Friday, September 27, 2019

जीना

इस साल उलझने कुछ यू बढी
के ये दर्द मेहसूस भी ना हुअा
ना कोई जख्म कुरेदा
ना कोई याद उभरी
ना कोई जाम बना
ना कोई साकी जना
ना उलझने बढी
ना दिल मचला
ना मैफिल सजी
ना नज्म बनी
बस,
बिना कोई दर्द मेहसूस करे
खुशहाली से जी रहे है
अब तुम ही कहो
ये भी कोई जीना हुअा?

Friday, June 28, 2019

नदीचा घाट

पावसानं पहाटेपासून शहराला झोडपून काढलं होतं. हातातली छत्री अाणि खांद्यावरची बॅग सांभाळत तो रेल्वे स्टेशनवर पोचला. गाडी प्लॅटफॉर्मवर अाली. तो सरसरून गर्दीत शिरला. झपाट्यानं दारातून अात जात त्यानं विंडो सीट गाठली. बॅग मांडीवर ठेवली. पुस्तक काढलं. मोबाईलवर जॅझचा एक ट्रॅक सुरू केला. इअरफोन कानात टाकले अाणि पुस्तक वाचू लागला.
गाडी हळुहळू गच्च भरत गेली. पावसाचा भिजका, कुबट, तेल-घाम-सेंट मिश्रीत वास डब्यात भरून राहिला होता. या शहरात येण्यापूर्वी पावसाला गंध होता. अाता वास उरलाय. त्याला क्षणभर स्वत:चंच ते वाक्य अावडून गेलं. मग पुढच्याच क्षणी त्यानं त्यावर काट मारली. तो पुन्हा हातातल्या पानांमध्ये गुंतला.
गाडी निघाली तसा पाऊस थांबला. बंद असलेल्या खिडक्या उघडल्या. काही स्टेशनं गेल्यानंतर त्याचं बाहेर लक्ष गेलं. पावसानंतरचा गारवा त्याच्या चेहऱ्यावरून वाहत होता. अशी अाल्हादकता पुन्हा केव्हा मिळावी? अशा विचारानं त्यानं पानांसोबत डोळेही मिटले...

धुळीनं माखलेल्या लाल रस्त्यावरून सायकलची चाकं धावत होती. शाळेतून मिळालेला रिझल्ट घेऊन त्यानं भरल्या मनानं नदीच्या दिशेनं सायकल दामटली. नेहमीचा रस्ता. त्याला त्यावरून जाताना तिच ती घरं, झाडं, देवळं दिसत होती. लहानपणापासून सवयीचं झालेलं ते चित्र अाता पुन्हा दिसणार नाही म्हणून तो डोळ्यांत साठवून घेत चालला होता.
विहीरीजवळचं वळण घेऊन तो नदीच्या घाटावर पोचला. ती अाधीच पोचली होती. कापसासारखं मन अाठवणींच्या झडीनं भिजून अाणखी जड होऊन गेलं. सायकल वडाच्या झाडाला लावून तिच्याकडे जाताना त्याचे पाय उचलत नव्हते.
ती शांतपणे पायऱ्यांवर बसलेली होती. त्याला तिचा चेहरा नितळ भासला. पाऊस पडून गेला असावा. तो शेजारी बसला. दोघं एकमेकांकडे पाहत राहिली. तिच्या भुऱ्या डोळ्यांकडे पाहताना त्याला एकाच वेळी खूप शांतता अाणि खूप खळबळ जाणवत होती. दोघांचे हात पायरीवर परस्परांच्या जवळ होते. तसूभराचं अंतर ठेऊन. ती नेहमी केस मोकळे सोडायची. अाज ती घट्ट वेणी बांधून अाली होती. त्यावर गजरा माळला होता. त्याला तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन जवळून पाहायची खूप इच्छा झाली. केवळ इच्छाच...
''गाडी कधीची अाहे?'' तिनं विचारलं.
''उद्या सकाळची.''
''कधी पोचणार?''
''रात्री नऊ वाजतील मुंबईला पोचायला. मामा येणारय न्यायला.''
''तू माघारी कधी येणार?''
तो गप्प राहिला. त्याला काय सांगावं ते कळलं नाही.
''येईन ना उन्हाळ्याच्या सुटीत.'' त्यानं घशातला अावंढा गिळत उत्तर दिलं. ती त्याच्याकडे पाहून समंजसपणे हसली.
''अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. दोन वर्षांनी दहावी अाहे. तिकडे जाऊन क्लास...''
''अापण हेच बोलणार अाहोत का?'' तो दुखऱ्या अावाजात म्हणाला.
''मग काय बोलायचं अापण?'' तिनं सहज विचारलं अाणि त्याला जाणवलं की ते दोघे अभ्यास, शाळा, घर याच्यापलिकडे कधीच काही बोलले नव्हते. मग हा अापलेपणा, ही जवळीक कधी अाणि कशी निर्माण झाली?
''तुझी शाळा दूर अाहे म्हणे तिकडून?''
''हो! ट्रेनने जावं लागणारय असं बाबा सांगत होते.''
तिनं अोढणीखालच्या पिशवीतून एक पुस्तक बाहेर काढून त्याला दिलं.
''तुला प्रवासात वाचायला.''
''तिकडे ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. एवढ्या गोंगाटात कसं काय...''
''गर्दी अाणि गोंगाट असतो म्हणूनच देतेय.''
त्यानं तिच्या डोळ्यांत पाहिलं. समोरून वाहणाऱ्या नदीचं इवलंसं प्रतिबिंब तिच्या डोळ्यांत पडलं होतं. ते दोघे मूकपणे उठले. त्यानं सायकल हातात घेतली. दोघे गावाच्या दिशेने चालत राहिले. त्याची सायकल मातीत उमटलेल्या चाकाच्या खुणा पुसत गेली...

''यात्री कृपया ध्यान दे...''
स्पीकरच्या अनाऊन्समेंटने त्याचे डोळे उघडले. त्यानं बाहेर पाहिलं. दादर अालं होतं. दाराजवळची माणसं उतरायच्या अाधीच बाहेरची गर्दी धडधडत अात शिरली. मोकळ्या झालेल्या जागा पापणी लवेपर्यंत पुन्हा भरल्या गेल्या. डब्यात कुठूनतरी भोजपुरी गाणी ऐकू यायला लागली. कानांना न समजणारी कित्येक संभाषणं हवेत लहरू लागली. खिडकीबाहेरची गर्दी निरनिराळे अावाज घेऊन वाहायला लागली. ट्रेनमधली अनाऊन्समेंट पुन्हा सुरू झाली. ती संपते तोपर्यंत होम लोनची एक जाहिरात तारस्वरात स्पीकरमधून पाझरू लागली. त्याचाही फोन वाजला. ह्युमन रिसोर्समधल्या प्रिती बावेजाने त्याला संध्याकाळच्या पार्टीचं इन्व्हीटेशन दिलं. त्यानं फोन ठेवला. गाडी पुन्हा सुरू झाली.
त्यानं हातातलं पुस्तक उघडलं. नजर पानांमध्ये गुंतली. पुन्हा तो गार वारा वाहायला लागला. पानांमागून पानं मागे पडत गेली. ती अलगद त्याच्या शेजारी येऊन बसली. हातानं तसूभराचं अंतर अोलांडलं. मान त्याच्या खांद्यावर विसावली. गाडीच्या गतीसोबत तो स्वतःच्या नकळत लाल मातीच्या रस्त्यावरून निघाला. मन पुन्हा जड जड होत धडधडू लागलं. पानांवर छापलेल्या वाक्यांच्या झिरमिळत्या पडद्यांअाडून त्याला भुरे डोळे दिसत होते. वाऱ्यासोबत गजऱ्याचा गंध दरवळत अाला. त्यानं धडधडत्या मनाला वडाच्या झाडाजवळ उभं केलं. हळुवार पावलं टाकत तो घाटावर पोचला.
अाजही ती त्याच्या अाधी तिथे पोचली होती!

Thursday, June 13, 2019

अोल

...अाणि ती निघून गेली!

त्याला बराच वेळ काही कळलंच नाही. ती समोर बसून खूप कठोरपणे बोलत होती. त्याच्या लहान लहान चुका तिच्या मनाला कशा यातना देतात ते सांगत होती. खरं तर त्याच्याकडे त्या सर्वांची उत्तरं होती. त्यानं ती दिली असती तर ती गप्प बसलीही असती. पण त्यानं अोळखलं होतं. ती बोलायसाठी नाही, संपवण्यासाठी अालीय. मूळातूनच सगळं सुकलेलं असल्यावर अधिक बोलून, समजावून काय उपयोग?
तो गप्प राहिला.
शब्द थांबले अाणि विचारांच्या लाटा सुरू झाल्या.
तो गावावरून अाला होता तेव्हा त्याने दिलेला पहिला इंटरव्ह्यू. त्यावेळेस रांगेत शेजारी बसलेली ती. तिथे झालेली तोंडअोळख. दोघांना एकाचवेळी, एकाच डिपार्टमेंटमध्ये मिळालेली नोकरी. मग रोज लिफ्टमध्ये भेटणं, सोबत जेवण करणं, एकत्र घरी जाणं, बाहेर भेटून कॉफी घेणं, असं सगळं रितसर चालू लागलं. ती नेहमीच पुढाकार घ्यायची. हॉटेलमध्ये अॉर्डर काय द्यायची इथपासून त्याच्या बेडशीटच्या रंगांपर्यंत. सगळ्याच बाबतीत. त्याला ते अावडायचं. मित्र म्हणायचे ती बॉसी अाहे, पण त्याला तो तिला अधिकार गाजवण्याचा भाग वाटायचा. त्यानं ते जाणून बुजून चालवून घेतलं.
अाणि अाता ती निघून गेली...
त्याचं प्रमोशन होऊन त्याला नव्या डिपार्टमेंटमध्ये सामिल केलं गेलं. बसायची जागादेखील बदलली. त्यानं केवळ तिच्यासाठी घरी छोटासा जेवणाचा बेत अाखला. खूप दिवसांनंतर स्वत: स्वयंपाक केला. तिनं मॉलमध्ये पाहून ठेवलेला स्कर्ट अाणला.
ती त्या दिवशी अाली नाही. तिथून थोडं थोडं तुटत गेलं.
न्यू इयरला अॉफिसमधले सगळे लोणावळ्याला गेले. त्याच्याकडे नव्या जबाबदाऱ्या होत्या. त्याला जाता अालं नाही. तिला ते अावडलं नाही. पण ती गेली. मग मित्रांकडून काहीबाही कानावर अालं. तिच्या अाणि विहान गुप्ताबद्दल. त्यानं विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा त्यानं तिला शनिवारी रात्री पार्कींग लॉटमध्ये विहानच्या गाडीत पाहिलं, तेव्हा तो भेलकांडत गेला. त्यानं तिला त्याबद्दल विचारायचा प्रयत्न केला. तिनं अाकांडतांडव केला. दोन अाठवडे अबोला राहिला. मग तिचा मेसेज अाला. 'भेटायचंय.' तो जरा अाशेनंच तिथे पोचला. पण...
चार दिवसांनंतर तो अॉफिसला रूजू झाला. सकाळी त्यानं कॅन्टूनमध्ये चहा घेतला. एकटाच! दुपारी जेवणाचा डबा अॉफीसमध्येच मागवला. मित्र दुपारी डेस्कजवळ गेले, पण तो काही बोलत नाही असं पाहून परतले. त्यानं संध्याकाळी उशीरापर्यंत थांबून काम केलं. मग बाहेर जेवून थेट अंथरूणावर जाऊन पडला.
हे रोज घडू लागलं. सकाळ होऊ लागली. मिटिंग्ज वेळेवर अटेंड होऊ लागल्या. एक्सेलच्या शीट भरत राहिल्या. मेलवर मेल पाठवले जात राहिले. दिवस मावळू लागला.
अातून विस्कटलं असलं तरी त्यानं बाहेरून सगळं व्यवस्थित अावरून ठेवलं होतं. पण समोरच्या सॉफ्ट बोर्डवरचे फोटो नाहीसे झाले होते. येणारे मेसेज कमी होत गेले होते. हॉटेल, समुद्र, लाँग ड्राईव्ह अशा वाऱ्या बंद झाल्या होत्या.
पाऊस मंद दरवळ घेऊन अाला. तेव्हा तो अॉफिसमध्ये किबोर्ड बडवत होता.
पाऊस थोडा वारा सोबतीला घेऊन अाला. तेव्हा हा हॉलमध्ये टीव्ही लावून भिंतीकडे टक लावून बघत बसला होता. पावसाला काहीच कळेना! तो बोलतही नव्हता. तो अाल्या पावली निघून गेला.
सकाळी गेटमधून बाहेर पडताना पावसानं त्याला गाठलं. त्यानं चक्क छत्रीमागे तोंड लपवलं. पावसानं जोराची धार धरली. तो रिक्षात बसून निघून गेला.
पावसाला चिंता वाटू लागली. हा असा तर नव्हता. एकदा वार्षिक परिक्षेला जाताना चुकून पाऊस अाला तर गडी अाधी भिजला अाणि मग वर्गात गेला होता. पहिली कविता पावसातलीच. पहिलं अाकर्षणसुद्धा पावसातलं. दरवर्षी पहिल्या पावसातली दोघांची भेट ठरलेलीच. रात्री हलक्या पावसातले त्यांचे वॉक... त्याची तर गणतीच नाही.
तो अॉफिसबाहेर अाला तेव्हा पाऊस नव्हता. तो घरी अाला. येतानाही पाऊस लागला नाही. दोन दिवस त्याची फिल्ड ट्रिप होती. पावसाचा टिपूसही पडला नाही. त्यानंच एकदोनदा अाकाशाकडे पाहिलं होतं. नुसतेच कोरडे ढग जात राहिले.
रात्री बाल्कनीत उभा होता. सगळीकडे सामसूम होती. ती शांतता त्याला अातून धडके देऊ लागली. तो छत्री घेऊन अनवाणी पायाने बाहेर पडला. रस्ता चित्रात रंगवल्यासारखा स्तब्ध होता. त्याला खूप खूप अाठवण येत होती. पावसाची!
मग तो अाला. हळूच येऊन खांद्यावर हात टाकून त्याच्या छत्रीतून चालत राहिला. त्यालासुद्धा खूप दिवसांनी बरं वाटत होतं. पावसाचे थेंब हलके हलके जमिनीवर अादळत होते. पावसाचे डोळे त्याच्यावरच खिळलेले होते. अखेर त्यानं अबोला सोडला. विचार धडपडत बाहेर अाले. त्यानं सगळं, सगळं काही सांगून टाकलं. रस्त्याकडेच्या जागेतून गढूळ पाणी वाहत होतं. पाउस हलका पण संततधार होता. चालता चालता रस्ता संपला. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. फार विचित्र तगमग डोक्यात भणभणत होती. त्यानं अपक्षेनं पावसाकडे पाहिलं.
पाऊस काहीच म्हणाला नाही. तो त्याला घेऊन नव्या रस्त्यावरून चालू लागला. तिकडे बागेची माती होती. तिथे दरवळ उमलू लागले. त्याला खूप दिवसांनी श्वास घेतल्याची जाणीव झाली.
''तू दोन दिवस अाला नाहीस, मला वाटलं...'' तो बोलताना अडखळला.
पावसाने धारांचा जोर वाढवत त्याच्या खांद्यावर थोपटलं अाणि म्हटलं.
''Don't worry! मी कुठंच जाणार नाही. मी येणारंच.''
''का?'' त्यानं वाढत्या धारांमध्ये छत्री सावरत विचारलं.
पावसानं छत्रीबाहेर हात काढून काही थेंब झेलले. मग तो तळहातातलं पाणी पाहत राहिला.
''कारण पावसानं कधी कोरडं रहायचं नसतं.''
त्याच्या अंगावरून गार वारा वाहत गेला. पावसानं त्याच्याकडे पाहिलं. त्याची छत्री त्याच्या डोक्यावरून हळूच दूर केली अाणि म्हणाला,
''...अाणि माणसानंसुद्धा!''
पाऊस सपाट्यानं वाढत गेला. सगळी घरं, इमारती पावसाच्या पडद्याअाड धूसर दिसू लागले. पावसाच्या धारा त्याच्या भवताली नाद धरून राहिल्या. त्याच्या अंगावरून शिरशिरी धावत गेली. पाणी डोक्यावरून अोघळून  अंगाखांद्याला कुरवाळत राहिलं. निचरा होत गेला.
पावसाची अोल अात खोलवर पाझरत गेली.

अलगद... मऊसूद... अलवार...

मंद प्रकाशाची झूल पांघरून
सांज रात्रीच्या वळचणीला जाऊन बसते
सूर्याची किरणं कुणा अोल्या कुशीत दडून जातात
अाणि तारे हळूच येऊन उभे राहतात
स्वप्नांच्या उंबरठ्यावर...

गर्द रात्रीचा सळसळता पदर धरून
चंद्र चांदण्यांच्या डोहात डुंबतो
धरतीवर कुणी चकोर
त्याला पाहून तृप्तीची मृगजळं विणतो

नक्षत्रांच्या वस्तीतले चुकार तारे
रेघोट्या काढत भटकतात अाकाशभर
ढगांचे थवे नजरेला भूल घालत
निरव दौडत राहतात रात्रभर

घरट्यातलं चिमुकलं पाखरू
स्वप्नांच्या पायरवानं शहारतं
ऊरातलं चंद्रबिंब पाहून
नदीचं पाणी थरारतं

कुणा शरीरावरून झुळझुळणारा स्पर्श
रंध्रांना मोकळं करत जातो
अावेगाच्या अावर्तनात हरवत
देह श्वास घेऊ लागतो

वारा शांतचित्तानं वाहतो
झाडापानांना गोंजारत
मऊसूद रातीची स्वप्नं
डोळ्यांमध्ये राहतात पाझरत

फूल उमलावं तशी अलगद
धरती कूस बदलत राहते
क्षितीजाच्या मोहक रेषेवर
चंद्र पहाटेची गाठ पडते!

डेट

''लिलीची फुलं अापल्या अॉफिसच्या जवळपास मिळत नाहीत. तू कुठून अाणलीस?''
त्याने दिलेल्या फुलांचा बुकेचा सुगंध घेत तिनं विचारलं.
तिला अापण केलेली धडपड समजली हे जाणून तो सुखावला.
''जर तुला वेळ असेल तर या शनिवारी कॉफी प्यायला जाऊयात का?'' त्यानं विचारलं.
''सॉरी यार! या शनिवार डेटवर चाललीय मी!'' तिनं चेहऱ्यावर शक्य तितकं दुःख अाणत म्हटलं.
''Oh!'' त्याचा चेहरा किंचित कोमेजला.
''अापल्या अॉफिस मधलं अाहे का कुणी?''
''नाही! टिंडरवरचं अाहे.'' तिनं सहज सांगून टाकलं.
तो काही सेकंद हातातल्या चावीशी खेळत अॉफिसच्या खिडकीबाहेर पाहात राहिला. त्यानं पुन्हा विचारलं.
''मग त्याच्यापुढच्या शनिवारी? तेव्हा फ्री अाहेस?''
''Ya, Next Saturday is fine for me.''
दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिलं.
तिनं त्याला बाय केलं.
मग ते दोघे अापापल्या क्युबिकल्सकडे चालत निघून गेले.

चंद्र अाणि चांदणी

रात्र झाली.
सर्व तारकांना सोडून चंद्र चांदणीजवळ अाला.
निरव पावलांनी...
त्याने पाठीमागून येऊन तिचे डोळे झाकले.
मग मऊसूद प्रकाशाच्या मिठीत तिला सामावून घेतलं.
ती रात्रभर झुळझुळत राहिली.
रात्र चढत गेली.
हलक्या वाऱ्यावर ढग हळुहळू पुढे जात राहिले.
क्षितीजावर झुंजूमुंजू झालं.
चंद्र निघाला.
चांदणी गहिरवली होती.
''किती िदवस अापण असं रात्रीच्या अंधारात चोरून भेटत राहायचं. तू अापल्या नात्याचा दिवसाउजेडी स्वीकार का नाही करत?''
चंद्र उत्तरला - ''मला वाटलं होतं अापलं नातं अशा प्रश्नांच्या पलिकडचं अाहे.''
चंद्र गंभीर चेहरा करून निघून गेला.
चांदणी एकटी उरली.
प्रश्नाचा काटा तिच्या उरात सलत राहिला.
चंद्र पुन्हा अाला नाही.

Wednesday, June 12, 2019

रस्ता

तो छत्री घेऊन शेअर रिक्षाच्या रांगेत उभा होता. ती त्याच्याच रांगेत काही पावलं पुढे. ती खांद्यावरची बॅग सांभाळत, साडीचा पदर एका हाताने अोढून घेत रिक्षाच्या वाटेकडे नजर लावून होती. मधेच तिची छत्री वाऱ्यानं तिरकी होत होती. त्यावेळी तिची होणारी लगबग पाहण्यात तो रमून गेला होता.
ती त्याला नेहमीच तिथं दिसायची. त्या दोघांची एक दोनदा नजरानजरही झाली. पण गाडी त्यापुढे काही सरकली नाही. गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणजे तिच्याशी बोलायला हरकत नाही असं त्याला वाटायचं. पण बोलायचा केवळ विचार जरी केला तरी त्याची धाकधूक व्हायची. तशी त्याला ती अधूनमधून त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकताना दिसायची, पण त्याला तो स्वत:च्या मनाचा खेळ वाटायचा.
त्या दोघांच्या मधे उभी असलेली दोन-तीन माणसं वाट पाहून कंटाळून निघून गेली. तो दोन पावलं सरकून तिच्याजवळ अाला. पाऊस रिपरिपत होताच. तिचा अोलागार पदर वाऱ्याच्या झोताबरोबर त्याच्या हाताला स्पर्शून जाऊ लागला. तो जागच्या जागी शहारत गेला. त्याला कुठलीतरी हरवलेली अनुभूती सापडल्यासारखा अानंद झाला. कुठूनतरी धीर गोळा झाला.
''तुम्ही याच परिसरात राहता का?''
तिनं काहीसं चमकून मागे पाहिलं. तिचे डोळे काळेभोर होते.
''तसं नाही... म्हणजे... मी तुम्हाला अनेकदा इथं पाहतो म्हणून विचारलं.''
''हो... इथेच... सरस्वती सोसायटी.'' तिनं अवघडल्यासारखं हसत म्हटलं.
''अरे वा! अगदी अामच्या समोरची बिल्डींग!'' त्याच्या अावाजात खरंच अानंद होता.
तिनं उत्तरादाखल त्याच्याकडे वळून हलकं स्मित केलं. तिची नजर क्षणभर त्याच्या गडद डोळ्यांवर रेंगाळली.
रिक्षाच्या अावाजाने दोघं भानावर अाली. दोघे शेजारी शेजारीच बसले. पावसाने हलका जोर धरला होता.
''तुमचं कुटुंब इथेच असतं का?'' तिच्याकडून प्रश्न अाला.
''नाही. मी एकटाच अाहे.''
त्याच्या उत्तरावर तिच्या नजरेची हालचाल झाली.
''एवढ्या पावसात कुठं चाललायत तुम्ही?'' त्यानं विचारलं.
''नातवाला शाळेतून अाणायला. अाणि तुम्ही?''
''मीदेखील! माझा मुलगा शेजारच्या विंगमध्ये राहतो.''
दोघेही परस्परांकडे पाहून छानसं हसले. बहुधा दोघांचा रस्ता एकच होता म्हणून...

Tuesday, June 11, 2019

प्रतारणा

अॉफिसमधून बाहेर पडताना खिडकीच्या तावदानांवर पावसाची तडतड ऐकू येत होती. खाली येऊन गाडीवर बसेपर्यंत पावसानं जोर धरला होता. पाऊस कसला, वादळंच ते! सोसाट्याचा वारा अाणि लखलखत्या विजा! मी पावसाकडे विचित्र नजरेनं पाहात गाडी तशीच दामटली. रेनकोट नव्हताच. नखशिखान्त भिजलो. पहिल्या पावसाची अोल केसांपासून सॉक्समधल्या तळव्यांपर्यंत पाझरली. किती दिवसांनी असा अोलाचिंब झालो होतो.
मग तू अाठवलीस!
कदाचित पावसात अापण छत्रीच्या बहाण्याने असेच अोलेकिच्च होत भटकत असायचो म्हणून...
कधी कधी मरीन लाईन्सच्या दिव्यांखालच्या अंधारात पावसाच्या अाडोशाला हरवून जायचो म्हणून...
त्या भिजण्यातली ऊब अाठवून रोम रोम शहारत गेला.
गाडी अंधेरी स्टेशनजवळ अाली. तिथलं मॅक-डी गच्च भरलं होतं. मी त्या गर्दीत तुला शोधत राहिलो. अाजही माऊंट मेरी, खार स्टेशनबाहेरचं घंटेश्वर, सोसायटी रोडवरचा डोसावाला, थेटरातल्या कॉर्नरसीट्स, एफसी रोड इथं गेलो की नजरेची ही अशी शोधाशोध होतेच. तुझ्या दरवळीमुळे या शहरातल्या किती जागा माझ्या उरात रूतून बसल्यात!
खूप मनात अालं की तुला फोन करावा. निदान मित्र म्हणून करावा. पण, वर्ष झालं, तुझा स्वत:हून एकही मेसेज नाही, फोन नाही. तुला नाही येत माझी अाठवण कधी? दुखावलेल्या मनानं इगोच्या काठीचा अाधार घेत फोनचा विचार काढून टाकला. मी गाडीला किक मारली.
फर्लांगभर अालो असेन. तू दिसलीस. म्हणजे अाधी केवळ अोढणीच दिसली. पण तो तुझा बांधा, ती चालण्याची लकब, मी असताना छत्री तिरकी धरण्याची ती तऱ्हा! ते सारं या नजरेत तसंच्या तसं ताजं होतं. फक्त या वेळेस छत्रीत दुसरंच कुणीतरी होतं. तुझ्या भोवती हात घट्ट लपेटून तुला खेटून चालत होतं. तो पावसाचा फायदा घेत होता हे स्पष्टच होतं. अाणि तू सुद्धा तो घेऊ देत होतीस!!!
अातमध्ये काहीतरी चरचरत, तडतडत गेलं. पोट अाणि छातीच्या मधोमध हलकी कळ अाल्यासारखी भासत होती. तुझा दरवळ दूर जात राहिला अाणि छत्रीत पाठमोरी चालणारी तूसुद्धा!
डोळ्यांची कड अोलावत गेली. अापलं मूळ खालच्या खाली कुणीतरी खुडून नेल्यासारखं वाटलं. क्षणभर वाटलं की ही प्रतारणाच! पण टेक्निकली ते शक्य नव्हतं. पण तरीदेखील प्रतारणाच की!
मागाहून हॉर्न वाजू लागले तसा मी निघालो. तुझ्या नादात अाधीच उशीर झाला होता. मानसी कॅफेमध्ये वाट पाहात असणार...

Friday, March 22, 2019

रंग

तू इवल्या हातांनी उधळलेले रंग
आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात जाऊन स्थिरावतायत
दररोज...
त्या रंगांना मोहक स्पर्श आहे
तुझ्या शब्दमोहाचा मधुर नाद आहे
लडिवाळपणाची गोडी आहे
आणि तुला नव्याने उमगू लागलेल्या रुसव्याची किनारदेखील!
ते रंग रुजत चाललेत आत खोलवर
आणि त्यातून मीच उगवतोय, रोज मोठा होतोय
बाप म्हणून...
इवल्या हातांनी, टपोऱ्या डोळ्यांनी आणि नाजूक ओठांतून बाहेर पडणाऱ्या "बाबा" या शब्दांनी केलेली ही रंगांची उधळण रोज अनुभवतोय, हे किती मोठं देणं आहे!
अशा वेळी ज्यावर विश्वास नाही, त्या देवाचेसुध्दा आभार मानावेसे वाटतात!

Tuesday, January 29, 2019

कुछ घूँट

बडी कडी धूप है अौर मंजिल बहोत दूर
जिंदगी के बस कुछ घूँट बचे है बोतल मे
सोच रहा हूँ,
कोई मनचाहा हमसफर मिल जाए
तो खर्च दू उसपर...