Thursday, June 13, 2019

चंद्र अाणि चांदणी

रात्र झाली.
सर्व तारकांना सोडून चंद्र चांदणीजवळ अाला.
निरव पावलांनी...
त्याने पाठीमागून येऊन तिचे डोळे झाकले.
मग मऊसूद प्रकाशाच्या मिठीत तिला सामावून घेतलं.
ती रात्रभर झुळझुळत राहिली.
रात्र चढत गेली.
हलक्या वाऱ्यावर ढग हळुहळू पुढे जात राहिले.
क्षितीजावर झुंजूमुंजू झालं.
चंद्र निघाला.
चांदणी गहिरवली होती.
''किती िदवस अापण असं रात्रीच्या अंधारात चोरून भेटत राहायचं. तू अापल्या नात्याचा दिवसाउजेडी स्वीकार का नाही करत?''
चंद्र उत्तरला - ''मला वाटलं होतं अापलं नातं अशा प्रश्नांच्या पलिकडचं अाहे.''
चंद्र गंभीर चेहरा करून निघून गेला.
चांदणी एकटी उरली.
प्रश्नाचा काटा तिच्या उरात सलत राहिला.
चंद्र पुन्हा अाला नाही.

No comments:

Post a Comment