Friday, June 17, 2011

मी वाट पाहतोय...


शांत... सुंदर चांदणं पडलंय
समुद्रावर गार वारा सुटलाय
लाटांची गाज कानावर येतेय
आणि मी वाट पाहतोय...

सगळं काही उंब-याजवळ काढून ठेवून
अनवाणी पायांनी वाळूतून चाललोय
माझ्याच पावलांची मागे पडलेली रांग दूरपर्यंत गेलेली दिसतेय
तिथून इथपर्यंत कसा काय एकटा आलो कुणास ठाउक?
पण इथून पुढे एकट्यानं नाही चालवंत आता

मान वळवून समोर पाहतो तर अथांग पहुडलेला समुद्र दिसतोय
मला जायचंय त्‍याच्‍याकडे... पण असं एकट्यानं नव्‍हे!
त्‍या पाउलखुणांवरून कुणीतरी येईल, अशी आस आहे मनात
म्‍हणून वाट पाहतोय...


ती वाट अशीच कोरी राहिली
तर इथेच अडकून पडायची भीती वाटतेय
मला तर त्‍या समुद्राला कवटाळायचंय
चिंब भिजून मग आकंठ बुडून जायचंय
पण असं एकट्यानं नव्‍हे!
म्‍हणून वाट पाहतोय...


अद्याप त्‍या पाउलखुणा एकट्याच दिसतायत
कुणी येईल की नाही अशी शंकाही येतेय मनात
त्‍यांचं रिकामंपणं समजू शकतो मी
पण त्‍यांना खोटा दिलासा नाही देता येत मला
त्‍यांना सोबत म्‍हणून त्‍यांच्‍या शेजारी बसलोय
आणि मीही वाट पाहतोय...


रात्रीच्‍या वेळी या विस्‍तीर्ण समुद्रकिना-यावर उभं असताना
खूप एकटं वाटतंय
या जगात माझ्याशिवाय कुणीच नसल्‍यासारखं
इथं माझ्या अस्तित्‍वाची जाणिवच संपत चालल्‍यासारखी
'मी अजून आहे' हे सांगणारं कुणीतरी हवंय!
म्‍हणून वाट पाहतोय...


रात्र गडद होत चाललीय आणि सोबत माझं रिकामंपणही
या अंधाराची आता भीती वाटू लागलीय
हात चाचपडतायत आधारासाठी
स्‍वतःमध्‍ये हरवून गेलो तर पुन्‍हा जड जाईल शोधणं
पण मला हरवायचं नाहीए
मला पहायचाय सूर्योदय उद्याचा
पण तो पाहण्‍यासाठी दोन डोळे हवेत कुणाचेतरी
म्‍हणून वाट पाहतोय...

No comments:

Post a Comment