Wednesday, February 4, 2015

स्‍मरणातही नाही!

कुठं कशी हरवलीस तू
मला समजेनाच काही
आता तर होतीस ओठांवर या
आणि आता स्‍मरणातही नाही!

शेष

मेघ जाहला उदास
सोडून मल्‍हाराची साथ
कणाकणातला शेष
मूक किंचाळतो पाहा

अपेक्षा

अपेक्षा आल्‍या ना
कि अपेक्षाभंगाचं दुःखही येतं मागोमाग
त्‍यापेक्षा जे आपसूक येतंय
तेच येऊ द्यावं
ते निर्लेप असेल कदाचित
निदान आपल्‍या अपेक्षा-भावनांचं
ओझं नसेल त्‍याच्‍या खांद्यावर
हलकं असेल फुलासारखं तर आणखीनच बरं
भले काही दिवसांत जाईल कोमेजून
पण जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ते आपलं असेल
बदल आयुष्‍याचा स्‍थायीभाव आहे
त्‍याला तुम्‍ही-आम्‍ही काय करणार?
चालायचंच...

नकार

तुझ्या नकारांची
आता सवय झालीय
भिती तर तुझ्या
होकारांची वाटते

जपणूक

तुझे किती क्षण जपून ठेऊ गं?
तू बकुळीची फुलं गोळा करत होतीस तो क्षण...
तू माझा हात हातात धरून माझ्याकडे पाहत होतीस तो क्षण...
की तू दूरवरून चालत येताना माझ्याकडे पाहत स्मित करत येतेस तो क्षण...
साले हे क्षणंच जपावेत
माणसं जपणं परवडत नाही

प्रतिबिंब

आभाळाच्‍या काठावर बसावं दोन पाय सोडून
स्‍वतःच्‍याच डोहात डोकवावं जरा
स्‍वच्‍छ... छान... सुंदर प्र‍ितिबिंब दिसतं
अगदी आपल्‍याला हवं तसं

एक हलकेच दगड मारावा त्यावर
वर्तुळ उमटतात मग त्‍यावर
प्रतिबिंबाला भेग पडते
उरतो तो डुचमळलेलो आपण स्‍वतः

पाणी पुन्‍हा शांत होतं, स्थिरावतं
मग पुन्‍हा डोकावून पाहातो आपण
पुन्‍हा एक प्रतिबिंब
मघापेक्षा वेगळं, मघापेक्षा खरं

आता शरिर ताठ झालेलं असतं
आणि आपण सुन्‍न
वर भिरभिरणा-या सुंदर पक्ष्‍यांना
शिवी देऊ हाकलून लावतो

मग एक सुंदरसं तळं घेऊन
त्‍या डोहोवर आच्‍छादतो आपण
चार पाखरं तळ्याकाठी येऊन बसतात
तेही खूष, आपणंही खूष!