'काळाघोडा फेस्टीव्हल'मध्ये इन्स्टॉलेशन लावलेल्या परिसरात शिरलं की समोरचं एक मोठ्ठी पॅरागॉनची चप्पल ठेवलेली दिसते. तिचे निळे बेल्ट स्लाईडमध्ये कन्व्हर्ट केलेत. लहानांसोबत मोठी माणसंसुद्धा लहान होऊन त्यावर घसरगुंडी खेळत होते, फोटो काढत होते. पनवेलच्या 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अर्यांश सिप्पीला नेमकं हेच हवं होतं. त्याच्या कल्पनेतून साकार झालेल्या, त्याने आणि सिद्धेश्वर चौधरी यांनी मिळून तयार केलेल्या या आकर्षक-मजेदार इन्स्टॉलेशनं नाव आहे 'सुख'!
मी तिथं पोचलो तेव्हा एक मुलगी गळ्यात हात अडकवून तिथं उभी होती. मी विचारलं, हे तयार करण्यामागचा विचार काय? तर तिनं 'हे सगळं याच्या डोक्यातून आलंय' असं म्हणत अर्यांशची ओळख करुन दिली. तो म्हणतो, की आपल्या आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी-वस्तू आपल्याला सोबत करतात. पण त्यांकडे आपलं कधी लक्षच जात नाही. अर्यांशला 'चप्पल' ही तशी, आपल्याला सोबत करणारी गोष्ट वाटते. त्यानं विचारलं, की तुला चप्पल म्हटलं की काय आठवतं?
मी म्हटलं, गीत चतुर्वेदीची ओळ - तुम्हारे बिना उतना ही अकेला हूं, जितना एक पैर की चप्पल! (तशीही त्यानं तिथं एकाच पायातली चप्पल ठेवली होती!)
तो दिलखुलास हसला. म्हणाला, प्रत्येकाचा कनेक्ट असाच वेगवेगळा. मला बालपण आठवतं. या पॅरागॉनच्या स्लिपर घालून मी जोरजोरात धावायचो, पडायचो, पुन्हा उठून धावायचो. आजच्या आयुष्यात खाली पडणं-अयशस्वी होणं हे नैराश्याकडे घेऊन जातं. मला या इन्स्टॉलेशनमधून आपल्या सर्वांच्या आयुष्यातला हा खाली-वर जाण्याचा प्रवास मजेदार असू शकतो हे सुचवायचं आहे. म्हणून आम्ही 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अप्लाईड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी चपलेची स्लाईड साकारली.
कल्पना छान, साधीसोपी होती. सादरीकरण आकर्षक होतं. पण अर्यांशची ते सारं सांगण्याची, डोक्यातलं प्रत्यक्षात उतरवण्याची एनर्जी जास्त आवडली. त्याच्यासोबत फोटो काढून घेतला.
