Sunday, June 30, 2013

मी पाऊस असायला हवं होतं...

मी पाऊस असायला हवं होतं
मग मला कधीही, कुठेही
बरसता आलं असतं तुझ्यावर
सर्वांदेखत...

तुही मग आनंदानं स्‍वीकारलं असतंस मला
दोन्‍ही हात पसरून
मला जवळही घेतलं असतंस
सर्वांदेखत...

तू छत्रीतून पाहत राहिली असतीस माझ्याकडे
तिच्‍या कडांवरून थेंबाथेंबानं कोसळणा-या मला
तू अलगद तळहातात झेललं असतंस
सर्वांदेखत...

मला पाहताना, मला स्‍पर्शताना, मला आपलं म्‍हणताना
तुला भिती वाटली नसती, मनी अपराध वाटला नसता,
तू सदैव सोबत केली असतीस मला
तीही सर्वांदेखत...

हे 'सर्वजण' किती महत्‍त्‍वाचे असतात ना?
त्‍यांची साक्ष, त्‍यांची अनुमती, त्‍यांचा होकार, त्‍यांचा स्‍वीकार, त्‍यांचे नियम...
हे सारं सारं काही प्रचंड महत्‍त्‍वाचं असतं!
भावनांपेक्षा!
मनाच्‍या इच्‍छांपेक्षा!
मोकळ्या जगण्‍यापेक्षा!
आणि ते चूक नाहीत
त्‍यांची कुंपणं अगदी योग्‍य जागी आहेत
मला वाटतंय...

मी चुकलोय या जगाची वाट
किंवा जगचं चुकलंय माझं
म्‍हणूनच वेड्यासारखा मूकपणे किंचाळत फिरतो मी
सर्वांदेखत...

पुढच्‍या वेळी मी पाऊस म्‍हणूनच जन्‍माला येईन
मला नकोत कुणाची बंधनं, नकोत कुणाची मनं सांभाळण्‍याचे व्‍याप
पाऊस होण्‍याचा प्रयत्‍न केला एकदा
सर्वांदेखत...

पण शक्‍य नसतं या तुमच्‍या जगात
आता बरसतो तो डोळ्यांत खुपतो त्‍यांच्‍या
तेव्‍हा बरसेन तर निदान हवाहवासा तरी वाटेन
सर्वांदेखत सर्वांनाच...

मुक्‍त... स्‍वच्‍छ... आनंदी...

No comments:

Post a Comment