Showing posts with label अडकून_पडलेल्या_गोष्टी. Show all posts
Showing posts with label अडकून_पडलेल्या_गोष्टी. Show all posts

Wednesday, February 18, 2026

तेवढं पुरेय

 तू फोनवर किती छान बोललीस माझ्याशी... आणि मी मोजकं बोलून थांबलो. कित्ता मुश्कील है ये... पताय? म्हणजे माझ्या आत काहीतरी बदललंय हे कळतंय मला, आणि ते तुझ्याचबद्दल आहे हेसुद्धा. आधी नव्हतं ना होत असं. पहले सब कुछ कितना आसान था. मिलना, घूमना, बात करना. अब सब मिठा मिठा सा मुश्कील हो गया है. असं वाटतं, की तुझ्याशी बोलताना मनातलं काहीतरी कधीही बाहेर येईल. आता मनात कायय हे माझं मलाच नीट कळत नाहीए. बाहेर काय येणारंय खुदा नोज! पण ही फेब्रुवारीची हवा अगदी न्यारी होऊन गेलीय.
सक्काळ सक्काळ तुझा फोन आल्यावर इतकं हरखायला काय झालंय मला? पहिल्यांदा फोन करतेयस का? घरी येऊन हक्काने आईच्या हातचा दालचा खाऊन जातेस. आणि आता अशी तू नव्याने भेटल्यासारखं काय करु लागलोय मी?
परवा आपला ग्रूप लेक्चरनंतर 'क्लासिक'मध्ये गेला. आपण कॉलेजबाहेर कितींदा दोघंच भटक भटक भटकलोय. अमर ज्यूस सेंटर, बडेमियाँ, शिवाजी मंदीर, झुडीयो... दोन साईडची रिटर्न तिकीटं काढून ट्रेनचा दिवसभर प्रवासही केलाय. पण तेव्हा नव्हतं काही वाटत. आता तुला गर्दीत भेटतानाही छातीत धडधड करत राहतं. हद है यार...
मी काउंटरला चहाची ऑर्डर देऊन येईपर्यंत सम्याच्या शेजारी बसलीस तू. माझ्या अगदी समोरच बसली होतीस. फक्त तीन फूट अंतरावर! आणि तरीही काळीज वरखाली होत राहिलं नुसतं. वाटलं, उठावं आणि तडक निघून जावं. नको चहा, नको हा ग्रूप! आणि तरीही नाहीच उठलो. उठता नाही आलं. तुझ्याशी झालेली एक पुसटशी नजरानजर सोडली तर मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलो. माझा चेहरा उतरलेला का? की डोळ्यात काही दिसलं? मग सम्याला उठवून मला शेजारी बसायला का लावलंस? जो भी हो! खुशीयों की फुलझडी उडाली नुस्ती! तीही दिसली वाटलं माझ्या थोबाडावर. समोर बसलेली कवू भुवया वर करुन करुन मला मुक्यानंच विचारतंय होती, की व्हॉट हॅपन्ड डूड?
इथं स्वतःलाच काही सांगता येईना, तर इतर कुणाला काय सांगावं? तुला तरी सांगावं का, की आतला माहोल बदललाय म्हणून? तू 'का?' विचारलंस तर काय उत्तर देऊ?रागावलीस तर काय करु? मैत्री तोडलीस तर? बोलायचं बंद केलं तर? शीट् यार! हे कित्ती 'तर, तर' आहेत! हे असं, 'ये हुआ तो क्या,' 'वो हुआ तो क्या' म्हणत आतलं मारुन मुटकून टाकायचं का? लोकं असंच करतात का? कदाचित... आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी 'शायद मैने कहाँ होता' म्हणत मस्त हुळहुळती शायरी ऐकत बसतात. किंवा बसत असतील. आय डोन्ट नो व्हॉट दी ओल्ड गाईज डू? बट आय डोन्ट वॉना बी लाईक दॅट. म्हणून मी डॅडला सांगून टाकलं. म्हटलं, तुम्ही तुमच्या आणि ममाच्या कॉलेज डेजबद्दल सांगताना म्हणतात ना, शी वॉज माय टूडे अँड टुमॉरो, तसं काहीतरी वाटतंय. तर कित्ती जोराने हसले माहितीये! म्हणाले, चॅम्प! डोन्ट रश. नेटवरचे लव्ह कोटस् आणि वन लायनर्स डोक्यात ठेवून त्याला प्रेम समजू नकोस. लव्ह इज नॉट व्हॉट दे से, लव्ह इज व्हॉट यू डू. खरंतर मला नाय कळलं, ते काय म्हणाले ते. पण पुढचं कळलं. डॅड म्हणाले, मनाला जे वाटतंय ते ऐकणं खूप कठीण असतं. इटस् टफ टू फॉलो यूअर हार्ट. कारण ते नेहमीच दुनियेच्या अगेन्स्ट काहीतरी मागतं. पार अनकम्फर्टेबल करतं. पण तेच गट फिलिंग असतं आपलं. सो लिसन टू यूअर गटस्, लिसन टू यूअर हार्ट.
मी तेच करणारंय. हे जे अस्वस्थ वाटतं ना, ते प्रेमबीम आहे, असं मला नाय वाटत. पण जे आहे ते माझंय. आणि मला ते सांगायचंय तुला. तुला कळलं तर ठिक आणि नाही कळलं तरी ठिक. पर मै आगे जाके 'शायद' नही कहूँगा. मै को तेरे साथ रैने मे सुकून मिलता, एवढं कळतंय ना मला, आणि तेवढं पुरेय.

 


 

Tuesday, February 10, 2026

गणित

"अगं ए... इतकं काय झालं चिडायला?"
"साला हरामखोर..." ती डोळे मोठ्ठे करत म्हणाली. "मला म्हणतो, असले कपलवाले चाळे पब्लिकमध्ये करायचे नायत."
"मग?"
"अरे मग काय?" तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"अरे आपल्याला तो कपल म्हणाला?" तिच्या आवाजात ढिगभर आश्चर्य आणि जरा रागही होता.
"अच्छाऽ... त्यावरून ऑफेन्ड झालीयस होय. मला वाटलं, तुझे चाळे पकडले म्हणून चिडलीयस?" त्याला माहित होतं, या वाक्यावर तिचं सटकणार. तसंच झालं.
"मी काय चाळे केले रे?" तिनं एक हात कमरेवर ठेवून, नेहमीसारखा एक डोळा बारीक करत विचारलं. त्यालाही नेहमीसारखीच गम्मत वाटली.
"२३ वर्षांची घोडी झालीयस आणि पाठकुळीवर बसतेयस माझ्या? ते पण गार्डनमध्ये? तो वॉचमेन ओरडेल नाही तर काय?"
"ह्या! ओरडू दे त्या डुकराला! आपलं बेटमध्ये काय ठरलेलं, हरलास तर मला पाठीवर घेऊन गार्डनच्या तीन फेऱ्या मारायच्या. मार आता!"
"असल्या चुत्याटीक बेटस् तुला का म्हणून सुचत राहतात?"
"लँग्वेज मिस्टर!"
"अच्छा? त्याला हरामखोर आणि डुक्कर म्हणताना कुठे गेलेली तुझी ही 'लँग्वेज'?"
"तुला का रे एवढा पुळका आलाय त्याचा? तो आपल्याला चारचौघात कपल म्हणाला, तुला नाय खटकलं?"
"मला का म्हणून खटकेल? आयला, बॉयफ्रेंड म्हणून मी बेस्ट फाईन्ड आहे. यू शुड बी थँकफुल." तो मजेत कॉलर ताठ करत म्हणाला.
"घंट्याचा बेस्ट फाईन्ड! बॉयफ्रेंड म्हणून किती दिवे लावलेस ते पाहिलं आम्ही! इतकी प्लॅनिंग करून शिवानीसोबत डेट फिक्स करून दिली तुझी. दुसऱ्या डेटला पोरगी पळाली तुझ्या हातनं."
तो जरा चरफडत म्हणाला, "एकतर मला तुझ्या प्लॅनिंग आणि सेटिंगची अजिबात गरज नव्हती, कळ्ळलं ना! आणि पळाली वगैरे काही नाही... आमची वाईब मॅच नाय झाली. म्हणून आम्ही थांबण्याचा म्युच्यूअल डिसिजन घेतला."
"ओ हो? म्युच्यूअल डिसिजन म्हणे?" ती ओठांचा चंबू करून चिडवत म्हणाली. "थापा मारायला मीच भेटते काय रे तुला? तुमच्या डिनरडेटचा स्टार्टर संपेपर्यंत पोरीने बाहेर येऊन तिच्या एक्सला फोन लावलेला."
त्याचा चेहरा उतरला, आणि तिचा खुलला.
"हाऽऽऽ मला कसं माहित हेच ना?" ती हातवारे करून चिडवून दाखवत म्हणाली. तो तिच्या हावभावाकडे शांतपणे पाहत उभा राहिला आणि म्हणाला,
"डिट्टो सर्कशीतला जोकर दिसतोय."
तशी ती झटकन सरळ उभी राहिली. त्याच्याकडे रोखून पाहत डोळ्यांनी आग ओकू लागली.
त्याला हसू आवरलं नाही. "माहितीय मला शहाणे, त्या चायनाटाऊनचा मॅनेजर ओळखीचाय तुझ्या. त्यानंच दिली तुला शिवानीची टिप."
ती निवळली.
"ए, शिवानीला तू असं काय बोललास रे, की ती डेटवरून पळून गेली?"
"सारखं पळून गेली, पळून गेली म्हणू नकोस हा!"
"म्हणणार! साल्या काहीतरी प्रचंड बोअरिंग टॉपिक काढला असणार तू. बोअर होऊन पळून गेली बिचारी."
"ज्याला व्हायचं बोअर त्याला होऊ दे. तू नाही होत ना? इतकं पुरेय."
"मी?" ती नाटकीपणे आवाज वाढवत म्हणाली. "अरे झेलते मी तुला, झेलते...!" ती छातीवर हात आपटत म्हणाली.
"तरीही माझ्याच पाठकुळीवर ये बसायला."
ती तोंडावर हात ठेवून खळखळून हसली. त्यानंही छान वाटून स्माईल केलं.
"अच्छी दिखती तू स्माईल करते हुए."
"ओहो! कॉम्प्लिमेंट? थँक्यू... पण तू कसंही हसलास ना, तरी तू माकडचं दिसतोस." ती आपल्याच विनोदावर जोरजोराने हसू लागली.
"असा एखाद्या मोमेंटचा असा पचका का करायचा असतो तुला?"
"ओ हॅल्लो!" तिने त्याच्यासमोर हात नाचवत म्हटलं.
"तेरे साथवाला मोमेन्ट लेकर मै क्या करू? उस वॉचमेन की बात को तू सिरिअसली मत ले आ... तू और मै सचमुच के कपल नैये."
"ओ हॅलो!" तो तिच्या हात नाचवण्याची ॲक्टिंग करत तो म्हणाला.
"तेरा मेरे सिवा किसी और के साथ मोमेन्ट नही बननेवाला."
"व्हॉट?" तिचे डोळे खऱ्या आश्चर्याने विस्फारले.
"व्हॉट काय व्हॉट?" तो कूलच होता.
"हे असलं ध्यान माझ्याशिवाय कोण झेलणारय? आणि माझ्यासारख्या मुलासोबत, तुझ्याशिवाय आणखी कुठल्या मुलीला इतका वेळ बडबड करायला जमलीय?"
ती गोंधळलेली.
"एक नंबरची चुत्याहेस. तुला अजूनही नाही कळतंय? अगं, गेली चार वर्ष, ना माझी गर्लफ्रेंड टिकलीय, ना तुझा बॉयफ्रेंड. पण आपण दोघे टिकलोय."
तिचे गोंधळलेल्या डोळ्यातलं गणित हळूहळू सुटायला लागलं.
"म्हणजे...?" तिनं  अविश्वासाने विचारलं.
"म्हणजे, तो वॉचमेन मघाशी खरं बोलून गेला येडे..."
तो हसत म्हणाला आणि तिचा नेहमीच टिपेला पोचणारा आवाज घशातच अडकून राहिला.

 


 

Thursday, January 22, 2026

आवाज

कारखान्यातल्या प्रॉडक्शन फ्लोअरवर जाणं मला मस्ट नाहीए. नाही गेलं तरी चालतं. पण तरीही जातो.
मी फ्लोअर व्हिजिट तशीही चुकवत नाहीच; पण आताशा भेटी वाढल्यात. दिवसाला किमान एकतरी... इथं आलो, की इथल्या अवाढव्य, सतत गुरगुरणाऱ्या जिवंत यंत्रांचा आवाज कानात भरुन राहतो. ऑफिसमधल्या शांततेपेक्षा इथं बर वाटतं.
या फ्लोअरवरुन वरच्या ऑफिसपर्यंत पोचलेला मुलगा म्हणून कामगारांच्या मनात जरा आकर्षण असावं. तसाही, माझा कल नेहमी त्यांच्याकडेच राहिलाय. त्यांना माझ्याशी कधीही बोलता येतं, अडचणी सांगता येतात. म्हाताऱ्या पिटूनानाचा घरमालक त्याला घराबाहेर हाकलत होता, तेव्हा जाऊन भांडलेलो मी. मागच्या वर्षी मणी अय्यरच्या पोराला ॲडमिट करुन घेत नव्हते, तेव्हा हॉस्पिटलमध्येही गेलो होतो. अरे हो! तू होतीस की तेव्हा सोबत. मुर्शिदच्या निकाहमध्ये त्याने आग्रहानं आपल्या दोघांना बोलावलेलं. सेटींगवाल्या परेशच्या नाटकाचे प्रयोग, चहावाल्या बिनूमामीच्या चाळीतली पूजा... असल्या चिरकूट गोष्टींना काय जायचं, म्हणत शर्मा नाक मुरडतो. पण मी जातो. पूर्वी जमेल तसं जात होतो. आता आवर्जून जातो.
सकाळचा व्यायाम नियमित सुरूय. जीमवरुन आलं, की अंघोळ. मग ब्रेड ऑम्लेट करतो. चहा फारच कमी केलाय. तरीही सकाळचा एकदा कपभर घेतो. ऑफिसला लवकर येणं होतं. दिवस झर्रकन उडून जातो. संध्याकाळी साडेपाचला सगळे निघाले, तरी मी बऱ्याचदा कामं काढून थांबतो. रानडेतल्या ग्रूपचा कधी बाणेरला माधवीकडे जमायचा बेत असला तर तिकडे जातो. आपण चिकन रोल खायचो ना, त्या पलिकडच्या हमरस्त्याला नवं आयनॉक्स झालंय. ते घरापासून जवळ पडतं. कधी एखादा सिनेमा पाहतो. काहीचं नसलं तर मग साडेसात-आठपर्यंत मेसमध्ये जेवून घेतो.
पार्टटाईम म्हणून प्रमोदच्या ऑफिसमध्ये काम घेतलंय. पैशांची गरज नाहीए, पण घेतलंय... ते रात्री साडेदहापर्यंत चालतं. अकराला घरी पोचतो. कधी तरी बाल्कनीचं दार उघडून तिथल्या खुर्चीवर जाऊन बसतो थोडावेळ. दुसरी खुर्ची स्टोअर रुममध्ये ठेवून दिलीय. तेव्हापासून बाल्कनी मोठी झाल्यासारखी वाटते. घराचं तसंच.
इथून वरुन पाहिलं, की शहरावर पसरलेली रात्र दिसते. कधी आपलीशी वाटते, अनेकदा परकी... शिणवटा घेऊनच घरी येतो, त्यामुळे सहसा चटकन झोप लागते.
आज गटारीची पार्टी होती फ्लोअरवर. नेहमीप्रमाणे दुपारीचं काम बंद करुन, सगळे चिकन रस्सा करायच्या तयारीला लागले. जितू आग्रहाने खाली घेऊन आला. थंडावलेल्या मशीन्सच्या शेजारी फ्लोअरवर सतरंज्या अंथरुन सगळे गप्पा मारत बसले. मुर्शिदनं तू कशीयस म्हणून विचारलं. मी काही बोललो नाही. म्हातारा वायरमन मधोमध खुर्ची टाकून, 'मस्त तर्रीवालं चिकन कसं बनवायचं' याची तीच ती रेसिपी उत्साहाने सांगत बसलाय. चिकनसोबत पाव आणलेले जेवायला.
मला सगळ्यांच्या बडबडीचे आवाज बरे वाटत होते. पण फ्लोअर रिकामा होता. माणसं होती, बडबड होती, तरीही डेड सायलेन्स जाणवत होता. नेहमी ऐकू येणारी ती हायड्रॉलिक प्रेसची तालबद्ध खडखड, गरगर फिरणारी रोलिंग, आणि मशीनगनसारखी धडधडणारी ती हेडर... सगळं चिडीचूप्प! आम्हा सगळ्यांची बडबड त्या सुन्न शांततेत शोषून घेतल्यासारखी वाटत होती. मी टाळतो अशा जागा. मंदिर, बाग, माझी बाल्कनी, हॉल, खरंतर सगळं घरंच! या शांततेत आतलं सगळं रिवाइंड का व्हायला लागतं? मला नाही आवडत शांतता.
मशीन्सजवळ गेलो. गार पडलेल्या मेटलवरुन हात फिरवला. वाटलं; यांना अजूनही कळत असेन का मी? माझ्या आतली खडखड, गरगर, धडधड...
पिणार नव्हतो. जेवून निघालो.
आठ चाळीस. घरी नेहमीपेक्षा फारच लवकर पोचलो. दार उघडलं. आत अंधार. रिकामा.
या रिकाम्या घरात काय करायचं मी?
रस्त्याकडेला टॅक्सी-रिक्षांमध्ये डोळ्यांना मोबाईलचं सलाईन लावून बसलेल्या ड्रायव्हर्सची; रात्री-अपरात्री ट्रक-उबर चालवणाऱ्यांची, इमारतींच्या गेटवर पहारा देत रात्र कंठणाऱ्या त्या सगळ्या लोकांची घरंही रिकामीच असतात का?
घरं रिकामी होतात की माणसं?
आत आलो. उजेड नको वाटला. अंधारात बसलो. भिंतीकडून टिकटिक ऐकू येतेय. वेळ चाललाय बघ... दोन सेकंद गेले... आणखी दोन...
कोण म्हणतं वेळ गेला, की सगळं ठिक होतं? वेळ जाताना सगळ्यांना फक्त झिजवत जातो. बोथट करतो. पार गुळगुळीत. संवेदनारहीत. अशा लोकांना हे जग, 'सुधारला', 'सावरला', 'शहाणा झाला' असं का म्हणत असतं? जग इतकं चुत्या का असतं?
टिकटिक सोडली तर बाकी कसलाच आवाज नाही. आतूनही नाही, बाहेरुनही नाही.
आवाज लागतात जगायला!
माणसांना आवाजांची तहान लागते, भूक सुद्धा. न ऐकलेल्या आवाजांचे पिळ पडतात, भास होतात. स्फोटही होतो कधी कधी. 
हे हरवलेले आवाज कुठे शोधायचे? शोधले तर सापडतात? सांगशील?
मी जे बडबडतोय ते कळतंय न तुला? की तुलाही माझा आवाज ऐकू येत नाही?
 
#अडकून_पडलेल्या_गोष्टी