंज-यात कोंडून ठेवलेले पंख झुरत रहातात आणि गजांचा माज उतरता उतरत नाही. 
झाड कोमेजून गेल्‍यावर पाणी न घातल्‍याची हळहळ का बरं करावी? 
जगण्‍यातले बंध तोडायला गेलो तर क्रूरपणे मला त्‍यात आणखीनच अडकवत जातात. हळूवारपणे सोडवायला गेलो तर पायात घुटमळत रहातात. 
क्षणाक्षणाला होणारी नुसतीच पानगळ... अन् लांब पसरलेल्‍या वाटेवर पालवीचा मागमुसही नाही...

Wednesday, January 4, 2012

The Scent Short Film



मी आणि माझ्या मित्रांनी केलेली ही छोटीशी फिल्‍म. हा आमचा प्रोजेक्‍ट होता. आम्‍हाला काही प्रॉप्‍स दिले गेले आणि त्‍यावर पंधरा मिनीटांत संवादांशिवाय स्‍टोरी तयार करून चित्रित करण्‍याचं काम सोपवण्‍यात आलं होतं. त्‍यातून घडलं ते हे...

Sunday, January 1, 2012

सुप्रभात !!!

 




















रात्रीच्‍या स्‍वप्‍नांचा आस्‍वाद अजूनही डोळ्यांच्‍या कडेवर रेंगाळतोय
मन अजूनही त्‍या प्रदेशातून बाहेर पडायला कानकुण करतंय
रात्रभर उशाशी बसलेला हवाहवासा अंधार आता रजा घेतोय
आणि तेवढीच हवीहवीशी सूर्यकिरणं प्रसन्‍न पावलांनी आत येताहेत
त्‍यातलाच एक कवडसा डोळ्यांवरून घरंगळत कानापाशी येतो आणि म्‍हणतो...

चल उठ... रात्री जी स्‍वप्‍नं पाहिली ती खरी करु...
सुप्रभात !!!

नववर्षाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा...!