Showing posts with label स्‍फूटलेखन. Show all posts
Showing posts with label स्‍फूटलेखन. Show all posts

Wednesday, December 21, 2022

सॉलिट्यूड

तुला माहितीय! लडाखला रात्री जेव्हा नितळ अाकाशात चंद्र उगवतो ना, तो फारच सुंदर दिसतो. त्या थंडगार रात्री जगजीतची गझल ऐकताना मला काळाचा वेग मंदावल्याचा भास झाला होता.
धर्मशालेतल्या एका बर्फाळ सकाळी बाहेर आलो तेव्हा जगातले यच्चयावत अावाज संपून गेले होतो. माझ्या सगळ्या खुणा, सारे पाश दूर मागे पडून केवळ मी उरलो असल्याचं फिलींग होतं ते. तिथला आसमंत स्वर्गीय होता. भूतकाळातली सगळी घडामोड, मनावर उठलेले सगळे ओरखडे विसरण्यासाठी मला जगाचं हे कुठलंसं टोक गाठावं लागलं होतं. वाटलं होतं, भवताला शांत असेल तर आतली खळबळ ऐकू येणार नाही. पण गणित चुकलं होतं. आतल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पुढे जात राहिलो.
लाटांची घनगर्द गाज ऐकू येणारा ओरीसाचा शांत, निर्मनुष्य समुद्रकिनारा. पृथ्वीच्या अारंभकाळातल्या एखाद्या क्षणासारखा वाटला होता मला. मी तिथंच, काळोख्या रात्री आकाशावर उमटलेली, रात्रीच्या एका टोकाकडून पहाटेच्या दुसऱ्या टोकाकडे मूकपणे वाटचाल करणारी नक्षत्रं पाहिली. सृष्टीचं हे अलगद होत असलेलं स्थित्यंतर अगदी देखणं होतं. तरीदेखील हवं असलेलं सापडत नव्हतं.
कशाने शांत होत असेल माणूस? आत पेटलेल्या आगीवर उतारा काय असतो? कळतं नव्हतं. नक्षत्रं डोक्यावर घेऊन दुसऱ्या टोकाकडे चाललो राहिलो.
तमिळनाडूतल्या घनदाट अरण्यात पडणारा मुसळधार पाऊस पाहिला. बोचरी थंडी वाजवणारा. सृष्टीच्या कल्लोळात धुंद करुन टाकणारा. पाऊस थांबला. झाडं निथळत राहिली. शांतता थेंबाथेंबानं साचत गेली. पण आतला कल्लोळ निवला नाही.
विलक्षण समाधानाने अोथंबून-अोसंडून टाकणारं एकटेपण ठिकठिकाणी शोधत राहिलो. त्या क्षणामध्ये सॉलिट्यूड गवसेल असं वाटलं होतं. नाही सापडला तो.
पण तू भेटलीस!
एकाचवेळी रेनफॉरस्टमधल्या मुसळधार पावसासारखी, जैसलमेरमधल्या स्निग्ध-तप्त सायंकाळसारखी.
तुझ्यासोबत थांबावसं वाटलं. तूही थांबू दिलंस. तू माझ्या वाटेनं सोबत चाललीस. आपण विशेष काही बोललो नव्हतो. मी माझी भूतं तुझ्यासमोर नाचवली नव्हती. तरीदेखील तुला मला समजून घेता येतंय असं का वाटत राहिलं?
तू तुझ्या वाटेनं पुढं जाऊ लागलीस तेव्हा मी तुझ्यामागे आलो. नाहीतरी माझी अशी वाट कुठे उरली होती मला? तुझ्यामागे चालताना मला वाट शोधण्याची भ्रांत उरली नव्हती. तुला पाहून तुझ्या गोष्टी करताना, त्यातून तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी आनंदाची लकेर शोधताना मला इतर गोष्टींचा विसर पडत चालला होता.
आणि आता जेव्हा तुझ्या छातीवर डोकं टेकवून मी शांत पहुडलोय, तेव्हा कितीतरी दिवसांनी मला आतलं सारं काही शांत शांत होत गेल्यासारखं जाणवतंय. तुझ्या छातीतली हलकी किणकिण माझ्या कानात शिरतेय. तुझ्या अस्तित्वाचा तो मंदनाद रिचवत माझं मन निद्रेच्या, स्वप्नांच्या काठावर हलकी अावर्तनं घेतंय. या क्षणात मला हवं होतं ते सापडल्यासारखं वाततंय. 
प्रचंड निश्चिती आणि जिव्हाळा. तुझ्या स्पर्शातून माझ्याकडे पाझरत येणारी शांतता. हाच तो सॉलिट्यूड असेल का?
काही असो, पण या क्षणात एकाचवेळी एकटं असण्याची आणि तू सोबतही असण्याची ही दुहेरी फिलिंग भारीय!

Thursday, May 10, 2018

सरळ

ही रेष खूपच कंटाळवाणी झालीय बाबा
किती सरळ, लांबसडक नुसती
कंटाळा येतो इथून चालायला

मला रेष कशी हवी होती
मस्‍तपैकी वेडीवाकडी वळणं घेतं चालणारी
इथे तशी वळणं नाहीत असं नाही
आहेत
पण त्‍यात ती गम्‍मत नाही ना!

त्या वळणावळणांतून पायवाटा फुटाव्यात,
अस्पर्श रानातून त्यांनी धावत जावं
मग पुन्हा येऊन वाटेला मिळावं,
असं काहीतरी व्हावं की छान...

पण नाही!
चाललोय मी सरळ
तुमचीही गत वेगळी नाही.

Wednesday, February 4, 2015

जपणूक

तुझे किती क्षण जपून ठेऊ गं?
तू बकुळीची फुलं गोळा करत होतीस तो क्षण...
तू माझा हात हातात धरून माझ्याकडे पाहत होतीस तो क्षण...
की तू दूरवरून चालत येताना माझ्याकडे पाहत स्मित करत येतेस तो क्षण...
साले हे क्षणंच जपावेत
माणसं जपणं परवडत नाही

Tuesday, July 23, 2013

निदान एका क्षणासाठी!

ए खिडकीतून दिसणा-या पावसा...
तुझ्या सरींची सरगम किती सुरेल आहे रे!
तुला माहितीय का तू संगीतकार आहेस ते?
पार वरच्‍या मजल्‍यावरुन तुला पाहताना ऐकू येणारा तुझा मंद नाद
चाळीतल्‍या घराघरांच्‍या छपरांवर निनादणा-या तुझ्या धारा
झोपड्यांच्‍या छतांतून गळणा-या थेंबांची खालच्‍या भांड्यात होणारी टपटप
शेंड्यावरच्‍या पानांवरुन खाली गळून पडलेल्‍या पानापर्यंत वाहताना
पानोपानी तुझा बदलत जाणारा स्‍वर...
नदीत, समुद्रात, तळ्यात, रानात, रस्‍त्‍यावरच्‍या खड्ड्यांमध्‍ये कोसळताना
प्रत्‍येकवेळी तुझ्यातून उमटणारी धून निराळी असते
तू प्रत्‍येक वेळी वेगळा ऐकू येतोस
मीही ऐकू येत असेन का रे असाच वेगळा?
माझ्यातूनही बरसावेत असे मंदमधुर नाद
स्‍वतःला चिंब भिजवून टाकता यावं मला
बरसण्‍याच्‍या आनंदात तू विसरत असशील ना स्‍वतःला!
मग मलाही बरसू दे!
निदान एका क्षणासाठी!

Thursday, July 18, 2013

तेवढ्यापुरतं

मी घराबाहेर पडतो तेव्‍हा थेंबांनी भरलेलं आभाळ जणू काही माझीच वाट पाहत असतं. मी चालू लागतो तेव्‍हा सगळे थेंब माझ्याचकडे पाहत असतात. टक लावून. एवढ्या उंचावरून माझा चेहरा दिसत नसावा त्‍यांना, पण माझी पावलं दिसतात. कधी विश्‍वासानं पडलेली, कधीच आपल्‍याच धुंदीत चाललेली, कधी गुणगुणत तर कधी मिणमिणत.

माझ्या मनाचा सूर त्‍यांना कसा सापडतो कुणास ठाऊक? पण तो सापडतो एवढं मात्र खरं!

एकदा का तो सूर सापडला, की ते एकेका थेंबांने डबडबलेलं ते आभाळ माझ्याकडे झेप घेतं. त्‍यांच्‍या त्‍या झेपेत माझीच आतूरता असते आणि मी तिकडे माझ्याच विचारात असतो. ते आभाळ असं अनेकदा पावसासोबत माझ्याकडे झेपावलं आहे. मला मात्र मान वर करून पहायची भीती वाटत असते. जर ते धावून येताना नाही दिसलं तर अपेक्षाभंग होणार! कितीदा करून घ्‍यावा? त्‍यापेक्षा न पाहिलेलंच बरं. तो नाही आला तरी काही वाटत नाही, पण तो येतो तेव्‍हा मोठं समाधान मिळत असतं.

मग ते सारे थंडगार थेंब आवेगानं येऊन बिलगतात मला. पाण्‍याची मोठी लाट रोंरावत येऊन आदळते जणू. मला त्‍या थेंबांना कधीच कवेत घेता येत नाही. पण मी खूप आसुसून अनुभवतो त्‍यांना. मोहरुनही येतो. अंतर्मुख होतो. फुलतो देखील.

पण हे सगळं खूप कमी काळासाठी असतं. जेवढा वेळ मी माझा सभोवताल, जग, माणसं सारं विसरुन त्‍यात रममाण होतो केवळ तेवढ्याच क्षणांसाठी. त्‍यानंतर पुन्‍हा ओहोटी सुरू. पावसाचा अनुभव तोच असतो. आनंदही तोच असतो. मात्र काही क्षणांपुरता त्‍याचा झालेला स्‍पर्श हरपलेला असतो. तो स्‍पर्श तेवढ्यापुरताच असावा.

चला, तेवढं तर तेवढं...

Wednesday, July 17, 2013

एकांत

त्‍या एकांतात तुला भेटण्‍याचा वेगळाच आनंद असतो
तुझा येण्‍यास कधी नकार नसतो
तुझी जाण्‍याची घाई नसते
कल्‍पनेच्‍या पलिकडे पसरत गेलेली वेळ
हात जोडून समोर असते  उभी... नतमस्‍तक होऊन!
मला हवं तेवढा वेळ तुझ्यासोबत बसता येतं, तुला पाहता येतं
तिथे ना कुणाची भीती असते ना कुणाचा विचार असतो
सगळं काही आपलंच असल्‍यासारखं...

मी तुझे संवाद रचतो
तू ते तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलतेस
अगदी आत कुठंतरी खोलवर स्‍पर्शतील असे...
त्‍या वेळी किती ओलावा असतो गं तुझ्या शब्‍दांत!
इतर वेळी तू प्रकर्षाने टाळतेस तो...
तू माझ्या प्रश्‍नांना मला हवी तशी उत्‍तरं देतेस
मी मला जे ऐकायचंय ते ऐकतो
मग मी कधीतरी सुखावून घेतो
अनेकदा दुखावून घेतो
आपण परस्‍परांशी बोलत राहतो
न दिसणा-या वाटेवर चालत राहतो

मला सारं जग गोठवून टाकता येतं तिथे
वेळ मूठीत घेता येते, हवं तसं जगता येतं
तुझ्यासोबत राहून गेलेला डाव मांडता येतो
तिथल्‍या कणाकणावर माझं स्‍वामित्‍व चालतं
पण ती माझ्या मनाची समजूत...

खरं तर डावं कधीच चार घरांपुढे सरकत नाही
सालं त्या एकांतातही तुझा हात धरायचं मनात येत नाही
तू तसं का करत नाहीस हे विचारण्‍याचं धाडस होत नाही
तिथंही तू निघून जाण्‍याची भीती पाठ सोडत नाही
असं का व्‍हावं?

शेवटी माझा स्‍वतःचा असा एकांतही उरत नाही
जिथं तो आहे तिथं जाता येत नाही
त्‍या तिथं, जिथं माझ्यासमोर मीच असतो
स्‍वतःच्‍याच डोळ्यात पाहत...
स्‍वतःला स्‍पर्शत...
स्‍वतःच्‍याच आत उतरत...

एक अख्‍खं विश्‍व हरवल्‍याचं दुःख मोठं असतं
स्‍वतःला न भेटण्‍याची सल तेवढीच बोचरी असते
थोडा गारवा, थोडा विसावा, थोडं जगणं खूप दुर्मिळ असतं
उघड्या बोडक्‍या वाटा अंतापर्यंत धडपडत गेलेल्‍या असतात
त्‍यांचं दुसरं टोक लवकर येईल तर बरं...

Monday, June 24, 2013

जखम

त्‍यानं सोडलेलं ब्रम्‍हशिरस्‍त्र त्‍याला माघारी घेता आलं नाही. शब्‍द माघारी न घेता यावेत तसे. व्‍यास कोपले.
त्‍याला अमृतबिंदूपासून कपाळाच्‍या मध्‍यभागी तयार झालेला जन्‍मजात चिंतामणी काढून द्यावा लागला. नव्‍हे, अर्जुनाने त्‍याच्‍याकडून तो ओरबाडून घेतला. मण्‍याच्‍या जागी जखम झाली. भळभळून वाहणारी. कृष्‍णानं शाप दिला त्‍याला.
तो आजही ती जखम भरावी म्‍हणून दारोदार तेल मागत फिरतो म्‍हणे...
उरात शाप घेऊन मस्‍तकावर जखम वागवत त्‍याची वणवण सुरू आहे!
एवढ्या मोठ्या कालखंडात त्‍याला साधं तेल देणारा एकही मनुष्‍य का भेटला नाही?
कदाचित त्‍याची जखमही शापित असावी.
तो कधीही मरणार नाही आणि ती कधीच भरणार नाही.
ती जखम कधी भरलीच तरी त्‍याला मण्‍याविनाचं आयुष्‍य कंठावं लागणारच!
दुहेरी शाप...
पण जखम भरली तर मण्‍याच्‍या अस्तित्‍वाची खूणही पुसली जाईल. त्‍याला चालेल का ते?
तो नक्‍की जखम भरण्‍यासाठी दारोदार फिरतो का?
जखमा या अशाच असतात का?
मिटवायच्‍याही असतात आणि टिकवायच्‍याही...


Monday, June 17, 2013

एका पहाटे...

मी पहाटे तुला उठवायला आलो होतो
मिठीत निजलेली तू मोहक दिसत होतीस
बाहेर अजून उजाडायचं होतं
तुझी हालचाल करणारी बुबुळं
तुझ्या स्‍वप्‍नांची कथा सांगू पाहत होते
तू या कुशीवर वळलीस आणि मला सामोरी आलीस
तिथेच तुझ्या शेजारी तुझ्या चेह-यासमोर निजलो
मी इतक्‍या जवळून तुला प्रथमच पाहत होतो
मला तुझ्या श्‍वासांची लय ऐकू येत होती
त्‍यांची उब जाणवत होती
तुझा सहवास, तू जवळ असल्‍याची जाणिव किती वेगळी होती!
हात हातात घ्‍यावा का तुझा? मनाशी थोडावेळ हुज्‍जत घातली.
शेवटी मनानंच माघार घेतली. हात धरला तर सोडवेल काय?
मग तुझ्या विस्‍कटलेल्‍या बटा तुझ्या कानामागे सारल्‍या
तुला तसाच स्‍पर्श करून जागं करावं असा विचार केला...
फक्‍त विचार...
मी काय म्‍हणून तुला जागं करावं?
कोण मी तुझा? काय करतोय इथे?
मला उत्‍तरांची गरज नाही, पण तुला भासली तर कुठून देऊ?
मी नाही तर तो जागं करील... आपलीच समजूत...
तुझी झोप चाळवली गेली होती
मी माघारी फिरलो
दवबिंदू पडायची वेळ झाली होती...

Saturday, June 8, 2013

पुन्‍हा...!

तू घराबाहेर पडण्‍याची तयारी करत असशील
आणि माझं आभाळ भरून येत असेल
तू ''येते रे'' म्‍हणून उंब-याबाहेर पडशील
तेव्‍हा मी कोसळण्‍याच्‍या कड्यावर असेन
तू बाहेर पडशील
मी झेपावत येईन
हलकेच स्‍पर्श करेन तुझ्या कपाळाला
तू वर आभाळाकडे पाहशील
मी ओघळू लागेन
तुझ्या भुवयांना वळसा घालत
मी खाली येईन
जाताना मान वेळावून
मी डोळ्यात पाहिन तुझ्या
तुझे डोळे तेव्‍हा पर्समधला रुमाल शोधण्‍याची खटपट करत असतील
मी खट्टू होईन
पण तुला तो सापडणार नाही
मग तू हात उंचावशील तुझा
तुझ्या गालावरून हलकेच वाहताना
मी मंदावलेला असेन
तू चार बोटांनी पुसून टाकशील मग मला
चिंब भिजेन मी...
आता मला घाई असेल
पुन्‍हा आभाळात जाण्‍याची
पुढच्‍या पावसात
पुन्‍हा झेपावण्‍यासाठी...

Monday, May 27, 2013

गुंता


माणसाचं मन आहे ना, हे एक खूप अजब ठिकाण आहे. तिथे कोणत्‍या आणि काय घडामोडी सुरू असतील हे कुणालाच सांगता येणार नाही.
म्‍हणजे मी जेव्‍हा अस्‍वस्‍थ होतो ना तेव्‍हा माझ्या मनात खूप मोठा गलबला होतो. आतलं सगळं ढवळून निघत जातं. कुठल्‍याही एका विचारावर लक्ष केंद्रित करणं अशक्‍य होऊन बसतं. मग सुरू होतात मनाचे चित्रविचित्र खेळ. एक अस्पष्‍ट असं जग उभं राहतं मनाच्‍या पटलावर. त्‍यात खूप काही असतं. आयुष्‍यातील अनेक व्‍यक्‍ती, कधीच न घडतील अशा घटना, आवाज, संवाद, सुख-दुःख-आनंद-निराशा अशा कित्‍येक भावनांची भरती... बरंच काही. 
हे सगळं एकामागोमाग एक येत जातं. त्‍याची गती वाढत जाते. मग त्‍यांचं सुटेपण हरवत जातं. प्रत्‍येक गोष्‍टीच्‍या पोटातून दुसरी गोष्‍ट बाहेर पडायला लागते. गलका होतो सगळ्यांचा.  डोळ्यांसमोर एकाचवेळी अनेक घटना दिसायला लागतात. विविध स्‍वरूपाच्‍या. विविध अंगाच्‍या. प्रत्‍येक घटनेचं स्‍वरूप वेगळं. स्‍तर वेगळा. भाव वेगळा. कुठे सगळं स्थिरस्‍थावर असतं. कुठे सगळाच विध्‍वंस झालेला असतो. कुठे मला कशाचं तरी उत्‍तर सापडलेलं असतं तर कुठे सगळं हरवल्‍याची भावना असते. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर जगावं लागतं. सगळीकडे गुंतावं लागतं. गुंतलो नाही तर कशाची तरी रूखरूख लागते. मन पोखरणारी. 
बरं! हे सगळं घडतं अगदी एकाच वेळी. फक्‍त वेगवेगळ्या स्‍तरांवर. त्‍या स्‍तरांत घडणा-या घटनांचा परिणाम माझं मन रिचवू पाहत असतं. मी एकाच क्षणी विविध पातळ्यांवरील घडामोड पाहत असतो. ब्रम्‍हदेवानं ब्रम्‍हांडाची उत्‍पत्‍ती पाहिली असेल तशी. त्‍या सर्व स्‍तरांवरून माझ्याकडे वाहणारे निरनिराळे प्रवाह मला घटाघटा प्‍यावे लागतात. ते सारं डोक्‍यात चढत जातं.  
मग अस्‍वस्‍थेच्‍या एकामागोमाग एक अशा कितीतरी पाय-यांवरून मी टप्‍पे खात कलंडत जातो. त्‍या -हासाला अंत नसतो. फक्‍त कडा असते. त्‍यावरून पुन्‍हा खाली कोसळत जाणं... जणू मी एखाद्या निर्वातात सूर मारला असावा आणि तळाच्‍या दिशेनं वेगानं जातच रहावं... जातच रहावं... जातच रहावं...
त्‍या कोसळण्‍याला पार नसतो. किनारा नसतो.
क्षमाही नसते.
मी भेलकांडत असतो. सावरायला कुणी नसतं. मीही नाही.
मला मिळालेली गती सहन  होण्‍यापलिकडे वाढत जात असते. किती अंतर कापलंय याचा अंदाज नसतो. किती खोल चाललोय याचं भान नसतं. पुन्‍हा वर जाता येईल की नाही ते ठाऊक नसतं.
आणि दुस-याच क्षणी मी माझ्या जागेवर बसलेला असतो.
अगदी शांत. निश्‍चल.
कानावर पडणारा वेगाचा आवाज क्षणार्धात नाहीसा झालेला असतो. शांतता विचित्र भासत असते.
गुंत्‍यातून बाहेर पडल्‍याची भावना असते. पण फक्‍त भावना.
गुंता तसाच असतो. 
गुंतलेला...


Saturday, March 3, 2012

पानगळ

माणसाला माणूस म्‍हणून समजून घेणं खरंच एवढं अवघड असतं का?
राग, लोभ, वर्चस्‍वाची आपणच चढवलेली आवरणं गळून पडायला अजून किती वेळ लागावा?
पिंज-यात कोंडून ठेवलेले पंख झुरत रहातात आणि गजांचा माज उतरता उतरत नाही. 
झाड कोमेजून गेल्‍यावर पाणी न घातल्‍याची हळहळ का बरं करावी? 
जगण्‍यातले बंध तोडायला गेलो तर क्रूरपणे मला त्‍यात आणखीनच अडकवत जातात. हळूवारपणे सोडवायला गेलो तर पायात घुटमळत रहातात. 
क्षणाक्षणाला होणारी नुसतीच पानगळ... अन् लांब पसरलेल्‍या वाटेवर पालवीचा मागमुसही नाही...

Thursday, December 1, 2011

नदी

   खळखळत वाहणा-या त्‍या नदीला पाहून मी मंत्रमुग्‍ध झालो होतो. तिचा नाद, तिचा प्रवाह, तिचं अस्तित्‍व या सगळ्यात गुंतलो होता. काठावर बसून तासनतास तिच्‍याशी बोलताना मनःशांती अनुभवली होती. प्रेम, स्‍नेह, व्‍याकूळता, ओढ असे अनेक भावरंग मला पाहता आले. आयुष्‍याबद्दल किती अश्‍वस्‍त होतो मी.
    मग माझ्या पाठीमागे काहीतरी घडलं म्‍हणून मागे वळून पाहिलं तर कानांना ऐकू येणारा खळखळाट अचानक थांबला. समोर पाहतो तर नदीचा बर्फ झालेला. मी घाबरून दोन्‍ही हातांनी बर्फाचं ते आच्‍छादन जोरजोरात ठोठावू लागलो. पण तो प्रवाह कुठे लुप्‍त झाला कुणास ठाऊक? तो बर्फही एवढा कठोर की त्‍या प्रवाहाचे ओघळही तिथे दिसत नाहीत.
    अजूनही कधी कधी मी त्‍या काठावर जाऊन बसतो. आता नदी नसते... तिचा आवाज नसतो... तो ओघवता प्रवाह नसतो... असतो तो मनाला बोचणारा जीवघेणा थंडगार बर्फ... भावनाशून्‍य दगडासारखा...
 

Saturday, May 21, 2011

स्‍वप्‍नं

स्‍वप्‍नं खरंच किती छान असतात हे आज कळलं
आयुष्‍यात पूर्ण न होणा-या इच्‍छा स्‍वप्‍नात पूर्ण करण्‍याची संधी असते
आज अशीच एक इच्‍छा पूर्ण झाली स्‍वप्‍नात...  

मनाच्‍या तळघरातून एक पिसं हळूवार उडत आलं तळहातावर 
त्‍याला स्पर्श करताना किती संवेदना जाणवत होत्‍या हाताला
हे खरं नाही, हे जाणवत असूनही तो क्षण खरा मानला मनानं
क्षणभरात खूप काही जगल्‍यासारखं वाटलं...


हे सगळंच आयुष्‍य एक स्‍वप्‍नं असतं तर?

मग त्‍या पिसाशी बोललो मी
हळुवारपणे.....
शब्द ध्यानात नाहीत माझ्या
केवळ त्यांचे नाद गुंजतायत कानात
 
मग दाटून आली सर्वांगात एक विलक्षण अनुभूती
उठल्‍यावर शरिरभर मंद समाधानाचा एक सुंदर तरंग पसरलेला होता
किती सुंदर सकाळ आहे आजची....!