Thursday, August 22, 2013

कड्या

नको शोधूस तू पुन्‍हा
लोपलेले हितगुज
तू ठोठावशी ते बंद दरवाजे
ज्‍यांना कड्या घातल्‍यास तूच

Wednesday, August 21, 2013

धुंद होते शब्‍द सारे

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना
सई ये रमुनी सा-या जगात रिक्‍त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे...

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना

मेघ दाटूनी गंध लहरूनी बरसला मल्‍हार हा
चांद राती भाव गुंतुनी बहरला  निशीगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा,

धुंद होते शब्‍द सारे धुंद होत्या भावना
वा-यासंगे वाहता त्‍या फुलापाशी थांब ना

चित्रपट - उत्‍तरायण
गीतकार - कौस्‍तुभ सावरकर
गायक - रविंद्र साठे, रविन्‍द्र बिजूर, बेला शेंडे
संगीत - अमरत्‍य राऊत

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या - See more at: http://manik-moti.blogspot.in/2011/04/blog-post.html#sthash.MzEdvBwK.dpuf
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या - See more at: http://manik-moti.blogspot.in/2011/04/blog-post.html#sthash.MzEdvBwK.dpuf

Tuesday, August 20, 2013

प्रवाह

गात्रं गेली थकून सारी
मज सावराया येशील का?
पाय डगमगता वाटेवरी
हा हात हाती घेशील का?

मी कोरडा भासे मला
सारे पाणवठे सुकले कसे?
फुंकण्‍या जीव या मनी
माझ्यात तू पाझरशील का?

हाती धरिला जो कुंचला
तू रंग त्याचा होशील का?
होवोनी चित्र मज वेडीयाचे
अवतीर्ण तू होशील का?

मी चुंबिल्या बासरीतूनी
मधुतान होवून उमटशील का?
सुरावटीच्‍या वृक्षापरी
मनअंगणी बहरशील का?

प्रातःकाली अलगदपणे
प्राजक्‍त येतो ओंजळीत या
त्‍या फुलांच्‍या गंधातूनी
आसमंत माझा व्‍यापशील का?

उमलून जाईल हे भावफूल
रात्रीच्‍या अंधःकारी कधी
तू ओलेती दवबिंदूपरी
मज एकदा स्‍पर्शशील का?

Monday, August 19, 2013

अंबराचा रंग

रंग उडाले आकाशी मी सांभाळल्‍या अंबराचे
शिंपल्‍यात जपलेला मोतीही न जाणे कुठे विरुन गेला?

ज्‍या झाडासाठी आणला होता मी पाऊस ओंजळीतून
मोहर त्‍याचा न जाणे अवचित कसा जळून गेला?

विस्तवांनी शिलगावलेली वाट साधी, सोपी, सरळ भासे
सुखाच्छादित वाटेवरचं होरपळणं ते टाळू कसं?

पण आता त्‍या विस्‍तवांचीही झालीय सवय मला
त्‍यांच्‍या नसण्‍यानेच कदाचित होरपळत जाईन मी

मज सुखातली बधीरता नकोशी का भासते?
अन् विरहातली समीपताही सुखाऊन का जावी बरे?

त्या अंबराचे रंग हरवलेत कि बदललेत?
का झालेत ते कुठतरी कैद? कायमचे…

कुणालाही बदलता येणार नाहीत असे…
अगदी सूर्यास्तालाही नाहीत!

हेच खरं असावं बहुधा…

Sunday, August 18, 2013

दावण

शांत निज तू गं राणी
नको आणू डोळा पाणी
तुझ्यासाठीच बांधिली
दावण ही मी माझ्या मनी

Tuesday, August 13, 2013

रान हे उठले उठले

रान हे उठले उठले मुक्‍त आभाळ झाले
तिच्‍या नुसत्‍या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्‍य फुलोरा त्‍याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्‍या पल्‍याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्‍त हा गोजिरा गेली सई मोहरुन

जाऊ चालत जाऊ निःशब्‍द याच देखण्‍या वाटेवरुनी
ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्‍या फुलाफुलातूनी
जीवनातूनी येई बहर असा, जीवनातूनीअशी लहर फुले
बंध हे रेशमी ऐसे किती दिसांचे दिसांचे
कुणी तोडता तुटेना तुझ्या नी माझ्या संगतीचे

रान हे उठले उठले मुक्‍त आभाळ झाले
तिच्‍या नुसत्‍या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्‍य फुलोरा त्‍याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्‍या पल्‍याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्‍त हा गोजिरा गेली सई मोहरुन

चित्रपट - उत्‍तरायण
गीतकार - कौस्‍तुभ सावरकर
गायक - रविंद्र साठे

Monday, August 12, 2013

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

Friday, August 9, 2013

ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी

- ग्रेस

Thursday, August 8, 2013

प्रज्‍वलित

स्‍वनिर्मित पाशाच्‍या तिमिरास भेदूनी
पुन्‍हा होतोय प्रज्‍वलित मी
वेचीन-वाटीन कण सुखाचे
जरी प्रगल्‍भ दुःखाचा मी धनी!

Wednesday, August 7, 2013

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)

Tuesday, August 6, 2013

मर्म

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!

…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये

- ग्रेस
(चंद्रमाधवीचे प्रदेश)

Monday, August 5, 2013

मोर

इथं माझ्या निर्णयांची, कर्तृत्‍वाची वाहवा होतेय
माझं केवळ असणंही केवढं मौल्‍यवान वाटतंय त्‍यांना
त्‍यांच्‍याकडून पावलोपावली मिळणारा मान
आतून सुखावून जातो मला
... पण आता तेही शिळं झालंय
प्‍लास्टिकमध्‍ये बंद असलेल्‍या खाण्‍यासारखं

बुटातल्‍या पायांची तगमग होताना
मी तिसाव्‍या मजल्‍याच्‍या खिडकीतून बाहेर पाहत असतो
वा-याचा झोत माझ्या दिशेने झेपावतो
मी त्‍याला कवेत घेण्‍यासाठी बाहू पसरतो
आणि वारा काचेवरूनच परतून जातो
... माझं कोरडंपण आणखीनच कोरडं होत जातं

कधीकाळी हातांना लागलेले रंग
आता कुठच्‍या कुठे उडून गेलेत
त्‍या रंगांनी चितारलेल्‍या रेघोट्या
अस्‍पष्‍ट झाल्‍यात आता
स्‍पष्‍ट दिसतात ते केवळ कागदांवरचे आकडे
आणि आरशात दिसणारं एक बुजगावणं
...भवतीच्‍या रंगात बेरंग झालेलं

पाण्‍यात सोडलेल्‍या होड्या
कधीच्‍या दूर निघून गेल्‍यात
त्‍यामागे धावणारी इवलीशी पावलं
थिजली आहेत किना-यावर
दूरवर जाणा-या त्‍या होड्या पाहात...

आतलं मोरपिस धुळीनं माखून गेलंय
भिती वाटतेय, त्‍याला वाळवी तर लागली नसेल ना?
कधीतरी आठवण येते त्‍याची आणि थोडी धूळ झटकतो मी
मग दिसतं त्‍याच्‍या पंखांवरचं सुकलेलं पाणी
ते ओघळ पोखरुन टाकतात मला
मी माझ्या निष्क्रियतेच्‍या शरशय्येवर हळूच निजतो
मनातलं मोरपिस माझ्यात कणाकणानं रुतत जातं
मी मनातल्या मनात वणवणत राहतो 
पंख हरवल्‍या मोरासारखा...

Sunday, August 4, 2013

सोस

मनातलं गुज सांगावं तरी कुणाला?
पण अंतरीची तगमग बाहेर मांडावी तरी कशाला?
जर स्‍वतःपुरतं ठेवणं जमत नसेल
तर या भावनांचे सोस हवेत तरी कशाला?

Saturday, August 3, 2013

पाऊस आला

उत्‍तररात्रीचा पाऊस आला
सुगंध मातीचा कोमल आला

फांद्यांनी मिटले हिरवे डोळे
जांभळा डोंगर झोपेत न्‍हाला

झेलून सरींची ओलेती मिठी
वा-याच्‍या मनाचा झोपोळा झाला

कौलारांवरती अदृश्‍य परी
थेंबांच्‍या फुलांचा घेऊन झेला

मेघांची पालखी आभाळी झुले
पाऊसराजाचा सन्‍मान झाला

सरींनी घातली स्‍वप्‍नांना मिठी
पाऊस आला रे, पाऊस आला

- मंगेश पाडगावकर

Friday, August 2, 2013

अजून काही

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या ?
सणाणती बंडखोर वारे अजून काही

थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका–
‘अजून गा रे.. ‘अजून गा रे .. अजून काही..’

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही!

विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही

- सुरेश भट

Thursday, August 1, 2013

शोध

तुझ्याकडून येणा-या प्रत्‍येक वा-यात
स्‍वतःला शोधणं असतं
सापडलं की हरकून जाणं असतं
नाही सापडलं तर खट्टू होणं असतं