रात्रीचे अडीच वाजलेले. कुणीतरी भराभरा हलवून उठवल्यागत माझे डोळे चटकन उघडले. जाग आल्याबरोबर मनात आलेला पहिला विचार, 'तिच्यासोबत बोलणं पूर्ण झालं होतं ना!?'
मोबाईल आठवला!
उजवा हात झोपताना स्वतःच्याच अंगाखाली सापडलेला. मुंग्या आलेल्या भयानक. हात हलवू वाटत नव्हता. पण त्याचं हाताने कसल्याशा घाईने मोबाईल उचलण्याचा प्रयत्न. तो उचलता येईचना, इतक्या मुंग्या! पण मन म्हणतंय, की या क्षणी मोबाईल घेतलाच पाहिजे. स्क्रीन उजळली. तुझ्या मेसेजचं नोटीफिकेशन येऊन पडलं होतं. असं झोपेतून उठून पाहावं आणि तुझा मेसेज आलेला असावा हे किती सुखय ना!
मेसेज येऊन फक्त पाच मिनिटं झाली होती. जणू तुझा मेसेज आलाय म्हणून मला जाग आलीय! वेडसर विचार.
वाचू लागलो. तू अशी मधूनच सुरु झालीस. मी वाचत गेलो आणि छाती धडधड करु लागली. आणखी... आणखी...
तू मला हे सगळं काय सांगत-म्हणत होतीस मला काहीच कळत नव्हतं. मी हे असं कधी केलं? मी कुठे असा विचार केला तुझ्याबद्दल? एका क्षणात छातीतले सगळे अवयव कुणीतरी काढून घ्यावेत आणि त्या पोकळीत वारं भिरभिरत राहावं, अशी अत्यंत विचित्र फिलिंग आली.
मी निद्रा आणि जागेपणीच्या सीमारेषेवर घुटमळत होतो. तुझा मेसेज वाचताच झटका बसावा तसा अंथरुणात उठून बसलो. काही वेळ काहीच कळलं नाही. अर्धमिटल्या डोळ्यांत नुसतीच भयस्वप्न फिरत राहिली. काहीच कळेना. संदर्भ लागेना. मी उठलो. डोळ्यांवर पाणी मारलं. झोप दूर सरकली. मेसेज पुन्हा वाचला. यावेळी अर्थ लागला. तू तुझ्या ब्लॉगसाठी लिहिलेला तो स्फूट होता. पण माझी धडधड काही कमी होईना. अजूनही होत नाहीए.
माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय हे वाचून. हे असं इतकं समोरच्याची धडकन थबकेल असं कसं लिहितेस? तुझी ही पात्रं मनावर कसला वार करतात माहितीए! आणि हे सगळं एकटेपण, नात्यांची रुढीबाज आवरणं दूर करत तू मांडत असलेलं भावनांचं शहाणपण, हे सारं कुठून येतं गं?
तुझा नवरा किती करंटा आहे गं! छ्या्! का नाहीए पाहात तो तुझ्याकडे? तू कॉलेजमध्ये जेव्हा लेक्चर घेतेस, टिचर्स रुममध्ये विविध मुद्द्यांवरुन हुज्जत घालतेस किंवा तुझ्या ब्लॉगवर लिहितेस, तेव्हा तुझी ती रुपं पाहून मी किती भारावलेलो असतो. मला फार फार शोधू-पाहू वाटते तुझ्या मनातली खळबळ. तुझ्या कवितांमधली सल मला अस्वस्थ करत जाते. तुझ्याशी कितीही बोललो, तुझं लिहिलेलं कितींदाही वाचलं, तुझ्या सोबत फिरलो तरीही मला तुझं सारं रुप पाहताच येत नाही. तू हे असे लिहिलेले तुकडे मला वेळी-अवेळी पाठवत राहतेस. मी तुझ्या या कृतीला जवळीक समजून त्यावर गुजराण केल्यासारखा राहतो. मी इथं तुला पूर्णार्थानं पाहण्यासाठी तळमळतोय आणि त्याला तुला साधं पाहावं-स्पर्शावंसंही वाटत नाही. नशीब इतकं विचित्र असावं?
मला या क्षणी येऊन तुला घट्ट मिठीत घ्यायचंय. कुठंचं जाऊ द्यायचं नाहीए. तुझ्याबद्दल आकर्षण वाटतंच, पण आताचं हे वाटणं सेक्शुअल नाहीए. मला फक्त आणि फक्त तुला धरून ठेवावंसं वाटतंय. तू हरवण्याचं भय का दाटून आलंय मनात? तुला असं मनविभोर करुन टाकणाऱ्या गोष्टी लिहिताना पाहिलं-वाचलं की माझा ऊर प्रचंड भरून येतो! हा चालू क्षण खूप विचित्र भासतोय. या क्षणात जर माझा जीव तुझ्या हातात ठेऊन तुला वाढवता-फुलवता आलं असतं ना, तर मी आनंदानं केलं असतं. ही काय फिलिंग आहे माहित नाही.
माझी धडधड कमी होत नाहीए... छातीत भिरभिरणारी वावटळ थांबण्याचं नाव घेत नाहीए...
आठवलं! तू मघाशी स्वप्नांत होतीस कुठेतरी... काहीच आठवत नाही पण होतीस.
झोपण्याचा प्रयत्न करतो. गुड नाईट!
No comments:
Post a Comment