माणसाचं मन आहे ना, हे एक खूप अजब ठिकाण आहे. तिथे कोणत्या आणि काय घडामोडी सुरू असतील हे कुणालाच सांगता येणार नाही.
म्हणजे मी जेव्हा अस्वस्थ होतो ना तेव्हा माझ्या मनात खूप मोठा गलबला होतो. आतलं सगळं ढवळून निघत जातं. कुठल्याही एका विचारावर लक्ष केंद्रित करणं अशक्य होऊन बसतं. मग सुरू होतात मनाचे चित्रविचित्र खेळ. एक अस्पष्ट असं जग उभं राहतं मनाच्या पटलावर. त्यात खूप काही असतं. आयुष्यातील अनेक व्यक्ती, कधीच न घडतील अशा घटना, आवाज, संवाद, सुख-दुःख-आनंद-निराशा अशा कित्येक भावनांची भरती... बरंच काही.
हे सगळं एकामागोमाग एक येत जातं. त्याची गती वाढत जाते. मग त्यांचं सुटेपण हरवत जातं. प्रत्येक गोष्टीच्या पोटातून दुसरी गोष्ट बाहेर पडायला लागते. गलका होतो सगळ्यांचा. डोळ्यांसमोर एकाचवेळी अनेक घटना दिसायला लागतात. विविध स्वरूपाच्या. विविध अंगाच्या. प्रत्येक घटनेचं स्वरूप वेगळं. स्तर वेगळा. भाव वेगळा. कुठे सगळं स्थिरस्थावर असतं. कुठे सगळाच विध्वंस झालेला असतो. कुठे मला कशाचं तरी उत्तर सापडलेलं असतं तर कुठे सगळं हरवल्याची भावना असते. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर जगावं लागतं. सगळीकडे गुंतावं लागतं. गुंतलो नाही तर कशाची तरी रूखरूख लागते. मन पोखरणारी.
बरं! हे सगळं घडतं अगदी एकाच वेळी. फक्त वेगवेगळ्या स्तरांवर. त्या स्तरांत घडणा-या घटनांचा परिणाम माझं मन रिचवू पाहत असतं. मी एकाच क्षणी विविध पातळ्यांवरील घडामोड पाहत असतो. ब्रम्हदेवानं ब्रम्हांडाची उत्पत्ती पाहिली असेल तशी. त्या सर्व स्तरांवरून माझ्याकडे वाहणारे निरनिराळे प्रवाह मला घटाघटा प्यावे लागतात. ते सारं डोक्यात चढत जातं.
मग अस्वस्थेच्या एकामागोमाग एक अशा कितीतरी पाय-यांवरून मी टप्पे खात कलंडत जातो. त्या -हासाला अंत नसतो. फक्त कडा असते. त्यावरून पुन्हा खाली कोसळत जाणं... जणू मी एखाद्या निर्वातात सूर मारला असावा आणि तळाच्या दिशेनं वेगानं जातच रहावं... जातच रहावं... जातच रहावं...
त्या कोसळण्याला पार नसतो. किनारा नसतो.
क्षमाही नसते.
मी भेलकांडत असतो. सावरायला कुणी नसतं. मीही नाही.
मला मिळालेली गती सहन होण्यापलिकडे वाढत जात असते. किती अंतर कापलंय याचा अंदाज नसतो. किती खोल चाललोय याचं भान नसतं. पुन्हा वर जाता येईल की नाही ते ठाऊक नसतं.
आणि दुस-याच क्षणी मी माझ्या जागेवर बसलेला असतो.
अगदी शांत. निश्चल.
कानावर पडणारा वेगाचा आवाज क्षणार्धात नाहीसा झालेला असतो. शांतता विचित्र भासत असते.
गुंत्यातून बाहेर पडल्याची भावना असते. पण फक्त भावना.
गुंता तसाच असतो.
गुंतलेला...


No comments:
Post a Comment