लॉक रुम मिस्ट्री’ हा कथाप्रकार परदेशी साहित्यात मोठ्या प्रमाणात वापरला
गेला आहे. आपल्याकडे तो फार विचारात घेतला नसला तरी आपल्याला त्याची ठेवण
माहीत आहे. एका बंदिस्त, मर्यादीत जागेत घडणारा (बहुतांशत:) थरारक आणि
रहस्यमय असा घटनाप्रसंग, ही त्या कथाप्रकाराची साधारण ओळख सांगता येईल. पण
हा घटक सिनेमासारख्या अमर्याद समजल्या जाणाऱ्या माध्यमात वापरला गेला आणि
अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती झाली. कॅमेऱ्याला आणि पर्यायाने
लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-इतर कलाकार-तंत्रज्ञ अशा सर्वांवर आलेले ते जागेचे
बंधन त्यांच्या कलात्मकतेला आणि सर्जनशिलतेला धुमारे फुटण्यास कारणीभूत
ठरले. अशा पद्धतीच्या काही उत्तम पण आगळ्या वेगळ्या सिनेमांवर टाकलेली एक
नजर…
-------------
‘लॉक रुम मिस्ट्री’ हा कथाप्रकार परदेशी
साहित्यात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. आपल्याकडे तो फार विचारात
घेतला नसला तरी आपल्याला त्याची ठेवण माहीत आहे. एका बंदिस्त, मर्यादीत
जागेत घडणारा (बहुतांशत:) थरारक आणि रहस्यमय असा घटनाप्रसंग, ही त्या
कथाप्रकाराची साधारण ओळख सांगता येईल. पण हा घटक सिनेमासारख्या अमर्याद
समजल्या जाणाऱ्या माध्यमात वापरला गेला आणि अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती
झाली. कॅमेऱ्याला आणि पर्यायाने लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-इतर
कलाकार-तंत्रज्ञ अशा सर्वांवर आलेले ते जागेचे बंधन त्यांच्या कलात्मकतेला
आणि सर्जनशिलतेला धुमारे फुटण्यास कारणीभूत ठरले. अशा पद्धतीच्या काही
उत्तम पण आगळ्या वेगळ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर…
एक प्रतिष्ठीत
कंपनीत उच्च अधिकारी पदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या
मुलाखतीचा टप्पा पार पडल्यानंतर अखेरचे आठ उमेदवार लेखी परिक्षेसाठी एका
बंदिस्त खोलीत आणले जाते. चार पुरुष - चार महिला. त्या खोलीत सात-आठ टेबल,
छताला दिवे, सर्वांच्या हालचालींचं निरीक्षण करण्यासाठी भिंतीवर बसवलेले
कॅमेरे, भिंतीवर मोठा स्क्रीन, त्याखाली परिक्षेसाठी बसवलेला डिजिटल टायमर.
एक अधिकारीवजा व्यक्ती परक्षेचे नियम समजावून जाते. परिक्षा एकूण ऐंशी
मिनिटांची. त्या काळात कुणी खोलीबाहेर जाऊ शकत नाही, कुणी आत येऊ शकत नाही.
सर्वांवर नजर ठेवायला एक बंदुकधारी गार्ड उभा आहे. त्याच्याशी बोलणारी
किंवा उत्तरपत्रिकेचा कागद खराब करणारी व्यक्ती परिक्षेतून बाद होईल. केवळ
योग्य उत्तर देणारी व्यक्ती पदासाठी निवडली जाईल. उमेदवारांना केवळ एकाच
प्रश्नाचे बिनचूक उत्तर लिहायचे आहे. प्रश्नपत्रिका वाटली जाते आणि सगळेच
भांबावून जातात. तो कागद चक्क कोरा असतो! परिक्षा सुरू होते ती ‘प्रश्न
काय?’ याच प्रश्नाने!
स्टुअर्ट हॅझलडीन याने दिग्दर्शीत केलेला
‘एक्झाम’ (२००९) हा सिनेमा थ्रिलर आणि सस्पेन्स सिनेमाचे उत्तम उदाहरण आहे.
पूर्ण सिनेमा एका खोलीत घडतो. इथल्या कॅमेऱ्याला जागेचे असलेले बंधन हेच
त्या सिनेमाचे शक्तिस्थान आहे. एकूण १०१ मिनिटांच्या या सिनेमात सर्व
व्यक्तीरेखा, त्यांचा वंश, पात्रता, गुणवत्ता यांसोबत परिक्षेची ती खोली
आणि ‘तिचे’ व्यक्तीमत्त्व अशा विविध गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार करत
‘एक्झाम’ उलगडत जातो. ‘एक्झाम’मध्ये दुहेरी शोध आहे. एक - प्रश्न काय? आणि
मग - त्याचे उत्तर काय? त्यासाठी उमेदवारांना आधी परस्परांकडे आणि मग त्या
खोलीकडे बारकाईने पाहावे लागते. त्यांचे ते पाहणे हीच त्या सिनेमाची कथा
आहे. साधी लेखी स्पर्धा जीवघेणी कशी होऊ शकेल याचे तणावपूर्ण चित्रण
‘एक्झाम’ करतो.
एकाच जागेत घडणाऱ्या सिनेमांची सुरूवात कदाचित आल्फ्रेड
हिचकॉक या रहस्यपटांसाठी नावाजलेल्या दिग्दर्शकाने केली असावी. त्याने
१९४४ साली तयार केलेला ‘लाईफबोट’ हा सिनेमा पूर्णपणे समुद्रात असलेल्या एका
लहान बोटीत घडतो. (हिचकॉक त्याच्या प्रत्येक चित्रपटात स्वत:ची एक झलक
दाखवण्याबद्दल प्रसिद्ध होता. मात्र बोटीवर घडणाऱ्या सिनेमात ते कसे शक्य
होईल? असा प्रश्न पडला. मग हिचकॉकने बोटीतल्या एका वर्तमानपत्रात लठ्ठपणा
कमी करण्याच्या जाहिरातीत स्वत:चा फोटो टाकला होता.) हिचकॉकने चार
वर्षांनंतर तयार केलेला ‘रोप’ हा ‘मर्डर मिस्ट्री’ सिनेमादेखील पूर्णपणे
एका घरात सुरु असलेल्या पार्टीच्या दरम्यान घडतो. पुढच्याच दशकात सिडनी
लुमेट याने ‘१२ अँग्री मेन’ हा ज्युरी रुममध्ये घडणारा, माणसाच्या सारासार
विचारसरणीवर भाष्य करणारा उत्तम सिनेमा तयार केला. त्याच्या तीस वर्षांनंतर
बासू चॅटर्जीनी त्याच सिनेमाचा ‘एक रुका हुआ फैसला’ या नावाने चांगला
रिमेक तयार केला.
सिनेमा एका जागेत घडत असला तर तो एकसुरी होण्याची
मोठी भिती असते. तसेच कॅमेरा सतत व्यक्तीरेखांच्या जवळ राहत असल्याने
दिग्दर्शक आणि कलाकार यांची जबाबदारीदेखील वाढते. आणि अनेक दिग्दर्शकांनी
ती जबाबदारी उत्तमरित्या पेलली. ‘फरमेट्स रुम’ (२००७) हा स्पॅनिश
थ्रिलरसुद्धा एका बंदिस्त जागेतच घडतो. मात्र इथली भिती आणि रहस्य वेगळं
आहे. चार गणिततज्ञांना एका रुममध्ये आमंत्रित करुन बंद केले जाते. त्यांना
मोबाईलवरुन वेगवेगळी कोडी घातली जातात. त्याचे उत्तर मोबाईलवरुनच द्यायचे
आहे. प्रत्येक कोडे आल्यानंतर ठराविक वेळेत खोलीच्या भिंती आतल्या दिशेने
आकुंचन पावू लागतात. आतल्या चौघांना जीव वाचवण्यासाठी वेळेत कोड्याची उकल
करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे का आणले आहे याचा शोधही घ्यायचा
आहे.
बंद जागेत सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शकांनी ती मर्यादा वेगवेगळ्या
तऱ्हेने हाताळून पाहिली आहे. ‘स्नोपिअर्सर’ (२०१३) हा उत्तम सायन्स फिक्शन
सिनेमा भविष्यात पर्यावरणाने समतोल ढासळलेल्या जगात एका धावत्या ट्रेनमध्ये
घडतो. अशी ट्रेन जी सबंध पृथ्वीला न थांबता फेऱ्या मारत आहे. बाँग-जून-हो
या साऊथ कोरीयन दिग्दर्शकाने (२०२० च्या अॉस्करविजेत्या ‘पॅरासाईट’
सिनेमाचा दिग्दर्शक) ट्रेनच्या अवकाशात समस्त मानवी समाजातील उतरंड,
माणसाच्या मनातले काळे कोपरे आणि जिवंत राहण्यासाठी हिंसा करण्याची आदिम
भावना यांचं प्रत्ययकारी दर्शन घडवलं आहे. योगायोग म्हणजे हे मुद्दे
‘पॅरेसाईट’ या सिनेमातही दिसून येतात. विन्सेन्झो नतालीचा ‘क्यूब’ (१९९७)
हा सिनेमा एका मोठ्या आकाराच्या, प्रत्येक बाजूला एक दरवाजा असलेल्या
क्यूबमध्ये घडतो. त्यातले मुख्य पात्र त्या क्यूबमध्ये बंदिस्त आहे. (या
सिनेमाची ‘क्यूब २’ आणि ‘क्यूब ३’ अशी ट्रिलॉजी आहे.) ‘दी शॅलोज’ हा २०१६
सालचा जबरदस्त थ्रिलर सिनेमा समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला
खडक, त्या खडकावर शार्कच्या हल्ल्याने जखमी होऊन अडकलेली एक तरुणी आणि
तिच्याभोवती चकरा मारणारा भुकेला शार्क अशा अवकाशात घडतो. माईक फ्लॅनागन या
दिग्दर्शकाने ‘आॅक्युलस’ हा उत्तम भयपट तयार करण्यापूर्वी त्याच नावाची ३२
मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार केली होती. एका आरशामध्ये अमानवी शक्ती
असल्याची खात्री असलेला एक तरुण ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी एका बंदिस्त
खोलीत तो आरसा आणि कॅमेरे घेऊन सज्ज होतो आणि त्या खोलीत आकाराला येतं एक
विलक्षण नाट्य!
ती फिल्म ‘OCULUS Chapter 3 - The Man with the Plan Short 2006’ या नावाने युट्यूबवर उपलब्ध आहे.
‘बॅलन्स’ ही साडेसात मिनिटांची क्ले अॅनिमेशन शॉर्ट फिल्मदेखील याच
कारणासाठी पाहायला हवी. अधांतरी तरंगणाऱ्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभी
असलेली पाच माणसं. त्यांना सापडणारी एक ट्रंक आणि त्यामुळे त्यांच्या
वागण्यात होणारा बदल अशी कथावस्तू असलेल्या या सिनेमाने १९८९ सालचा
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा अॉस्कर पुरस्कार मिळवला होता.
ती फिल्मदेखील युट्यूबवर पाहता येते.
मात्र मर्यादीत अवकाशांच्या बाबतीत सर्वात मोठे आव्हान पेलले ते रॉड्रीगो
कोर्टेस हा स्पॅनिश दिग्दर्शकाने. त्याने २०१० साली बनवलेला ‘ब्युरीड’ हा
सिनेमा एका सहा बाय तीन आकाराच्या कॉफीनएवढ्या छोट्या जागेत घडतो. एका
जिवंत माणसाला लाकडाच्या कॉफीनमध्ये टाकून जमिनीत पुरण्यात आले आहे.
त्याच्या शेजारी एक सिगारेट लायटर आणि थोडी बॅटरी असलेला मोबाईल आहे.
कॉफीनमध्ये श्वास घेण्यासाठी पुरेसा प्राणवायूदेखील नाही. त्याच्याकडे
जिवंत राहण्यासाठी थोडाच काळ उरला आहे आणी आपण कुठे आहोत हेदेखील त्याला
ठाऊक नाही. या सिनेमामध्ये कॉफीनच्या बाहेरचे एकही दृश्य नाही, मात्र
तरीसुद्धा तो सिनेमा उत्तम तणावपूर्ण अनुभव देतो. त्या व्यतिरिक्त माईक
फ्लॅनागनचा ‘हश’ (२०१६), स्टीफन किंगने लिहिलेला आणि फ्रँक डॅराबॉन्टने
दिग्दर्शीत केलेला, एका सुपरमार्केटमध्ये घडणारा ‘द मिस्ट’ (२००७),
बहुतांशत: विमानात घडणारे ‘फ्लाईटप्लॅन’, ‘नॉन-स्टॉप’, ‘रेड आय’, हे
सिनेमे, जॉन डॉवडल दिग्दर्शीत आणि नाईट श्यामलनने लिहिलेला ‘डेव्हील’ किंवा
स्टीग स्वेंडसनचा ‘एलिव्हेटर’ हे लिफ्टमध्ये घडणारे सिनेमे, टेरेन्टीनोचा
वेअरहाऊसमध्ये घडणारा ‘रिझरव्हॉयर डॉग्स’, ‘दी ग्लास कॉफीन’ हा लिमोझीन
गाडीमध्ये घडणारा सिनेमा, किंवा ‘द किलिंग रुम’, ‘सॉ’ (आणि त्याचे इतर काही
भाग), ‘इनह्युमन रिसोर्स’, ‘सर्कल’, ‘दी अॉटॉप्सी अॉफ जॉन डोव्ह’,
‘इन्फिनिटी चेंबर’, ‘दी मेथड’, ‘अननोन’, रिचर्ड लिंकलेटरचा ‘टेप’ असे एका
खोलीत घडणारे सिनेमे अशी मोठी नामावळी सांगता येते.
अगदी खऱ्या अर्थाने
बंदिस्त अशा नाही, मात्र मर्यादीत जागेत घडणाऱ्या उत्तम सिनेमांमध्ये
‘रिअर विंडो’ (१९५४) या आल्फ्रेड हिचकॉकच्या आणखी एका सिनेमाचे नाव सांगता
येईल. खरे तर तो सिनेमा एका मोठ्या इमारतीत घडतो. आपल्याला सिनेमा दिसतो तो
एका पायाने जखमी झालेल्या फोटोग्राफच्या दृष्टीकोनातून. अपघातात पाय
दुखावलेला जेफ घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे घराच्या खिडकीतून दिसणारी
इतर बिऱ्हाडे पाहणे हा त्याचा उद्योग होऊन जातो. मात्र त्या निरीक्षणामध्ये
त्याला कुठेतरी खुनाचा कट दिसू लागतो. तो त्याच्या प्रेयसीच्या मदतीने
त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. हिचकॉकचा कॅमेरा मुख्य पात्राच्या
दृष्टीकोनाशी एवढा प्रामाणिक आहे की तो कधीच खिडकी सोडून बाहेर जात नाही.
एक माणूस घरातून जेवढे दृश्य पाहू शकेल तेवढच्याच गोष्टी दाखवून हिचकॉक
रहस्यपूर्ण आणि थरारक कथा उलगडत नेतो. डंकन जोन्सचा ‘मून’ (२००९) किंवा
पिटर वेअरचा जिम कॅरी अभिनित ‘दी ट्रूमन शो’ हे सिनेमे काहीसे लौकीक
अर्थाने मर्यादीत जागेत घडतात, मात्र आशयाच्या पातळीवर त्यातली मुख्य
पात्रं एका वेगळ्या अवकाशात अडकलेली आहेत. विशेष करुन ‘दी ट्रूमन शो’ हा
सिनेमा! तो तर तत्वज्ञानाच्या पातळीवर अधिक पुढे जातो.
सिनेमा हे
माध्यम अमर्याद आहे. असे म्हणतात की, जे जे विचार करता येईल ते ते पडद्यावर
दाखवता येणे शक्य आहे. अशा स्थितीत जाणिवपूर्वक मर्यादा घालून त्या
परिघामध्ये थरार, रहस्य, नाट्य, भय, मानवी वर्तन अशा विविध गोष्टी
हाताळणारे, गोष्ट सांगण्याची वेगळी वाट स्वीकारणारे हे उत्तम सिनेमे
निर्माण झाले. एकीकडे ‘अवतार’, ‘क्लाऊड अॅटलस’, किंवा आपल्याकडचा ‘तानाजी’
असे सिनेमे पडद्यावर भव्यदिव्य चित्र निर्माण करतात. आणि दुसरीकडे कथेला
जागेची अट घालत हे सिनेमे मर्यादीत अवकाशात तेवढाच मोठा आणि उत्कट परिणाम
निर्माण करत फुलू लागतात. सिनेमा या माध्यमाची हीच तर मौज आहे.
(दैनिक 'दिव्य मराठी', रसिक पुरवणी, २६ एप्रिल २०२०)