Friday, May 22, 2015

एक दिवस - गुलजार स्‍पर्शाचा



(या घटनेला दोन वर्ष झाली. त्‍या वेळेस लिहून ठेवलेला हा लेख तसाच कुठेतरी राूहन गेला होता. तो काही दिवसांपूर्वी सापडला...)

पु.ल. देशपांडे अकादमीच्‍या आवारात पोचलो तेव्‍हा संध्‍याकाळचे पावणेसहा वाजले होते. अरुण शेवते संपादित एकच मुलगी या पुस्‍तकाच्‍या प्रकाशनाची वेळ सहाची होती. वेळेवर पोचलो होतो. मनात थोडी निश्चिंततेची भावना उमटू लागणार तेवढ्यात आवारात लोकांची गर्दी दिसली आणि मनात विचार आला, जागा मिळेल ना बसायला?’. माझी पावलं लिफ्टच्‍या दिशेनं भराभर पडू लागली.
खाली उभ्‍या असलेल्‍या सगळ्यांना झपाट्यानं मागे टाकत मी पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या तिस-या मजल्‍यावर मिनी थिएटरमध्‍ये पोचलो. बहुतांश खुर्च्‍या आणि त्याही मोक्‍याच्‍या जागेवरच्‍या भरल्‍या होत्‍या. मी व्‍यासपिठाच्‍या उजव्‍या बाजूस असलेल्‍या खुर्च्‍यांमध्‍ये चौथ्‍या रांगेत बसलो. हा! इथून स्‍टेज नीट दिसतोय. माझी जागा थोडी उंच आहे. त्‍यामुळे फोटोग्राफरचा अडथळाही येणार नाही. घड्याळात पाच पंचावन्‍न झालेत. म्‍हणजे वीस एक मिनीटात कार्यक्रम सुरू होऊ शकेल. एकामागून एक असे अनेक विचार झपाट्यानं मनात येत होते. मी काहीसा अस्‍वस्‍थ, काहीसा अधीर. माझ्या आजूबाजूला बसलेल्या, हॉलमध्‍ये नव्‍याने येणा-या लोकांमध्‍ये तशीच अधिरता दिसत होती. (की माझ्या मनातलं चित्र बाहेर उमटत होतं?) हॉल भरणार हे स्‍पष्‍टच होतं. मी पुढे येणा-या कार्यक्रमासाठी उत्‍सुक होतो. उत्‍सुक होतो प्रमुख पाहुण्‍यांच्‍या आगमनासाठी! उत्‍सुक होतो प्रत्‍यक्ष गुलजार यांना भेटण्‍यासाठी!
समोर गडद निळ्या पडद्यावर ठळक अक्षरातला फलक एकच मुलगी या पुस्‍तकाचं प्रकाशन प्रसिद्ध कवी-दिग्‍दर्शक गुलजार यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याचं दिमाखानं सांगत होता. कार्यक्रमास सुलोचना चव्‍हाण, रझिया पटेल, निलम गो-हे अशी मंडळी येणार होती. पण मला त्‍यातलं चार अक्षरी नाव विशेष खुणावत होतं. गुलजार! पडद्याजवळच्‍या कोप-यात सुदेश हिंगलासपूरकर आणि अरुण शेवते यांची मुलगी शर्वरी यांची गडबड सुरू होती. काही वृत्‍तवाहिन्‍यांचे प्रतिनिधी कॅमेरा लावत होते. येणारी माणसं आपापल्‍या जागा पकडत होती. इतक्‍यात दरवाजातून सुलाचना चव्‍हाण हळूहळू आत येताना दिसल्‍या. त्‍यामागोमाग आले गुलजार! पांढरा कुरता आणि पांढरी विजार. पायात मोजडी. डोळ्यांवर चष्‍मा. चेहरा शांत. प्रसन्‍न. ते आत आले आणि सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. ते उत्‍स्फूर्त अभिवादन स्‍वीकारत गुलजार प्रेक्षागारातील खुर्चीत बसले.

यानंतर अंबरिश मिश्र यांनी माइकचा ताबा घेतला. त्‍यांनी सर्व प्रमुख पाहुण्‍यांना व्‍यासपिठावर आमंत्रित केलं. गुलजार, सुलोचना, रझिया पटेल, निलम गो-हे आणि अरुण शेवते व्‍यासपिठावर आसनस्‍थ झाले. तिकडे मिश्र यांनी त्‍यांच्‍या मिश्किल शैलीत कार्यक्रमाची सुरूवात केली. सुरुवातीसच मिश्र यांनी प्रतिमांपेक्षा शब्‍दांना वजन असतं. असं विधान केलं. ते खरं असलं तरी मला ते व्‍यक्‍तीशः फारसं पटलं नाही. त्‍यावर गुलजारांमधला दिग्‍दर्शक रिअॅक्‍ट होईल का असा प्रश्‍न मनात आला. मग मन म्‍हणालं, गुलजारांनी त्‍यांच्‍या चित्रपटांमधून प्रतिमांपेक्षा शब्‍दांनाच अधिक वाव दिला आहे. शेवटी कवीच तो!’ मनातल्‍या प्रश्‍नाचं मनातच उत्‍तर मिळालं.
कार्यक्रम पुढं सरकत होता. उपस्थितांचा सत्‍कार झाल्‍यानंतर अंबरिश मिश्र यांनी अरुण शेवते यांना बोलण्‍यास आमंत्रित केलं. शेवते यांनी मनोगत वाचून दाखवलं. त्‍यातून समजलं ते असं – एकच मुलगी या विषयावर काढलेल्‍या ऋतुरंग मासिकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या विविध लेखांचं संकलन असलेलं हे पुस्‍तक. ऋतुरंगने अशाप्रकारे एकोणचाळीस पुस्‍तकं प्रकाशित केली असून हे त्‍यांचं चाळीसावं पुस्‍तक. पुस्‍तकात गुजलार, मृणाल गोरे, सुलोचना, ना. सं. इनामदार, निळू फुले, पंडीत नेहरू, रझिया पटेल आणि निलम गो-हे अशा अनेक व्‍यक्‍तींचे त्‍यांच्‍या एकुलत्‍या एक मुलीवर लिहिलेले लेख आहेत.
अंबरिश मिश्र त्‍यांच्‍या मजेदार शैलीत बोलत होते. मधूनच ते एखादा शेर म्‍हणून दाखवायचे. त्‍यास प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. त्‍यानंतर रझिया पटेल समोर आल्‍या. त्‍यांनी गुलजारांच्‍या उपस्थितीत आपल्‍याला हिंदीत बोलण्‍याची संधी मिळावी अशी परवानगी मागितली. सध्‍याच्‍या काळात मुलगी आईच्‍या पोटापासून रस्‍त्‍यापर्यंत कुठेच सुरक्षित नाही असं सांगत अशा वेळी हे पुस्‍तक येणं फार महत्‍त्‍वाचं असल्‍याचं त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यांनी अनुभवाचे दाखले देत पुरुषकेंद्री समाजात मुलींवर साधं अंगाईगीतही उपलब्‍ध नसल्‍याचं उपस्थितांच्‍या निदर्शनास आणून दिलं. त्‍यास अंबरिश मिश्र यांनी दुजोरा दिला, मात्र सोबत मुलीवर आधारित असलेलं एक अंगाई गीतही म्‍हणून दाखवलं. सुलोचना दिदींनी मला गुलजार यांचं बोलणं ऐकायचं आहे असे सांगत पुस्‍तकास शुभेच्‍छा दिल्‍या. आमदार निलम गो-हे यांनी तरुणांमधील व्‍यक्‍तीकेंद्रीतता वाढत असल्‍याचं विधान केलं. त्‍यानंतर गुलजारांच्‍या हस्‍ते एकच मुलगी पुस्‍तकाचं प्रकाशन करण्‍यात आलं.
कार्यक्रम मुलगी या सध्‍या संवेदनशील आणि चर्चेचा विषय बनलेल्‍या मुद्द्यावर आधारित. त्‍यामुळे प्रत्‍येकाचं बोलणं कार्यक्रमाची गंभीरता वाढवत होतं. या ठिकाणी अंबरिश मिश्र यांच्‍या सुत्रसंचालनाचा आवर्जून उल्‍लेख करावासा वाटतो. त्‍यांचं मनमोकळं बोलणं, जोगोजागी पेरलेले नर्मविनोद, कधी सुनावलेला शेर, कधी एखादा किस्‍सा यामुळे वातावरणात निर्माण होणारा ताण हळूच हलका करण्‍याचं काम केलं.
आणि मग गुलजार उठले. व्‍यासपिठाच्‍या समोर बसलेला फोटोग्राफर्सचा चमू काहीसा पुढे सरसावला. गुलजार माइकजवळ आले. सभागृहात शांतता पसरली. त्‍यांनी त्‍यांच्‍या शांत, काहीशा खर्जातल्या आवाजात बोलायला सुरूवात केली. 
‘‘बेटीयोवालों का स्‍वागत’’
गुलजारांच्‍या वाक्‍यासरशी सभागृहात हलकं स्‍मीत उमटलं. गुलजारांनी सर्वप्रथम अंबरिश मिश्र यांच्‍या सुत्रसंचालनाला दाद दिली. फोटोग्राफर्सच्‍या कॅमे-याच्‍या शटर्सशिवाय सभागृहात कसलाच आवाज नव्‍हता. सारे कान टवकारले होते.
ते बोलू लागले.
‘‘समाजानं स्‍त्रीला देवी म्‍हणून पुजलं त्‍यामध्‍ये काही षडयंत्र तर नव्‍हतं ना? कारण समाजाच्‍या या कृतीत आणि तो स्‍त्रीला देत असलेल्‍या वागणुकीमध्‍ये मोठा विरोधाभास आहे. स्‍त्रीयांकडे पाहताना पुरूष न्‍यूनगंडानं पाहत असतो. ही भावना नाहीशी होण्‍याकरता पुरुषी मानसिकता बदलणं महत्‍त्‍वाचं आहे. समाजात स्‍त्रीयांबाबत घडत असणा-या घटना पाहताना पुरूष असल्‍याची लाज वाटू लागते. मला सर्व पुरूषांना सांगावंसं वाटतं, की स्‍वतःचीच स्‍वतःला लाज वाटेल असं वागू नका. सद्यघडीत हे पुस्‍तक प्रसिद्ध होणं महत्‍त्‍वाचं वाटतं. हे पुस्‍तक त्‍या व्‍यक्‍तींचं कथन आहे ज्‍यांना त्‍यांच्‍या एकुलत्‍या एक मुलगीमध्‍ये सारं जग गवसलं आहे. औलादें बेटीयों से चलती है, बेटो से नहीं’’
सभागृह चिडीचूप होऊन ऐकत होतं. गुलजार बोलत होते. गुलजार त्‍यांच्‍या एकुलत्‍या एक मुलीबद्दल, बोस्‍कीबद्दल बोलत होते. ‘‘ती जन्‍मली तेव्‍हा हातातून सतत निसटत असे. ती बोस्‍की कपड्यासारखी तलम वाटली म्‍हणून तिला बोस्‍की हे वस्‍त्राचंच नाव ठेवलं.’’
बोस्‍की अठरा वर्षांची झाली तेव्‍हा गुलजारांनी एक कविता लिहिली होती. ती कविता त्‍यांनी म्‍हटली...

वक्‍त को आते ना जाते ना गुजरते देखा,
ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सूरत,
जमा होते हुए एक जगह मगर देखा है,
शायद आया था वो ख्‍वाबों से दबे पॉंव ही,
शायद आया था वो ख़्वाब से दबे पांव ही,
और जब आया ख़्यालों को भी एहसास न था,
आँख का रंग तुलु होते हुए देखा जिस दिन,
मैंने चूमा था मगर वक़्त को पहचाना न था,
चंद तुतलाते हुए बोलों में आहट भी सुनी,
दूध का दांत गिरा था तो भी वहॉं भी देखा,
बोस्की बेटी मेरी, चिकनी सी रेशम की लडी,
लिपटी लिपटाई हुई रेशम के तागों में पड़ी थी,
मुझे एहसास नहीं था कि वहॉं वक़्त पड़ा है,
पालना खोल के जब मैंने उतारा था उसे बिस्तर पर,
लोरी के बोलों से एक बार छुआ था उसको,
बढ़ते नाखूनों में हर बार तराशा भी था,
चूड़ियाँ चढ़ती-उतरती थीं कलाई पे मुसलसल,
और हाथों से उतरती कभी चढ़ती थी किताबें,
मुझको मालूम नहीं था कि वहॉं वक़्त लिखा है,
वक्‍त को आते ना जाते ना गुजरते देखा,
जमा होते हुए एक जगह मगर देखा है,
इस बरस बोस्की अठारह बरस की होगी

गुलजारांच्‍या तोंडून त्‍यांची कविता ऐकणं हा सुखद अनुभव आहे. गुलजारांचा आवाज विलक्षण आहे. तो असा बराच आतून येत असल्‍यासारखा जाणवतो. तो धारधार नाही. त्‍याला मार्दव आहे. ऋजुता आहे. त्‍या आवाजातून येणा-या शब्‍दांचं गांभीर्य, भावनांचे चढउतार सहज आल्‍यासारखे प्रगट होतात. त्‍या आवाजात गुलजारांच्‍या मनातल्‍या सच्‍च्‍या भावना विरघळत जातात. 
बोस्‍की ज्‍या वेळी प्रसुतीवेदना सहन करत होती, त्‍या वेळी गुलजार हॉस्पिटलमध्‍ये येरझा-या घालत होते. तिच्‍या वेदनांनी गुलजार अस्‍वस्‍थ होत होते. तिच्‍या वेदना त्‍यांना जाणवत होत्या. त्‍या अस्‍वस्‍थपणाचं चित्र गुलजार शब्‍दांतून व्‍यक्‍त करतात –

समंदर देख रहा था
समंदर से, मेरी अमृत की कुंभी आनेवाली थी
समंदर कर्वटें लेता था, रह रह कर
तो बल पडते थे पानी मे
मेरी बच्‍ची की नाजुक कोख से टीसें गुजरती थीं
मुझे उस वक्‍त डर लगता था, अमृत मॉंगने से
उसे जब कपकपी आती थी तो मै कॉंप जाता था
वो प्‍यासी थी –
मगर पानी मना था
बर्फ की डलिया फिरायी जा रही थी खुश्‍क होंटो पर
समंदर अपने पानी मे ही गोते खाने लगता था
समंदर काट के कुंभी निकालो
ना काटोगे तो मर जाएगी बच्‍ची
मेरे अमृत की कुंभी को वो जब गोदी मे लेकर अब खिलाती है
मेरे अंदर से कोई मर्द कहता है,
‘‘तुम्‍हे तोफीक ही ना थी,
कि तुम ये दर्द सहते और इक इन्‍सान की तखलीख करते’’

सभागृह शांत होतं. जणू ती कविता अजूनही पाझरत असावी तिथल्‍या मनामनांत. मी अंतर्मुख होत गेलो. मुद्दे टिपून घेणारा माझा हात केव्‍हाचा थांबला होता. काही क्षणांच्‍या विरामानंतर गुलजार म्‍हणाले, ‘‘मी पुरूष असलो तरी मी मातृह्दयीच आहे. मैंने एक लडकी से मोहब्बत की.. और दुसरी बार मैने उसकी लडकीसे मोहब्बत की..’’
टाळ्यांचा कडकडाट झाला. अंबरिश मिश्र माइकसमोर आले. आता दुस-या कुणाचे शब्‍द नकोसे वाटत होते. मिश्र यांनी ते हेरलं असावं.
‘‘या शब्‍दांनंतर आणखी काय म्‍हणावं? मी कार्यक्रम संपल्‍याचं घोषित करतो’’

...

मी बाहेर पडून दादर स्‍टेशनच्‍या दिशेने रस्‍त्‍यावरून चाललो होतो. एक ओळ ओठांवर रुंजी घालत होती.

वक्‍त को आते ना जाते ना गुजरते देखा,...’

उपस्थित वक्‍त्यांनी विचारांवर जोर दिला होता. जो योग्‍य होता. गुजलारांनी जोडीला वैयक्तिक भावनांचं महत्‍त्‍व ओळखलं होतं. त्‍यांच्‍या मनात समाजात विचारांच्‍या सोबतीला कविताही असावी असं होतं का? विचार तर सर्वत्र आहेत. मग भावना, संवेदना कुठे कमी पडतायत का? बहुधा तेच असावं. एखाद्या गोष्‍टीचं महत्त्व विचारांसोबत भावनांनाही उमगणं महत्‍त्‍वाचं असतं. स्‍त्रीला योग्‍य वागणुक मिळावी, तो तिचा हक्‍क आहे हे लहानपणापासून ऐकत आलो आहे. ती अजूनही मिळत नाही. लोक विचारांच्‍या पातळीवर ही गोष्‍ट मान्‍य करताना दिसतात, भावनांच्‍या पातळीवर करणं त्‍यांना शक्‍य होत नसावं. स्‍त्रीला होणारा त्रास जेव्‍हा माझ्या मनाला वेदना देऊ लागेल तेव्‍हाच मी स्‍त्रीला योग्‍य वागणुक देईन नाही का!

भोवताली गोंधळ होता. त्‍या गोंधळात मी एक ओळ गुणगुणत चाललो होतो.
मला टॅक्‍सी मिळत नव्‍हती. वीस मिनीटांची तंगडतोड नशिबी आली.

मी एक ओळ गुणगुणत चाललो होतो.

रोजच्‍या कंटाळवाण्‍या गर्दीतून प्रवास करत होतो. तो सुसह्य होत होता, कारण गुलजारांची एक ओळ माझी सोबत करत होती...

वक्‍त को आते ना जाते ना गुजरते देखा,
ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सूरत,’
‘‘Thank God it’s not a dead poet’s society. At least not yet!’’

Tuesday, May 5, 2015

मेतकूट

कानी गुंजु दे ती पुन्‍हा
टाळमृदुंगाची गाज
जिभेवर चढवू चला
मराठी जिन्‍नसांचा साज

भाकरी ठेचा अन् पिठले
साथीला भरताचे वांगे
आमरसाच्‍या साथीने
खमंग मेजवानी रंगे

मेजवानीच्या माथ्यावर
लाल विड्याचा तो ताज
जिभेवर चढवू चला
मराठी जिन्‍नसांचा साज

पुरणाच्या त्‍या पोळीला
कुरडयांची ही जोड
कोशिंबीरीच्या पंक्तीला
मुरलेल्‍या लोणच्याची फोड

स्वादाच्या मैफीलीचा
हा अनोखाची अंदाज
जिभेवर चढवू चला
मराठी जिन्‍नसांचा साज

चवीचे उठे मोहोळ
संगे मिटक्‍यांची लय
एकेका घासात दाटे
दूर गावाकडची सय

चला जपू त्‍या सयींचा
अनमोल असा ठेवा
मेतकूटने आणला
मराठमोळ्या पदार्थांचा मेवा!