दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये नाटक पाहायला गेलो होतो. एकटाच! शिवाजी
मंदिरला गेलो की 'मॅजेस्टीक'च्या बुक गॅलरीत चक्कर टाकायचा शिरस्ता आहे.
तेव्हा खिशात शिलकीचे पैसे राहू लागले होते. पुस्तकं विकत घेऊ लागलो होतो.
तिथे पुस्तकांच्या रांगांतून फिरता फिरता 'ऐक! टोले पडताहेत! - रत्नाकर
मतकरी यांच्या ३० गूढकथा' हे पुस्तकं दिसलं. घेतलं. थेटरात सीटवर येऊन
बसलो. नाटक सुरू व्हायला वेळ होता, पण बॅगमधलं पुस्तक चैन पडू देत नव्हतं.
पुस्तक काढलं. वाचायला सुरूवात केली. आजुबाजूची सगळी लोकं येऊन बसली.
अनाऊन्समेंट झाली. नाटक सुरू होण्यापूर्वी माझी शिर्षक कथा वाचून झाली
होती. पुढची 'तारकर' ही कथा वाचायला सुरू करणार इतक्यात दिवे मंद झाले.
नाटकाचे तिसरे टोले पडले. थोडा हिरमुसलो. वाटलं, शिवाजी मंदिरऐवजी शिवाजी
पार्कात जाऊन बसलो असतो तर बरं झालं असतं. प्रयोग सुरू होण्यापूर्वीच
प्रेक्षकाचा रसभंग करणारं ते बहुधा पहिलं नाटक. रत्नाकर मतकरींच्या
लेखनाशी मी नेमका कधी जोडलो गेलो ते आठवत नाही. मात्र फार मागे जाणारी आठवण
तिच! त्या पुस्तकानंतर मतकरींची एकामागोमाग एक सर्व पुस्तकं कपाटात जमा
झाली. ते नाटककार होते. त्यांनी वैचारिक लेखन केलं, लहान मुलांसाठी
कथा-नाटकं लिहिली. पण मी त्यांच्या गूढ जगताने जास्त भारावलो. त्यांच्या
कथा धुंद करणाऱ्या होत्या. निजधाम, निर्मनुष्य, पावसातला पाहुणा, फिरून
त्याच जागी अशा कित्येक कथांची निवेदनशैली-कथेची रचना अफलातून होती.
त्यांची 'कोळसा' ही कथा डेल टोरोच्या 'डेव्हील्स बॅकबोन' या सिनेमाच्या
प्रकृतीशी जुळणारी वाटली होती. 'बुकशेल्फ' सुरू केल्यानंतरही भरतच्या
फ्लॅटवर आमचा बहुभाषी बुक क्लब सुरूच होता. मी त्यात मतकरींच्या 'पावसातला
पाहुणा' आणि 'कोळसा' या कथा हिंदीत भाषांतरीत करून वाचल्याचं आठवतं.
हिमाचलचा भरत आजही 'कोळसा' या कथेची आठवण काढतो. मतकरींच्या अनेक कथा
वाचताना स्क्रीनप्ले वाचल्यासारखा फिल यायचा. हे स्पष्ट जाणवलं ते
त्यांच्या 'कबंध' या कथेमधून. त्यांनी उत्तम लघुकथा लिहिल्या, त्यामागे
त्यांना नाटक आणि सिनेमा या माध्यमांची असलेली जाण नक्कीच कारणीभूत होती.
त्यांच्या लेखनात नेमकेपणातून परिणाम घडवण्याची ताकद होती. आम्ही 'थिंक
महाराष्ट्र' आणि 'ग्रंथाली'च्या माध्यमातून रामदास भटकळ यांची जाहीर
मुलाखत घेतली होती. त्यावेळी रत्नाकर मतकरी मुलाखतकाराच्या भूमिकेत होते.
मुलाखतीच्या तयारीच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही भेटीगाठी
झाल्या.मतकरींनी माणसातलं, त्याच्या कृतीविचारांतलं गूढ मांडलं. मानवी
मनाइतकं गूढ काहीच नाही हे त्यांच्या लेखनातून पानोपानी प्रत्ययाला येतं.
माझ्यावर झालेल्या वाचनाच्या संस्कारात रत्नाकर मतकरींच्या साहित्याचा
महत्त्वाचा वाटा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
लहानपणी आई चिडली की तळणाच्या झारीनं किंवा उलतण्यानं फटका मारायची!
घरातल्या त्या झारी-उलतण्याचा खूप राग यायचा, पण आईबद्दल तसं कधी वाटलं
नाही. 'ती फटका घालणार' हे मनोमन मान्य केलेलं होतं. उलट, तिनं मारल्यानंतर
पुन्हा तिनंच जवळ घेण्यात, त्यावेळी थोडं रडण्यात आणि तिच्या ''पुन्हा तसं
करणार नाही ना?'' या प्रश्नाला होकारार्थी मान डोलावण्यात कसलासा आनंद
असायचा. ... पुढे कोचिंग क्लासला जाऊ लागलो. रखरखलेल्या, वाऱ्यानं फुफाटा उडणाऱ्या मैदानाच्या कोपऱ्यावर क्लास होता. ते चित्र बदलायचं ठरवलं.
आम्ही मुलांनी बाग फुलवायला घेतली. रोज माती उपसायची, दगड वेचायचे, ते
दूरवर नेऊन टाकायचे, पाणी मारायचं, ठिकठिकाणंाहून फुलझाडं किंवा बिया
मिळवायच्या... अनेक महिन्यांनी फुलांनी डवरलेली हिरवीगार बाग उभी राहिली
तिथे! शेजारी गणपतीचं मंदिर होतं. आमचं पाहून त्यांनीही बागेची लागवड केली.
यावेळी आमच्याकडून बिया आणि झाडं घेऊन गेले. समाधान वाटलं. ...
काही वर्षांनी क्लासमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनालय सुरू केलं. वीसेक
रुपयांचं भांडवल मिळालं होतं. जुनी-पुराणी पुस्तकं जमवून, रद्दीच्या
दुकानाच्या फेऱ्या मारुन थोडी पुस्तकं जमवली. पंचवीस पैशाला एक पुस्तक अशा
दरानं आम्ही पुस्तकं वाचायला देऊ लागलो. मिळकत काहीच नव्हती. येणाऱ्या
पैशांमधून नवी (म्हणजे जुनीच!) पुस्तक विकत घेत होतो. शेकड्यानं पुस्तकं
जमली. सात-आठ वर्षांनंतर घरात पुस्तकं येऊ लागली. प्रत्येक पुस्तकाला कव्हर
घालू लागलो. कुणी मागितलं तर शंभरदा दटावून त्याला वीट येईल इतपत पुस्तक
सांभाळण्याच्या सूचना देऊ लागलो... ... असं बरंच काही...
सृजन-पालन-ममत्व-जबाबदारी... 'आई' असण्याची भूमिका अशी कणाकणाने कळत-जाणवत
गेली. म्हणजे ते त्या-त्या वेळी समजत नव्हतं, पण आता त्या अनुभवांचा अर्थ
लावता येतो. वसुंधराचा बाप होईपर्यंत 'आई'च्या भूमिकेची किंचित जाणिव झाली
असावी. म्हणूनच तिच्यासोबत असताना भूत-भविष्यावर नजर ठेऊन तिच्या
वर्तमानाला आकार देऊ पाहतो. 'आई' या भावनेनं बाप होण्याला हातभार लावला. तर अशा अनेक आयांना, आई समजलेल्या बापांना, आई न कळताही आतल्या आत त्या छटा अनुभवणाऱ्या प्रत्येकाला... Happy Mother's Day!
या निमित्ताने आईच्या भूमिकेकडे डोळसपणे पाहणाऱ्या 'उगम' या कादंबरीचा 'बुकशेल्फ'ने सादर केलेला हा परिचय...
आज आम्ही 'बुकशेल्फ'वर नवी मालिका सुरू केली. - 'पुस्तकातून पडद्यावर'!
आम्ही त्यात पुस्तक आणि सिनेमा यांसंबंधीचे व्हिडीअो प्रसिद्ध करणार आहोत. आम्ही त्या मालिकेचा पहिला भाग इरफान खानला समर्पित केला. त्याच्या सिनेमांचा पुस्तकांशी ठळक संबंध आहे. नेमसेक, मकबूल, स्लमडॉग... यादी तशी मोठी आहे.
मालिकेतला पहिला भाग तयार करायचा होता. फुटेज लागणार होतं. इरफानचे पंधरा एक सिनेमे डाऊनलोड केले. त्याचा 'दी नेमसेक' पाहायचा राहून गेला होता. तो पाहिला. एडिट करताना सिनेमे पाहिले. मग एडिट बाजूला ठेऊन पाहिले. पहाटेपर्यंत...
पुस्तकांवरच्या सिनेमांमध्ये बऱ्याच गोष्टी वेळेअभावी दिग्दर्शकाला दाखवता येत नाहीत. पण त्याला पुस्तकातला Between the lines चा भाग पडद्यावर चितारता येत असतो. 'दी नेमसेक' पाहताना इरफान एअरपोर्टवर तब्बूचा दूरून निरोप घेतो असं एक दृश्य आहे. इरफानने खूप सहज केलंय ते! खूऽप म्हणजे खूऽऽपच सहज केलंय! इतकं सहज-साधं काहीतरी घेऊन येण्यासाठी आतल्या आत किती झगडावं लागलं असेल! इरफानची ती लहानशी हरकत पाहताना जीव छातीत असा दाटून येतो. शब्दांच्या अधलं-मधलं जे काही असतं ना ते हेच असावं! मोहात पडलो त्याच्या! ते दृश्य 'बुकशेल्फ'वर इरफानचा व्हिडीअो तयार करताना ठेवलंय मी त्यात. त्याला अर्थ देण्याचा लहानसा प्रयत्न करत...
इरफानचे डायलॉग कमाल असायचे! कधी त्याच्या सहजतेमुळे, कधी त्यातल्या गर्भीत-गंभीर अर्थामुळे. पण मला इरफान सर्वात जास्त आवडतो, तो त्याच्या दोन डायलॉगच्या मधल्या जागेत... एक वाक्य उच्चारल्यानंतर दुसऱ्या वाक्याकडे वळायच्या आधी त्याची नजर, कपाळावरच्या रेषा, ओठांची निःशब्द हालचाल हे असं सगळं मिळून तो काहीतरी करतो. आतमध्ये ढवळणारं, फुलणारं, खदखदणारं सगळं त्याच्या त्वचेतून पाझरत बाहेर येतं. 'मकबूल'मध्ये इरफान बोलला कुठे? तो सगळा सिनेमा त्याच्या आत चाललेल्या घुसळणीचा होता. त्याउलट 'पान सिंग तोमर'मध्ये त्याच्या वाट्याला कितीतरी संवाद आलेत, पण त्या आडून परिस्थितीच्या रगाड्यात अडकून-पिचून गेलेलं त्याचं स्वप्नं सतत डोकावतं. संवादांना स्पर्श न करता आतली खळबळ, आनंद, खट्याळपणा, द्वंद्व... सगळं मांडता यायचं त्याला.
साहित्यात 'बिट्वीन दी लाईन्स' ही वाचकासाठीची जागा असते. सिनेमात तसं प्रेक्षकासाठी 'बिट्वीन दी फ्रेम्स' असावं. इरफान प्रेक्षकासाठी त्या जागा तयार करायचा. प्रेक्षकालाही त्या कळायच्या. त्या कळण्या-उमजण्याच्या घडामोडीत तो अभिनेता आपलासा होऊन जायचा. इरफाननं मनात घर केलं ते अशा लहान लहान जागांनी. आता तो नाही तर ते घर अंगावर येतं...
'दी नेमसेक'मधला, दूर चाललेला, सहजपणे रांगेमध्ये उभा असलेला, अगदी अलगद निरोप घेणारा तो इरफान अजूनही डोक्यातून जात नाही...