Thursday, July 18, 2013

समुद्रावर

काल सहज समुद्रावर गेलो.

हवेत मुसळधार पावसानंतरचा गारवा जाणवत होता. तशीच शांतताही होती. समुद्राशेजारच्‍या बागेत जाऊन बसलो. गर्दी नव्‍हती. मला अगदी समुद्राच्‍या समोर असलेली जागा मिळाली. बसलो.

तो शांत नव्‍हता. पावसामुळे थोडी खळबळ चालली होती त्‍याची. चालायचीच. माझीही होते. माझ्याजवळ एक छान रागदारी आहे. ती सुरू केली. ऐकत बसलो. समोरून थंडगार वारा वाहत होता. कानावर त्याचाच आवाज येत होता. मी कसलाच विचार करत नव्‍हतो. मनावरचा लगाम सैल सोडला होता. त्‍याला खूप राबवल्‍यासारखं वाटत होतं. ते उधळलं खरं, पण त्‍यानेही माझी अवस्‍था समजून घेतली असावी. त्‍याने मला त्रास दिला नाही. काही उकरलं नाही, काही सूचवलं नाही, कसला हट्ट केला नाही. अगदी शहाण्‍या मुलासारखं ते खेळत राहिलं. आधी ते किना-यावर उतरलं. पाण्‍यात पाय बुडवून लाटांशी खेळलं. मग परतीच्‍या एका लाटेसोबत तेही निघून गेलं दूर. तिथे गार वा-यासोबत हेलकावे खात राहिलं. ते हसतं होतं. खूप दिवसांनी मी त्याला हसताना पाहत होतो. पण त्याच्‍या डोळ्यात कसली आतूरता होती कुणास ठाऊक? ते मला काही सांगत नव्‍हतं, पण मला समजल्‍याखेरीज राहिल का?

त्‍यानं आता बोलावण्‍याची वाट का पाहावी? एवढं छान रमलंय असं वाटत असताना त्‍याला हा पाश का नाही सोडवता यावा? समुद्राशी त्‍याच्‍या खूप गप्‍पा चालल्‍या होत्‍या. ते मोठमोठ्यानं हसत होतं, खेळत होतं. त्‍याचे ते प्रयत्‍न मला ओळखीचे आहेत. मीही दुर्लक्ष केलं. उगीच मला समजलंय हे त्‍याला कळायला नको! पण त्‍याला न समजता राहिल का?

मग काही काळासाठी ते अलिप्‍त होऊन गेलं. एवढं की माझ्याकडे परतायचंय याचंही भान त्‍याला राहिलं नाही. पण त्‍याला त्‍यात आनंद लाभत होता. तो माझ्यापर्यंत पोचत होता. सगळ्या भावना दूर ठेवल्‍या आणि खूप बरं वाटू लागलं त्‍याला. अगदी शांत. स्‍तब्‍ध झालेल्‍या ओल्या रानासारखं. पानही हलत नव्‍हतं. फक्‍त शांततेचा आवाज. आयुष्‍य अचानक विस्‍तारत गेल्‍यासारखं वाटलं. समोरचा तो समुद्र पाहून ते अतिव समाधानानं भरून आलं.

मी त्‍याला पाठमोरा पाहत होतो. मला क्षणभर असं वाटलं, की त्‍यानं तसंच निघून जावं दूर कुठेतरी. अगदी पलिकडे. माझ्यापासून खूप दूर. इथं त्‍याला मी काय देणार आहे कुणास ठाऊक. तिथं जाऊन ते स्‍वतःचा आनंद तरी शोधेल. मी त्‍याला  तो शोधण्‍यात खूप मदत केली. मला नाही जमलं. ते आपलं तक्रार करत नाही, पण त्याच्‍याही आत काहीतरी चाललेलं असतं. त्‍याची घालमेल, एकटं न राहण्‍याची धडपड, जे वाटेल ते करायची निकड, भावूक होण्‍याची त्‍याची गजर... सारं सारं काही जाणवतं मला. मला प्रत्‍येक वेळी त्याच्‍या कलानं वागता येत नाही. मला वाईट वाटतं त्‍याचं. मलाही त्‍याच्‍यासारखं हवं तेव्‍हा हवं तिथे जाता आलं असतं तर? मी नेहमीच त्‍याला शहाण्‍यासारखं वागण्‍यासाठी समजावत असतो. खरं तर मी त्‍याला या चौकटींमध्‍ये कसं रहावं हे शिकवत असतो. ते नेहमीच धुसमुसळेपणा करतं. मला ते समजून घेता येतं, पण ते शहाण्‍यासारखं वागू लागलं की मला भीती वाटते त्‍याची. त्‍याच्‍या आत काय चाललंय ते मला समजेनासं होतं. आताही ते थोडं शहाण्‍यासारखंच वागत होतं. ते शांत बसलं होतं तिथे. समोर काहीतरी पाहत होतं. पुन्‍हा माझ्या मनात आलं, की त्‍यानं सरळ वाट पकडून निघून जावं दूर...

तेवढ्यात त्‍यानं मागे वळून पाहिलंच! त्‍याचे डोळे शांत होते. खूप काही अनुभवल्‍यासारखे. मी त्‍याच्‍या डोळ्यांत पाहत होतो. खूप दिवसांनी आम्‍ही एकमेकांकडे असे पाहत होतो.

ते माघारी आलं. येणारच होतं. त्‍यानं माझ्या बोटांत त्‍याची बोटं गुंफली. त्‍याचा किती विश्‍वास व्‍यक्‍त होत होता त्‍याच्‍यातून. आम्‍ही चालू लागलो. त्‍याच्‍या डोळ्यांच्‍या कडांवर रेंगाळत असलेली प्रतिक्षा माझ्या डोळ्यातून सुटत नव्‍हती. काहीतरी ऐकण्‍यासाठी किती आतूर होतं ते! त्‍यानंतर भडाभडा बोलत गेलं असतं ते. असं उंब-यावर येऊन थांबणं जिवघेणं असतं. त्‍याला तशी सवय नाही, पण अनुभव बराच आहे. ते सवयीचं होत नाही तेच बरं.

मध्‍येच कधीतरी त्‍यानं माझ्याकडे पाहिलं. मघापेक्षा ते वेगळं दिसत होतं. त्‍याच्‍या डोळ्यांतले भाव झरझर बदलत होते. रिकामी संध्‍याकाळ झेपावत होती. मला आच जाणवत होती. मी त्‍याला घेऊन गर्दीत शिरलो.


2 comments:

  1. यावर काहीही बोलू नये अन नुसतं ऐकत राहावं असं वाटलं!

    ReplyDelete