कोशबंद समाजामध्ये
विवस्त्र हिंडतो मी
त्यांच्या नजरेतल्या नग्नतेचा
भार वाहतो मी…
ती नजर छळत राहते मला
म्हणून डोळे झाकून घेतो मी
तर आंधळा समजून माझ्यावर होतो
अगणित दगडांचा वर्षाव
रक्तबंबाळ होत जातो मी आतून
पिचत जातो तिथला गाभा
मोकळं जगणं खरंच
एवढं महाग असतं का हो?
का चिडतात ते माझ्यावर?
मी त्यांच्यातला होत नाही म्हणून?
कि त्यांना माझ्यासारखं होतो येत नाही म्हणून?
कुणीच स्पष्ट बोलत नाही
मला विवस्त्र पाहून
ते तोंडं फिरवतात
स्वतःच्या नागडेपणाकडे
सोईस्कर दुर्लक्ष करून
नागव्यांची जत्रा भरलेली असते
झुंडीत
आणि मी असतो एकटा
अनावृत्त शरिरांचा नाच पाहात
चुकीचं असलं तरी
मला मग वाटू लागते लाज... स्वतःचीच
मलाही सामिल व्हायचं असतं
त्या नाचामध्ये
पण जमत नाही
मी स्वतःला परवानगी देत नाही
एकटेपण होत जातं अधिक गहिरं
मी उगाच आक्रसत जातो...
आकुंचतो
कधीतरी संपतो...
… मला पडदे ओढून जगणं
जमायला हवं होतं!


No comments:
Post a Comment