Monday, August 5, 2013

मोर

इथं माझ्या निर्णयांची, कर्तृत्‍वाची वाहवा होतेय
माझं केवळ असणंही केवढं मौल्‍यवान वाटतंय त्‍यांना
त्‍यांच्‍याकडून पावलोपावली मिळणारा मान
आतून सुखावून जातो मला
... पण आता तेही शिळं झालंय
प्‍लास्टिकमध्‍ये बंद असलेल्‍या खाण्‍यासारखं

बुटातल्‍या पायांची तगमग होताना
मी तिसाव्‍या मजल्‍याच्‍या खिडकीतून बाहेर पाहत असतो
वा-याचा झोत माझ्या दिशेने झेपावतो
मी त्‍याला कवेत घेण्‍यासाठी बाहू पसरतो
आणि वारा काचेवरूनच परतून जातो
... माझं कोरडंपण आणखीनच कोरडं होत जातं

कधीकाळी हातांना लागलेले रंग
आता कुठच्‍या कुठे उडून गेलेत
त्‍या रंगांनी चितारलेल्‍या रेघोट्या
अस्‍पष्‍ट झाल्‍यात आता
स्‍पष्‍ट दिसतात ते केवळ कागदांवरचे आकडे
आणि आरशात दिसणारं एक बुजगावणं
...भवतीच्‍या रंगात बेरंग झालेलं

पाण्‍यात सोडलेल्‍या होड्या
कधीच्‍या दूर निघून गेल्‍यात
त्‍यामागे धावणारी इवलीशी पावलं
थिजली आहेत किना-यावर
दूरवर जाणा-या त्‍या होड्या पाहात...

आतलं मोरपिस धुळीनं माखून गेलंय
भिती वाटतेय, त्‍याला वाळवी तर लागली नसेल ना?
कधीतरी आठवण येते त्‍याची आणि थोडी धूळ झटकतो मी
मग दिसतं त्‍याच्‍या पंखांवरचं सुकलेलं पाणी
ते ओघळ पोखरुन टाकतात मला
मी माझ्या निष्क्रियतेच्‍या शरशय्येवर हळूच निजतो
मनातलं मोरपिस माझ्यात कणाकणानं रुतत जातं
मी मनातल्या मनात वणवणत राहतो 
पंख हरवल्‍या मोरासारखा...

No comments:

Post a Comment