Thursday, July 5, 2018

नखशिखान्त

गावी पाऊस अाला
की घराशेजारून अोढा वाहायचा
मी होडी सोडायचो त्यात
मी खाचखळग्यातून धावत
पाठलाग करायचो तिचा
पार दुथडी भरलेल्या नदीपर्यंत
पण ती निघून जायची पुढे
हरवून जायची पाण्यात
मला नदीचं मोठं पात्र बघितलं की धडकी भरायची
पण तरीही काठावर तासनतास बसून राहायचो
वाटायचं एखादी होडी भेटेल अापल्याला
वरून पडणारा मुसळधार पाऊस
चिखल, भरून वाहणारी नदी
मी नखशिखान्त चिंब होऊन जायचो...

पुण्यात कॉलजच्या गेटवर
पावसाचं पाणी वाहायचं
मी त्यात होडी सोडत असताना
मागून हसली होती ती
पाणेरी डोळे, पावसात भिजलेले केस
भिजून शरीराशी सलगी करणारा पंजाबी ड्रेस
मी त्या दिवशी नखशिखान्त चिंब भिजलो
ती अामची पहिली भेट...

अंधेरी लोकलमधून उतरलो अाणि पाऊस सुरू झाला
तो वरच्या पत्र्यावर मस्त ताशा वाजवत होता
त्या अावाजात धुंद असताना धडक झाली
तिची छत्री अाणि ती दोन्ही फलाटावर अाडव्या
मी हात पुढे करूनही तिने तो घेतला नाही
तिचा फणकारा अावडला, गोड होती
अामच्या ट्रेनच्या वेळा मिळत्याजुळत्या होत्या
रोज डोळ्यांमध्ये 'सॉरी' घेऊन
मी अाणि पाऊस प्लॅटफॉर्मवर तिची वाट पाहू लागलो
नजरेच्या सरी रोज कोसळायच्या
मग एक दिवस तिही भिजली
कॉफी झाली
दुसऱ्या वेळी पिक्चर
काही दिवसांनी बिचवर गेलो
पावसाच्या धुंद वातावरणात तिचा हात पकडला
अाम्ही दोघं रात्री माझ्या रूमवर गेलो
तो मुसळधार कोसळत होता
त्या रात्री अाम्ही दोघं नखशिखान्त...

अाज गावी अालोय
माझी मुलगी अोढ्याकडे गेलीय
जाताना माझ्याकडून होडी घेऊन गेलीय
अाभाळातून पडणारं पाणी
झिरपत, वाहात, कोसळत, वाफ होत
नव्या रूपात पुन्हा खाली येतं म्हणतात...

खिडकीत उभं राहून तिच्या हातचा चहा घेताना
कागदाची होडी अाणि मागे धावणारी छोटी पावलं दिसली
नदीकडे जाणारी...
तू अाता तिलाही नखशिखान्त चिंब भिजव
अायुष्यभर...

No comments:

Post a Comment