Sunday, June 5, 2011

पाऊस....!




आज पुन्‍हा बरसला तो
बेधुंद... मुक्‍त...
मी खिडकीतून त्‍याला न्‍याहाळत होतो
त्‍याचा आवेग स्‍तब्‍ध करणारा होता
त्‍याला तेवढ्याच आवेगानं मिठीत घ्‍यावंसं वाटतं होतं


एका बाजूला जगजीतचे आर्त स्‍वर कानावर पडत होते
दुसरीकडे कसलीतरी अजाण वेदना मनात रेंगाळत होती
पापण्‍यांच्‍या ओलसर कडा मी प्रकर्षानं सावरल्‍या होत्‍या
पण बाहेर कोसळणारा तो वेडा पाऊस मला म्‍हणत होता,
वाहून जाऊ दे.....


मग घराबाहेर पडलो
त्‍या धारा अंगावर झेलत चालू लागलो
बरसणारं पाणी रोमारोमातून आत झिरपू लागलेलं
आतून बाहेरून ओलाचिंब झालो


सगळा आसमंतच धो धो बरसत असल्‍यासारखा
त्‍यात तो आल्‍हाददायक गारवा...
मघाची मनाची काहिली कुठल्‍याकुठं पळाली
आतापर्यंत वाटणारं एकटेपण दूर झालं
तो माझ्यासाठी धावून आला होता


तो मला समजावत राहिला
होतं असं कधी कधी
त्‍यात काय एवढं?
माणसानं कधी साचून राहू नये
जे असेल ते वाहू द्यावं!




कोसळणा-या पाण्‍याचा आवाज सभोवताली दाटून राहिला होता
डोक्‍यावर पडणारं पाणी गालावरून ओघळत होतं
त्‍या आडोशाच्‍या आड मीही वाहू लागलो
खरंच... तो माझ्यासाठी धावून आला होता...!

No comments:

Post a Comment