Wednesday, June 15, 2011

वेड्या आठवणी




















धरणीची तगमग आणि मेघांची चाहूल
तहानलेल्‍या मातीला बरसणा-या थेंबांची भूल
सृष्‍टीमिलनाच्‍या सोहळ्याला आतुरलेला आसमंत
थेंबाच्‍या स्‍पर्शागणिक येतो मातीचा गंध

त्‍या गंधांशी जोडलेल्‍या कित्‍येक आठवणी 
हळूवार फुललेल्‍या दिवसांची सुरेल गाणी
दूरवरून येणा-या त्‍या गाण्‍यांचे सूर आजही कानात गुंजतात
ह्रदयाची तार छेडत ते कोवळे दिवस जागवतात


...तिच्‍या ओझरत्‍या स्‍पर्शानं तेव्‍हा रोमरोम बहरायचा
एका नजरभेटीसाठी जीव खालीवर व्‍हायचा
त्‍या अजाण भावनांचं मनावर उगाच दडपण यायचं
पोटातलं ओठावर आलं तरी पुढं नाही सरकायचं

त्‍यानंतर असायची...


झाडाखाली वाट पाहत उसासून गेलेली एक संध्‍याकाळ
तिची चाहूल लागल्‍यावर स्‍तब्‍ध झालेला काळ
डोळ्यांची केलेली पारायणं आणि तिष्‍ठत राहिलेले शब्‍द
हातात गुंफलेल्‍या हातांनी उसळलेलं रक्‍त


... मग न चुकलेली एक संध्‍याकाळ यायची

समुद्राच्‍या काठावर दाटून आलेली कातरवेळ
ओलावलेल्‍या कडांनी पाहिलेला नियतीचा तो खेळ
कोवळी पायवाट सरते आणि हमरस्‍त्‍यावर येतात पावलं
सोबतीला आठवणींचं दान जे भावगर्भात मावलं


आज अवचित सय येते दाटून
आणि पापण्‍यांची दारं भिजून चिंब होतात
आजही पावसात येणा-या त्‍या गंधाला
या वेड्या आठवणी अशाच सोबत करतात

No comments:

Post a Comment