Wednesday, June 12, 2019

रस्ता

तो छत्री घेऊन शेअर रिक्षाच्या रांगेत उभा होता. ती त्याच्याच रांगेत काही पावलं पुढे. ती खांद्यावरची बॅग सांभाळत, साडीचा पदर एका हाताने अोढून घेत रिक्षाच्या वाटेकडे नजर लावून होती. मधेच तिची छत्री वाऱ्यानं तिरकी होत होती. त्यावेळी तिची होणारी लगबग पाहण्यात तो रमून गेला होता.
ती त्याला नेहमीच तिथं दिसायची. त्या दोघांची एक दोनदा नजरानजरही झाली. पण गाडी त्यापुढे काही सरकली नाही. गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणजे तिच्याशी बोलायला हरकत नाही असं त्याला वाटायचं. पण बोलायचा केवळ विचार जरी केला तरी त्याची धाकधूक व्हायची. तशी त्याला ती अधूनमधून त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकताना दिसायची, पण त्याला तो स्वत:च्या मनाचा खेळ वाटायचा.
त्या दोघांच्या मधे उभी असलेली दोन-तीन माणसं वाट पाहून कंटाळून निघून गेली. तो दोन पावलं सरकून तिच्याजवळ अाला. पाऊस रिपरिपत होताच. तिचा अोलागार पदर वाऱ्याच्या झोताबरोबर त्याच्या हाताला स्पर्शून जाऊ लागला. तो जागच्या जागी शहारत गेला. त्याला कुठलीतरी हरवलेली अनुभूती सापडल्यासारखा अानंद झाला. कुठूनतरी धीर गोळा झाला.
''तुम्ही याच परिसरात राहता का?''
तिनं काहीसं चमकून मागे पाहिलं. तिचे डोळे काळेभोर होते.
''तसं नाही... म्हणजे... मी तुम्हाला अनेकदा इथं पाहतो म्हणून विचारलं.''
''हो... इथेच... सरस्वती सोसायटी.'' तिनं अवघडल्यासारखं हसत म्हटलं.
''अरे वा! अगदी अामच्या समोरची बिल्डींग!'' त्याच्या अावाजात खरंच अानंद होता.
तिनं उत्तरादाखल त्याच्याकडे वळून हलकं स्मित केलं. तिची नजर क्षणभर त्याच्या गडद डोळ्यांवर रेंगाळली.
रिक्षाच्या अावाजाने दोघं भानावर अाली. दोघे शेजारी शेजारीच बसले. पावसाने हलका जोर धरला होता.
''तुमचं कुटुंब इथेच असतं का?'' तिच्याकडून प्रश्न अाला.
''नाही. मी एकटाच अाहे.''
त्याच्या उत्तरावर तिच्या नजरेची हालचाल झाली.
''एवढ्या पावसात कुठं चाललायत तुम्ही?'' त्यानं विचारलं.
''नातवाला शाळेतून अाणायला. अाणि तुम्ही?''
''मीदेखील! माझा मुलगा शेजारच्या विंगमध्ये राहतो.''
दोघेही परस्परांकडे पाहून छानसं हसले. बहुधा दोघांचा रस्ता एकच होता म्हणून...

No comments:

Post a Comment