कारखान्यातल्या प्रॉडक्शन फ्लोअरवर जाणं मला मस्ट नाहीए. नाही गेलं तरी चालतं. पण तरीही जातो.
मी फ्लोअर व्हिजिट तशीही चुकवत नाहीच; पण आताशा भेटी वाढल्यात. दिवसाला किमान एकतरी... इथं आलो, की इथल्या अवाढव्य, सतत गुरगुरणाऱ्या जिवंत यंत्रांचा आवाज कानात भरुन राहतो. ऑफिसमधल्या शांततेपेक्षा इथं बर वाटतं.
या फ्लोअरवरुन वरच्या ऑफिसपर्यंत पोचलेला मुलगा म्हणून कामगारांच्या मनात जरा आकर्षण असावं. तसाही, माझा कल नेहमी त्यांच्याकडेच राहिलाय. त्यांना माझ्याशी कधीही बोलता येतं, अडचणी सांगता येतात. म्हाताऱ्या पिटूनानाचा घरमालक त्याला घराबाहेर हाकलत होता, तेव्हा जाऊन भांडलेलो मी. मागच्या वर्षी मणी अय्यरच्या पोराला ॲडमिट करुन घेत नव्हते, तेव्हा हॉस्पिटलमध्येही गेलो होतो. अरे हो! तू होतीस की तेव्हा सोबत. मुर्शिदच्या निकाहमध्ये त्याने आग्रहानं आपल्या दोघांना बोलावलेलं. सेटींगवाल्या परेशच्या नाटकाचे प्रयोग, चहावाल्या बिनूमामीच्या चाळीतली पूजा... असल्या चिरकूट गोष्टींना काय जायचं, म्हणत शर्मा नाक मुरडतो. पण मी जातो. पूर्वी जमेल तसं जात होतो. आता आवर्जून जातो.
सकाळचा व्यायाम नियमित सुरूय. जीमवरुन आलं, की अंघोळ. मग ब्रेड ऑम्लेट करतो. चहा फारच कमी केलाय. तरीही सकाळचा एकदा कपभर घेतो. ऑफिसला लवकर येणं होतं. दिवस झर्रकन उडून जातो. संध्याकाळी साडेपाचला सगळे निघाले, तरी मी बऱ्याचदा कामं काढून थांबतो. रानडेतल्या ग्रूपचा कधी बाणेरला माधवीकडे जमायचा बेत असला तर तिकडे जातो. आपण चिकन रोल खायचो ना, त्या पलिकडच्या हमरस्त्याला नवं आयनॉक्स झालंय. ते घरापासून जवळ पडतं. कधी एखादा सिनेमा पाहतो. काहीचं नसलं तर मग साडेसात-आठपर्यंत मेसमध्ये जेवून घेतो.
पार्टटाईम म्हणून प्रमोदच्या ऑफिसमध्ये काम घेतलंय. पैशांची गरज नाहीए, पण घेतलंय... ते रात्री साडेदहापर्यंत चालतं. अकराला घरी पोचतो. कधी तरी बाल्कनीचं दार उघडून तिथल्या खुर्चीवर जाऊन बसतो थोडावेळ. दुसरी खुर्ची स्टोअर रुममध्ये ठेवून दिलीय. तेव्हापासून बाल्कनी मोठी झाल्यासारखी वाटते. घराचं तसंच.
इथून वरुन पाहिलं, की शहरावर पसरलेली रात्र दिसते. कधी आपलीशी वाटते, अनेकदा परकी... शिणवटा घेऊनच घरी येतो, त्यामुळे सहसा चटकन झोप लागते.
आज गटारीची पार्टी होती फ्लोअरवर. नेहमीप्रमाणे दुपारीचं काम बंद करुन, सगळे चिकन रस्सा करायच्या तयारीला लागले. जितू आग्रहाने खाली घेऊन आला. थंडावलेल्या मशीन्सच्या शेजारी फ्लोअरवर सतरंज्या अंथरुन सगळे गप्पा मारत बसले. मुर्शिदनं तू कशीयस म्हणून विचारलं. मी काही बोललो नाही. म्हातारा वायरमन मधोमध खुर्ची टाकून, 'मस्त तर्रीवालं चिकन कसं बनवायचं' याची तीच ती रेसिपी उत्साहाने सांगत बसलाय. चिकनसोबत पाव आणलेले जेवायला.
मला सगळ्यांच्या बडबडीचे आवाज बरे वाटत होते. पण फ्लोअर रिकामा होता. माणसं होती, बडबड होती, तरीही डेड सायलेन्स जाणवत होता. नेहमी ऐकू येणारी ती हायड्रॉलिक प्रेसची तालबद्ध खडखड, गरगर फिरणारी रोलिंग, आणि मशीनगनसारखी धडधडणारी ती हेडर... सगळं चिडीचूप्प! आम्हा सगळ्यांची बडबड त्या सुन्न शांततेत शोषून घेतल्यासारखी वाटत होती. मी टाळतो अशा जागा. मंदिर, बाग, माझी बाल्कनी, हॉल, खरंतर सगळं घरंच! या शांततेत आतलं सगळं रिवाइंड का व्हायला लागतं? मला नाही आवडत शांतता.
मशीन्सजवळ गेलो. गार पडलेल्या मेटलवरुन हात फिरवला. वाटलं; यांना अजूनही कळत असेन का मी? माझ्या आतली खडखड, गरगर, धडधड...
पिणार नव्हतो. जेवून निघालो.
आठ चाळीस. घरी नेहमीपेक्षा फारच लवकर पोचलो. दार उघडलं. आत अंधार. रिकामा.
या रिकाम्या घरात काय करायचं मी?
रस्त्याकडेला टॅक्सी-रिक्षांमध्ये डोळ्यांना मोबाईलचं सलाईन लावून बसलेल्या ड्रायव्हर्सची; रात्री-अपरात्री ट्रक-उबर चालवणाऱ्यांची, इमारतींच्या गेटवर पहारा देत रात्र कंठणाऱ्या त्या सगळ्या लोकांची घरंही रिकामीच असतात का?
घरं रिकामी होतात की माणसं?
आत आलो. उजेड नको वाटला. अंधारात बसलो. भिंतीकडून टिकटिक ऐकू येतेय. वेळ चाललाय बघ... दोन सेकंद गेले... आणखी दोन...
कोण म्हणतं वेळ गेला, की सगळं ठिक होतं? वेळ जाताना सगळ्यांना फक्त झिजवत जातो. बोथट करतो. पार गुळगुळीत. संवेदनारहीत. अशा लोकांना हे जग, 'सुधारला', 'सावरला', 'शहाणा झाला' असं का म्हणत असतं? जग इतकं चुत्या का असतं?
टिकटिक सोडली तर बाकी कसलाच आवाज नाही. आतूनही नाही, बाहेरुनही नाही.
आवाज लागतात जगायला!
माणसांना आवाजांची तहान लागते, भूक सुद्धा. न ऐकलेल्या आवाजांचे पिळ पडतात, भास होतात. स्फोटही होतो कधी कधी.
हे हरवलेले आवाज कुठे शोधायचे? शोधले तर सापडतात? सांगशील?
मी जे बडबडतोय ते कळतंय न तुला? की तुलाही माझा आवाज ऐकू येत नाही?
#अडकून_पडलेल्या_गोष्टी