Saturday, July 20, 2013

मल्‍हार

पुन्‍हा एकदा सुरू जाहला लपंडाव तो शब्‍दांचा
तू सामोरी येशील तेव्‍हा असेल शुकशुकाट या ओठांचा

लपवून ठेवीन तुझ्यासाठी उमलणारी ती गीते
ओरखडे त्‍यांच्‍या तिक्ष्‍ण नख्‍यांचे उमटतील आता तिथे

हिरव्‍या रानात माझ्या कधीकाळी वसंत होता तो बहरला
कुणीही ना पेटवली आग तरीही प्राजक्‍त माझा करपला

हरवल्‍या चंद्राच्‍या नभीची अवसेची रात्र सरणार कधी?
आल्‍या पावली परत चालल्‍या मेघांच्‍या मनी बरसण्‍याची भीती

नाही कोपला तरी चालला भरल्‍या घटाचा मेघ तो दूर
बांध घालूनी कणाकणाला शोधतो तो हरवला सूर

हरपला सूर शोधता शोधता पुन्‍हा कानी मल्‍हार तो येतो
मेघ मल्‍हाराचा आता अखेरचा निरोप घेतो...

No comments:

Post a Comment