नदी
खळखळत वाहणा-या त्या नदीला पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो. तिचा नाद, तिचा प्रवाह, तिचं अस्तित्व या सगळ्यात गुंतलो होता. काठावर बसून तासनतास तिच्याशी बोलताना मनःशांती अनुभवली होती. प्रेम, स्नेह, व्याकूळता, ओढ असे अनेक भावरंग मला पाहता आले. आयुष्याबद्दल किती अश्वस्त होतो मी.
मग माझ्या पाठीमागे काहीतरी घडलं म्हणून मागे वळून पाहिलं तर कानांना ऐकू येणारा खळखळाट अचानक थांबला. समोर पाहतो तर नदीचा बर्फ झालेला. मी घाबरून दोन्ही हातांनी बर्फाचं ते आच्छादन जोरजोरात ठोठावू लागलो. पण तो प्रवाह कुठे लुप्त झाला कुणास ठाऊक? तो बर्फही एवढा कठोर की त्या प्रवाहाचे ओघळही तिथे दिसत नाहीत.
अजूनही कधी कधी मी त्या काठावर जाऊन बसतो. आता नदी नसते... तिचा आवाज नसतो... तो ओघवता प्रवाह नसतो... असतो तो मनाला बोचणारा जीवघेणा थंडगार बर्फ... भावनाशून्य दगडासारखा...
No comments:
Post a Comment