ए,
तुझी वाट पाहत माझा श्वास थांबलाय
खरंतर माझं ह्रदय सुरूय, शरीर चालतंय, काम करतंय
आणि तरीही मला कळतंय
की छातीतल्या छातीत कुठेतरी
माझा श्वास थांबलाय...
जगात सूर्य उगवल्यानंतर जशी प्रसन्नता येते
पाऊस पडल्यानंतर जशी हिरवाई पसरते
गारव्यात गवतावर दव पडतं
बीज रुजल्यानंतर रोप अंकुरतं
तसं काहीतरी तुझ्या येण्याने होणार आहे.
किंवा मग नुसताच शांत गार वारा वाहिल,
समुद्राचं पाणी उन्हात निवांत चमचम करत राहिल
या ब्रम्हांडात ही पृथ्वी अलगद तरंगत विहरत राहिल
पण ते जे काही असेल, ते सारं सुंदर असेल हे मला माहितीय
तुझ्यासोबत सारं काही छान असणारंय
तू आणि मी एकत्र येणं हे एखादं फुल उमलावं तसं तरल असणारंय
आणि त्याचवेळी; विश्व निर्माण होण्यासारखं प्रकांड विस्तीर्णसुद्धा
Sunday, February 22, 2026
विश्व
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment