Sunday, June 24, 2018

त्या अाधी

ढग अाला माथ्‍यावर
तहान ताटकळली काठावर
अन् पाऊस वेडा
बरसायचंच विसरला

चातक शोधतोय पावसाची खूण
अंतरी कडाडते वीजेची धून
अन् वेडा वारा
वाहायचंच विसरला

भिजल्या डोळ्यांनी पाऊस पाडला
भूईचा शिणवटा दूर सारला
अन् मातीचा सुगंध
ढेकळाअाडच दडून राहिला... बाहेर पडलाच नाही

खूप हौसेनं पेरलेलं काही
रान इतकं अानंदी की चिंताच नाही
तरी साला हिरवा कोंब
फुटायचाच विसरला

असंच मग एक दिवस...
सूर्य उगवला नाही
चांद मावळला नाही
पाणी मुरलं नाही
मुरलेलं उमळलं नाही
उमळलेलं वाहिलं नाही
सगळं साचलं
साचतच गेलं

डोहाची डबकी अाणि मनांगनाचे उकीरडे झाले
ज्यांना घेऊन मिरवावं त्या भावनांची लक्तरं झाली
सगळं फाटत, तुटत, विरत, अाटत गेलं
मग सगळं काही मोकळं अाणि वैराण
बरेच पाऊस पडले
सगळं धुऊन निघालं... स्वच्छ!
कोऱ्या कागदासारखं

निदान त्यावर अाता नवं चित्र काढता येतं

No comments:

Post a Comment