Tuesday, April 28, 2020

पावसातली मुंबई

पाण्याने किचकिचलेली
ठिकठिकाणी तुंबलेली
ट्रॅफिकने थबकलेली
चिखल-घाणीने रटरटलेली


रंगेबेरंगी छत्र्यांनी सजलेली
प्रेमी युगलांनी लगडलेली
तिष्ठत रुळांवर डोकावलेली
ट्रेनच्या अोल्या सीटवर विसावलेली

टपऱ्यांच्या आडोशाला जमलेली
खडबड्या रस्त्यांवर चिडलेली
मॉन्सून सेलमध्ये रमलेली
फिरते धंदे सावरुन वळचणीला बसलेली

शहरात शिरलेल्या चुकार वाऱ्यानं चेकाळेली
बॅट आणि बॉल मागे दिवसभर उंडारलेली
शेअर रिक्षा-टॅक्सीत कोंबलेली
मळभाच्या सावलीनं मंदावलेली

रस्सीवरचे कुबट कपडे खेचताना कावलेली
मरीन ड्राईव्हवर छत्रीखाली बिलगलेली
पावसातसुद्धा आईसक्रीमच्या दुकानांत शिरलेली
डांबरावर पडणाऱ्या रिमझिमीत मृदगंधाला तहानलेली

नाल्याच्या घाणेरड्या पाण्यात छोट्या होड्यांसोबत हिंदकळलेली
गल्लीतल्या घरांच्या पागोळ्यांत भिजलेली
रात्रीच्या शांततेत पावसाच्या रिपरिपीत धुंदलेली
पावसातल्या फेसाळत्या समिंदरात उधाणलेली

कुणाच्यातरी आत पाझरुन कागदावर उतरलेली
पहिल्या-वहिल्या चिठ्ठीने रोमारोमात उमललेली
डोक्यावर धरल्या साध्या छत्रीनं डोळ्यांत झिरपलेली
आभाळफुटल्या अंधारात पहिल्या स्पर्शाला आसूसलेली

कशीही असली तरी पावसातली मुंबई...
I just love it!



No comments:

Post a Comment