Wednesday, December 21, 2022

सॉलिट्यूड

तुला माहितीय! लडाखला रात्री जेव्हा नितळ अाकाशात चंद्र उगवतो ना, तो फारच सुंदर दिसतो. त्या थंडगार रात्री जगजीतची गझल ऐकताना मला काळाचा वेग मंदावल्याचा भास झाला होता.
धर्मशालेतल्या एका बर्फाळ सकाळी बाहेर आलो तेव्हा जगातले यच्चयावत अावाज संपून गेले होतो. माझ्या सगळ्या खुणा, सारे पाश दूर मागे पडून केवळ मी उरलो असल्याचं फिलींग होतं ते. तिथला आसमंत स्वर्गीय होता. भूतकाळातली सगळी घडामोड, मनावर उठलेले सगळे ओरखडे विसरण्यासाठी मला जगाचं हे कुठलंसं टोक गाठावं लागलं होतं. वाटलं होतं, भवताला शांत असेल तर आतली खळबळ ऐकू येणार नाही. पण गणित चुकलं होतं. आतल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पुढे जात राहिलो.
लाटांची घनगर्द गाज ऐकू येणारा ओरीसाचा शांत, निर्मनुष्य समुद्रकिनारा. पृथ्वीच्या अारंभकाळातल्या एखाद्या क्षणासारखा वाटला होता मला. मी तिथंच, काळोख्या रात्री आकाशावर उमटलेली, रात्रीच्या एका टोकाकडून पहाटेच्या दुसऱ्या टोकाकडे मूकपणे वाटचाल करणारी नक्षत्रं पाहिली. सृष्टीचं हे अलगद होत असलेलं स्थित्यंतर अगदी देखणं होतं. तरीदेखील हवं असलेलं सापडत नव्हतं.
कशाने शांत होत असेल माणूस? आत पेटलेल्या आगीवर उतारा काय असतो? कळतं नव्हतं. नक्षत्रं डोक्यावर घेऊन दुसऱ्या टोकाकडे चाललो राहिलो.
तमिळनाडूतल्या घनदाट अरण्यात पडणारा मुसळधार पाऊस पाहिला. बोचरी थंडी वाजवणारा. सृष्टीच्या कल्लोळात धुंद करुन टाकणारा. पाऊस थांबला. झाडं निथळत राहिली. शांतता थेंबाथेंबानं साचत गेली. पण आतला कल्लोळ निवला नाही.
विलक्षण समाधानाने अोथंबून-अोसंडून टाकणारं एकटेपण ठिकठिकाणी शोधत राहिलो. त्या क्षणामध्ये सॉलिट्यूड गवसेल असं वाटलं होतं. नाही सापडला तो.
पण तू भेटलीस!
एकाचवेळी रेनफॉरस्टमधल्या मुसळधार पावसासारखी, जैसलमेरमधल्या स्निग्ध-तप्त सायंकाळसारखी.
तुझ्यासोबत थांबावसं वाटलं. तूही थांबू दिलंस. तू माझ्या वाटेनं सोबत चाललीस. आपण विशेष काही बोललो नव्हतो. मी माझी भूतं तुझ्यासमोर नाचवली नव्हती. तरीदेखील तुला मला समजून घेता येतंय असं का वाटत राहिलं?
तू तुझ्या वाटेनं पुढं जाऊ लागलीस तेव्हा मी तुझ्यामागे आलो. नाहीतरी माझी अशी वाट कुठे उरली होती मला? तुझ्यामागे चालताना मला वाट शोधण्याची भ्रांत उरली नव्हती. तुला पाहून तुझ्या गोष्टी करताना, त्यातून तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी आनंदाची लकेर शोधताना मला इतर गोष्टींचा विसर पडत चालला होता.
आणि आता जेव्हा तुझ्या छातीवर डोकं टेकवून मी शांत पहुडलोय, तेव्हा कितीतरी दिवसांनी मला आतलं सारं काही शांत शांत होत गेल्यासारखं जाणवतंय. तुझ्या छातीतली हलकी किणकिण माझ्या कानात शिरतेय. तुझ्या अस्तित्वाचा तो मंदनाद रिचवत माझं मन निद्रेच्या, स्वप्नांच्या काठावर हलकी अावर्तनं घेतंय. या क्षणात मला हवं होतं ते सापडल्यासारखं वाततंय. 
प्रचंड निश्चिती आणि जिव्हाळा. तुझ्या स्पर्शातून माझ्याकडे पाझरत येणारी शांतता. हाच तो सॉलिट्यूड असेल का?
काही असो, पण या क्षणात एकाचवेळी एकटं असण्याची आणि तू सोबतही असण्याची ही दुहेरी फिलिंग भारीय!

No comments:

Post a Comment