पावसानं पहाटेपासून शहराला झोडपून काढलं होतं. हातातली छत्री अाणि खांद्यावरची बॅग सांभाळत तो रेल्वे स्टेशनवर पोचला. गाडी प्लॅटफॉर्मवर अाली. तो सरसरून गर्दीत शिरला. झपाट्यानं दारातून अात जात त्यानं विंडो सीट गाठली. बॅग मांडीवर ठेवली. पुस्तक काढलं. मोबाईलवर जॅझचा एक ट्रॅक सुरू केला. इअरफोन कानात टाकले अाणि पुस्तक वाचू लागला.
गाडी हळुहळू गच्च भरत गेली. पावसाचा भिजका, कुबट, तेल-घाम-सेंट मिश्रीत वास डब्यात भरून राहिला होता. या शहरात येण्यापूर्वी पावसाला गंध होता. अाता वास उरलाय. त्याला क्षणभर स्वत:चंच ते वाक्य अावडून गेलं. मग पुढच्याच क्षणी त्यानं त्यावर काट मारली. तो पुन्हा हातातल्या पानांमध्ये गुंतला.
गाडी निघाली तसा पाऊस थांबला. बंद असलेल्या खिडक्या उघडल्या. काही स्टेशनं गेल्यानंतर त्याचं बाहेर लक्ष गेलं. पावसानंतरचा गारवा त्याच्या चेहऱ्यावरून वाहत होता. अशी अाल्हादकता पुन्हा केव्हा मिळावी? अशा विचारानं त्यानं पानांसोबत डोळेही मिटले...
धुळीनं माखलेल्या लाल रस्त्यावरून सायकलची चाकं धावत होती. शाळेतून मिळालेला रिझल्ट घेऊन त्यानं भरल्या मनानं नदीच्या दिशेनं सायकल दामटली. नेहमीचा रस्ता. त्याला त्यावरून जाताना तिच ती घरं, झाडं, देवळं दिसत होती. लहानपणापासून सवयीचं झालेलं ते चित्र अाता पुन्हा दिसणार नाही म्हणून तो डोळ्यांत साठवून घेत चालला होता.
विहीरीजवळचं वळण घेऊन तो नदीच्या घाटावर पोचला. ती अाधीच पोचली होती. कापसासारखं मन अाठवणींच्या झडीनं भिजून अाणखी जड होऊन गेलं. सायकल वडाच्या झाडाला लावून तिच्याकडे जाताना त्याचे पाय उचलत नव्हते.
ती शांतपणे पायऱ्यांवर बसलेली होती. त्याला तिचा चेहरा नितळ भासला. पाऊस पडून गेला असावा. तो शेजारी बसला. दोघं एकमेकांकडे पाहत राहिली. तिच्या भुऱ्या डोळ्यांकडे पाहताना त्याला एकाच वेळी खूप शांतता अाणि खूप खळबळ जाणवत होती. दोघांचे हात पायरीवर परस्परांच्या जवळ होते. तसूभराचं अंतर ठेऊन. ती नेहमी केस मोकळे सोडायची. अाज ती घट्ट वेणी बांधून अाली होती. त्यावर गजरा माळला होता. त्याला तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन जवळून पाहायची खूप इच्छा झाली. केवळ इच्छाच...
''गाडी कधीची अाहे?'' तिनं विचारलं.
''उद्या सकाळची.''
''कधी पोचणार?''
''रात्री नऊ वाजतील मुंबईला पोचायला. मामा येणारय न्यायला.''
''तू माघारी कधी येणार?''
तो गप्प राहिला. त्याला काय सांगावं ते कळलं नाही.
''येईन ना उन्हाळ्याच्या सुटीत.'' त्यानं घशातला अावंढा गिळत उत्तर दिलं. ती त्याच्याकडे पाहून समंजसपणे हसली.
''अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. दोन वर्षांनी दहावी अाहे. तिकडे जाऊन क्लास...''
''अापण हेच बोलणार अाहोत का?'' तो दुखऱ्या अावाजात म्हणाला.
''मग काय बोलायचं अापण?'' तिनं सहज विचारलं अाणि त्याला जाणवलं की ते दोघे अभ्यास, शाळा, घर याच्यापलिकडे कधीच काही बोलले नव्हते. मग हा अापलेपणा, ही जवळीक कधी अाणि कशी निर्माण झाली?
''तुझी शाळा दूर अाहे म्हणे तिकडून?''
''हो! ट्रेनने जावं लागणारय असं बाबा सांगत होते.''
तिनं अोढणीखालच्या पिशवीतून एक पुस्तक बाहेर काढून त्याला दिलं.
''तुला प्रवासात वाचायला.''
''तिकडे ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. एवढ्या गोंगाटात कसं काय...''
''गर्दी अाणि गोंगाट असतो म्हणूनच देतेय.''
त्यानं तिच्या डोळ्यांत पाहिलं. समोरून वाहणाऱ्या नदीचं इवलंसं प्रतिबिंब तिच्या डोळ्यांत पडलं होतं. ते दोघे मूकपणे उठले. त्यानं सायकल हातात घेतली. दोघे गावाच्या दिशेने चालत राहिले. त्याची सायकल मातीत उमटलेल्या चाकाच्या खुणा पुसत गेली...
''यात्री कृपया ध्यान दे...''
स्पीकरच्या अनाऊन्समेंटने त्याचे डोळे उघडले. त्यानं बाहेर पाहिलं. दादर अालं होतं. दाराजवळची माणसं उतरायच्या अाधीच बाहेरची गर्दी धडधडत अात शिरली. मोकळ्या झालेल्या जागा पापणी लवेपर्यंत पुन्हा भरल्या गेल्या. डब्यात कुठूनतरी भोजपुरी गाणी ऐकू यायला लागली. कानांना न समजणारी कित्येक संभाषणं हवेत लहरू लागली. खिडकीबाहेरची गर्दी निरनिराळे अावाज घेऊन वाहायला लागली. ट्रेनमधली अनाऊन्समेंट पुन्हा सुरू झाली. ती संपते तोपर्यंत होम लोनची एक जाहिरात तारस्वरात स्पीकरमधून पाझरू लागली. त्याचाही फोन वाजला. ह्युमन रिसोर्समधल्या प्रिती बावेजाने त्याला संध्याकाळच्या पार्टीचं इन्व्हीटेशन दिलं. त्यानं फोन ठेवला. गाडी पुन्हा सुरू झाली.
त्यानं हातातलं पुस्तक उघडलं. नजर पानांमध्ये गुंतली. पुन्हा तो गार वारा वाहायला लागला. पानांमागून पानं मागे पडत गेली. ती अलगद त्याच्या शेजारी येऊन बसली. हातानं तसूभराचं अंतर अोलांडलं. मान त्याच्या खांद्यावर विसावली. गाडीच्या गतीसोबत तो स्वतःच्या नकळत लाल मातीच्या रस्त्यावरून निघाला. मन पुन्हा जड जड होत धडधडू लागलं. पानांवर छापलेल्या वाक्यांच्या झिरमिळत्या पडद्यांअाडून त्याला भुरे डोळे दिसत होते. वाऱ्यासोबत गजऱ्याचा गंध दरवळत अाला. त्यानं धडधडत्या मनाला वडाच्या झाडाजवळ उभं केलं. हळुवार पावलं टाकत तो घाटावर पोचला.
अाजही ती त्याच्या अाधी तिथे पोचली होती!