Friday, February 7, 2020

एक रोमँटीक संध्याकाळ

मरीन ड्राईव्हचा कठडा. दोघे रस्त्याला पाठमोरे बसले होते. मावळतीच्या प्रकाशात तिचा चेहरा पाहायला त्याला फार अावडायचं. म्हणून तर लोअरपरेलहून तो तिला भेटायला इतक्या दूर यायचा!
त्यानं हातातली चण्याची पुडी चुरगाळली अाणि तो तिच्या जवळ सरकला.
''काय झालं? बॉसनं परत चिडचिड केली का?''
''नाही रे!'' तिने नजर खाली झुकवत म्हटलं.
त्यानं तिचा हात हातात घेतला.
''Hey! Cheer up dear! उद्या भंडारदऱ्याला जातोय अापण. तुझा बेत बदललेला नाहीए ना!''
''नाही रे!''
''मग?''
''घरच्यांशी भांडून मुंबईत आले त्याला चार वर्षं झाली. अद्याप स्वत:चं घर नाही, बँकेत पैसे नाहीत. कसं होणार कळत नाही.''
''पण मी आहे की तुझ्याजवळ!'' त्याच्या चेहऱ्यावर किंचित मिश्कीलपणा होता. त्यानं धरलेल्या हातात हलकी ऊब होती.
ती किंचित संभ्रमात पडली. त्याच्या महत्त्वाच्या विषयांना अशी नेहमीच बगल देण्यावर चिडावं की आपला मूड ठिक करण्याच्या त्याच्या प्रयत्नाला हसून दाद द्यावी?
मग ती फक्त कसनुशी हसली. तिनं त्याचा हात हळूच दाबला आणि नजर समोरच्या चमचमत्या पाण्याकडे वळवली.
तिने त्याच्याशी लग्न करण्याचा विचार कधीच मनात आणला नव्हता. तिला तो तेवढा प्रॅक्टीकल वाटायचा नाही. पण त्याची सोबत छान होती. तिच्या दुर्मुखलेल्या मनाला गोंजारणारी एक रोमँटीक संध्याकाळ तिच्या शेजारी बसली होती. तिनं त्याच्या हाताला बिलगत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि डोळे िमटले.
समोरच्या पाण्यावर सांज निवांत पहुडली होती.

No comments:

Post a Comment