Tuesday, May 28, 2013

आडवाट

नात्‍यात आणि भावनेत
माणसं नेहमीच गल्‍लत करतात
कधीकधी भावनेला नातं ठरवण्‍याचा
शहाणपणाही करतात

प्रेम ही भावना आहे
अन् मैत्री हे नातं
हे कळत असेल का हो त्‍यांना?
पण भानातून नेमकं निसटून जातं

नाणं एकच असलं
तरी बाजू असतात दोन
म्‍हणून दोन्‍ही बाजूंना एकच म्‍हणण्‍याचा
वेडेपणा करतं का कोण?

लोकं त्‍यांच्‍या कुवतीप्रमाणं
नात्‍यांचे अर्थ लावू पाहतात
जे त्‍यांना हवंय
तेच चित्र गिरवत राहतात

तुमच्‍या-माझ्या मर्जीनं
आकार घेईल ते चित्र कसलं?
चित्रं तर उमटत जात असत आपोआप
त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या मर्जीनं

स्‍वतःच्‍या बुद्धीचे निकष लावून
कशी कळतील नाती?
कधीतरी पाहू या ना त्‍यांचा रंग
कधीतरी समजून घेऊ त्‍यांचीही गती

पण उगा का नाव ठेऊ त्‍यांना?
जर त्‍यांच्‍याकडे दुसरा रस्‍ताच नसेल
आता दोष कुणाचा म्‍हणायचा?
मीच जर आडवाटेने जात असेन...!


Monday, May 27, 2013

गुंता


माणसाचं मन आहे ना, हे एक खूप अजब ठिकाण आहे. तिथे कोणत्‍या आणि काय घडामोडी सुरू असतील हे कुणालाच सांगता येणार नाही.
म्‍हणजे मी जेव्‍हा अस्‍वस्‍थ होतो ना तेव्‍हा माझ्या मनात खूप मोठा गलबला होतो. आतलं सगळं ढवळून निघत जातं. कुठल्‍याही एका विचारावर लक्ष केंद्रित करणं अशक्‍य होऊन बसतं. मग सुरू होतात मनाचे चित्रविचित्र खेळ. एक अस्पष्‍ट असं जग उभं राहतं मनाच्‍या पटलावर. त्‍यात खूप काही असतं. आयुष्‍यातील अनेक व्‍यक्‍ती, कधीच न घडतील अशा घटना, आवाज, संवाद, सुख-दुःख-आनंद-निराशा अशा कित्‍येक भावनांची भरती... बरंच काही. 
हे सगळं एकामागोमाग एक येत जातं. त्‍याची गती वाढत जाते. मग त्‍यांचं सुटेपण हरवत जातं. प्रत्‍येक गोष्‍टीच्‍या पोटातून दुसरी गोष्‍ट बाहेर पडायला लागते. गलका होतो सगळ्यांचा.  डोळ्यांसमोर एकाचवेळी अनेक घटना दिसायला लागतात. विविध स्‍वरूपाच्‍या. विविध अंगाच्‍या. प्रत्‍येक घटनेचं स्‍वरूप वेगळं. स्‍तर वेगळा. भाव वेगळा. कुठे सगळं स्थिरस्‍थावर असतं. कुठे सगळाच विध्‍वंस झालेला असतो. कुठे मला कशाचं तरी उत्‍तर सापडलेलं असतं तर कुठे सगळं हरवल्‍याची भावना असते. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर जगावं लागतं. सगळीकडे गुंतावं लागतं. गुंतलो नाही तर कशाची तरी रूखरूख लागते. मन पोखरणारी. 
बरं! हे सगळं घडतं अगदी एकाच वेळी. फक्‍त वेगवेगळ्या स्‍तरांवर. त्‍या स्‍तरांत घडणा-या घटनांचा परिणाम माझं मन रिचवू पाहत असतं. मी एकाच क्षणी विविध पातळ्यांवरील घडामोड पाहत असतो. ब्रम्‍हदेवानं ब्रम्‍हांडाची उत्‍पत्‍ती पाहिली असेल तशी. त्‍या सर्व स्‍तरांवरून माझ्याकडे वाहणारे निरनिराळे प्रवाह मला घटाघटा प्‍यावे लागतात. ते सारं डोक्‍यात चढत जातं.  
मग अस्‍वस्‍थेच्‍या एकामागोमाग एक अशा कितीतरी पाय-यांवरून मी टप्‍पे खात कलंडत जातो. त्‍या -हासाला अंत नसतो. फक्‍त कडा असते. त्‍यावरून पुन्‍हा खाली कोसळत जाणं... जणू मी एखाद्या निर्वातात सूर मारला असावा आणि तळाच्‍या दिशेनं वेगानं जातच रहावं... जातच रहावं... जातच रहावं...
त्‍या कोसळण्‍याला पार नसतो. किनारा नसतो.
क्षमाही नसते.
मी भेलकांडत असतो. सावरायला कुणी नसतं. मीही नाही.
मला मिळालेली गती सहन  होण्‍यापलिकडे वाढत जात असते. किती अंतर कापलंय याचा अंदाज नसतो. किती खोल चाललोय याचं भान नसतं. पुन्‍हा वर जाता येईल की नाही ते ठाऊक नसतं.
आणि दुस-याच क्षणी मी माझ्या जागेवर बसलेला असतो.
अगदी शांत. निश्‍चल.
कानावर पडणारा वेगाचा आवाज क्षणार्धात नाहीसा झालेला असतो. शांतता विचित्र भासत असते.
गुंत्‍यातून बाहेर पडल्‍याची भावना असते. पण फक्‍त भावना.
गुंता तसाच असतो. 
गुंतलेला...


Saturday, May 25, 2013

विवस्त्र


कोशबंद समाजामध्ये
विवस्त्र हिंडतो मी
त्यांच्या नजरेतल्या नग्नतेचा
भार वाहतो मी…

ती नजर छळत राहते मला
म्‍हणून डोळे झाकून घेतो मी
तर आंधळा समजून माझ्यावर होतो
अगणित दगडांचा वर्षाव

रक्‍तबंबाळ होत जातो मी आतून
पिचत जातो तिथला गाभा
मोकळं जगणं खरंच
एवढं महाग असतं का हो?

का चिडतात ते माझ्यावर?
मी त्‍यांच्‍यातला होत नाही म्‍हणून?
कि त्‍यांना माझ्यासारखं होतो येत नाही म्‍हणून?
कुणीच स्‍पष्‍ट बोलत नाही

मला विवस्‍त्र पाहून
ते तोंडं फिरवतात
स्‍वतःच्‍या नागडेपणाकडे
सोईस्‍कर दुर्लक्ष करून

नागव्‍यांची जत्रा भरलेली असते
झुंडीत
आणि मी असतो एकटा
अनावृत्‍त शरिरांचा नाच पाहात

चुकीचं असलं तरी
मला मग वाटू लागते लाज... स्‍वतःचीच
मलाही सामिल व्‍हायचं असतं
त्या नाचामध्‍ये

पण जमत नाही
मी स्‍वतःला परवानगी देत नाही
एकटेपण होत जातं अधिक गहिरं
मी उगाच आक्रसत जातो...
आकुंचतो
कधीतरी संपतो...

… मला पडदे ओढून जगणं
जमायला हवं होतं!

Friday, May 24, 2013

असंच!

तू असशील सोबतीला
तर थोडा सावरलेला असेन मी
तू नसशील सोबतीला 
तर थोडा बावरलेला असेन मी

आत उठलेलं हे काहूर
तुला जाणवेल का गं कधी?
कदाचित...
पण जाणवेल तोपर्यंत
दुरावलेला असेन मी!


Thursday, May 23, 2013

सांगावा...

रोजची रात्र सरायची
सकाळी येणा-या तुझ्या सांगाव्‍याची वाट पाहत
पण कालची रात्र अजून सरली नसावी...
कारण...
अद्याप तुझा सांगावा आलेला नाही...
...
...
...

Tuesday, May 21, 2013

रानातला पाऊस

एकांत पायवाटेवर
भुरूभुरू पाऊस पडतोय,
पावलांच्‍या दोन रांगा
आपल्‍या दोघांमागे चालत येतायत
निःशब्दपणे...

आभाळ दाटलंय माथ्‍यावर
आसमंत अंधारुन आलाय
रानातून वारा वाहतोय
अंगावर शहारे उठवत...



हातात गुंफलेली तुझी बोटं

अधिक घट्ट होऊन जातात
मग हळूच बिलगतेस तू मला
झाडाला वेल बिलगावी तशी...

ओलेत्‍यानं चालतोय आपण
पावसाचा आल्हादक नाद ऐकत
डोक्‍यावर पडणा-या सरी
आता रंध्रा-रंध्रातून कोसळतातय...

एक जांभुळ घेतला मागून
झाडाकडून तुझ्यासाठी
त्‍याचा जर्द रंग ओठांवर पसरतोय तुझ्या
मला हेवा वाटतोय त्‍या जांभळाचा...

रानात सुटलेला मंद सुगंध
मातीचा का तुझ्या सोबतीचा... ते समजत नाही
तुझ्या डोळ्यांत दाटलेलं हे आपलेपण

मनाशी काय हितगुज करत तेच कळत नाही

मागे वळून पाहिलं तर 
वाट झाडाआड दिसेनाशी झालेली
अन् पुढची वाट वरून कोसळणा-या
पावसात हरवलेली...

मी भिजत भिजतच
हलकेच हात हातात घेतो तुझा
आणि चालू लागतो त्‍या ओल्‍या वाटेवर
माझा पाऊस सोबत घेऊन... 


Sunday, May 19, 2013

चंद्र

चंद्र पहाटेच्‍या दिशेनं
मंदगतीनं चालतोय

कुठंतरी हाच चंद्र
आभाळात धावत असेल ढगांमागे 

कुठंतरी वाहत्‍या पाण्‍यात
त्‍याचं प्रतिबिंब असेल थरथरत

कुठंतरी असेल तो
झाडाआड लपलेला

आणि कुठंतरी तो एखाद्या पर्वताआडून
हळूच पाहत असेल डोकावून

शरिरावर अगणित विवरं वागवणारा चंद्र
सर्वांनाच दिसत असेल सुंदर

आणि विस्‍तीर्ण जलाशयाच्‍या काठावर
स्‍वतःचंच प्रतिबिंब पाहत 
चंद्र बसला असेल निवांत
सौंदर्याच्‍या शोधात

मग कधीतरी थकलेला चंद्र 
हळूच कुशीत शिरेल पहाटेच्‍या
तिच्‍या सौदर्याने भारलेल्‍या पहाटवेळी
कुशीतल्‍या मऊ दुलईत लुप्‍त होईल तो

किती छान झोप लागेल त्‍याला...

त्‍या झाडामागे लपून
जलाशयाच्‍या काठावर ताटकळून
ढगांमागे धाऊन थकून गेलोय मी
झोपायचंय मला
पण ही पहाट आहे की उजाडतंच नाही...


Wednesday, May 15, 2013

एक किनारा नदीचा...



एक किनारा नदीचा
एक किनारा नदीचा
एक त्‍या पल्‍याडचा
एक या अल्‍याडचा

एक किनारा नदीचा
सुंदर शेतांनी बहरलेला
एक किनारा नदीचा
शांत वनांनी सजलेला

एक किनारा नदीचा
त्‍या किना-याला पाहतो
एक किनारा नदीचा
या किना-याला पाहतो

एक किनारा नदीचा
पलिकडे जाण्‍याची आस असलेला
एक किनारा नदीचा
हलक्‍या लाटांची गाज असलेला

एक किनारा नदीचा
पुलाच्‍या शोधात असलेला
एक किनारा नदीचा
त्‍याच्‍या सोबतीसाठी चाललेला

एक किनारा नदीचा
पाण्‍यात चंद्रबिंब पाहतो
एक किनारा नदीचा
गुंगलेला किनारा पाहतो

एक पक्षी उडतो किना-यावरून
विसावतो त्‍या किना-यावर
किना-याचा ओलावा
लाभतो किना-याला

एक किनारा नदीचा
ओलावून सुखावलेला
एक किनारा नदीचा
सुखावून ओलावलेला...

Tuesday, May 14, 2013

कोंदण कशासाठी?

मी लिहितो, मी बोलतो
मी व्‍यक्‍त होतो जगण्‍यासाठी
माझ्या भावनांच्‍या सहजतेला
अर्थाचं कोंदण कशासाठी?

Monday, May 13, 2013

पान!

हिरवाईची आल्‍हादक शांतता ऐकलेल्‍या कानांना
शुष्‍क पर्णांचा आवाज बोचत राहतो
त्‍या पानांच्‍या हिरव्‍यागार आठवणी
रुंजी घालतात मनात

त्‍यांचं ऋण व्‍यक्‍त करून
पुढे निघायचं म्‍हटलं
तर पाऊलखुणा उलट्या चालत जातात मागे
नको असतानाही त्‍याचं मन
आठवणीनं हिरवंगार होत जातं

सहवासातले शब्‍द विरून गेल्‍याचं जाणवतं त्‍याला
उरली आहे त्‍या शब्दांतली निःशब्‍दता
भिडणारी... भावणारी... हळूच हितगुज करणारी...

ती निःशब्‍दता त्‍याला समजून घेता येते
हवी तशी
मग मुद्दाम दुस-या वाटेवर चालत जातो तो 
मंद पावलांच्‍या साथीनं

पावलं थबकतात कुठेतरी
त्‍याच्‍यासमोर असतो तोच बसलेला
आतापेक्षा भिन्‍न, कधी छिन्‍नविच्‍च्‍छीन्‍न
कधी बावरलेला, कधी कुणी सावरलेला
उन-पावसाचा खेळ नेहमीचा

पुढं सरकल्‍यानंतर दिसतात काही प्रतिमा
गोठलेल्‍या, पण कधी जिवंत असलेल्‍या
त्‍यात गुरफटलेले क्षण दिसतात त्‍याला
सोडवायला गेलं तर अधिकच गुंतत जातो तो

वाट मोठी असते
पार करणं अवघड असतं
मागे गेलं 
तर माघारी येणं अवघड असतं

तो ऋण व्‍यक्‍त करतो
त्‍या दिवसांचं
त्‍या क्षणांचं
त्‍या शब्‍दांचं
अन् माघारी फिरतो तो

शुष्‍क पानं अजुनही 
असतात त्‍याच्‍या भोवती
कधीतरी वा-याच्‍या झोतानं 
हलतातही ती
पण त्‍यांना स्‍वतःची गती भासत नाही

पानं शुष्‍क होतात
ती गळून पडतात
मातीत मिसळून मूळांना भेटतात
पुन्‍हा खोडांतून वर चढत
फांद्यांवर नव्‍याने उगवतात


पण हिरवीगार असतानाच 
गळून पडणा-या पानांचं काय?