Monday, May 23, 2011

एक अधुरी पायवाट...

आयुष्‍यभर जपून ठेवावी
अशी एक सल आहे मनात
या सुखानं चालणा-या आयुष्‍याला
एखादी तीट लावावी तशी

...ती कोवळी पायवाट कित्‍येकदा पायाखालून गेली
पण तिथं तिष्‍ठत असलेल्‍या पाकळ्यांची आर्तता माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही
माझ्याच ओंजळीत असलेल्‍या त्‍या पाकळ्या
माझ्यासाठी अस्‍पर्शीत राहिल्‍या... अखेरपर्यंत

मग वा-याच्‍या एका झुळूकेनं वाहून आणला 
त्‍या पाकळ्यांचा गंध माझ्यापर्यंत
आणि त्‍या गंधासोबत जाणवली
त्‍यांच्‍या उरातली ती धगही

आजही तेवढ्याच निरागसतेनं, शांतपणे तो गंध माझ्यापर्यंत येतो
पण त्‍यापलिकडूनही जाणवतं त्‍यामागचं मुकेपण
हे सगळं बोचतं मला आतून, फार अस्‍वस्‍थ करत जातं...
त्‍या मुकेपणाच्‍या सावलीत माझंच मन आता गहिरं होत चाललंय

त्‍यांच्‍या नकळत मी स्‍पर्श केला त्‍यांना
अगदी अलगद...बेमालूमपणे
आणि माझ्या बोटांवर उठला त्‍या पाकळ्यांचा पुसटसा रंग
हलका... कदाचित कधीच न जाणारा...

त्‍या पाकळ्यांवर उमटले असतील आजवर कित्‍येक भाव... माझ्या नकळतच
अन् पहाटेचं दवबिंदू विरून जावं तसे विरूनही गेले असतील
त्‍यांचं पोकळीतलं ते जगणं-मरणं मी आज क्षणाक्षणाला अनुभवतोय
तेवढ्याच तिव्रपणे, जेवढं कधी त्‍यांनी असेल अनुभवलेलं

त्‍या पाकळ्यांच्‍या स्‍पर्शासाठी आज आसूसलोय मी
पण तो स्‍पर्श एकार्थाने केव्‍हाच दूरावलाय माझ्यासाठी
त्‍यांनी आजवर ओथंबून भरलेली माझी ओंजळ
अवचितपणे रिकामी झालेली दिसतेय मला

मला नाही देता आला त्‍यांचा अधिकार
याला कारणीभूत माझी आत्‍ममग्‍नता की त्‍यांची निःशब्‍दता?
उरली ती, भावनांच्‍या फसव्‍या क्षीतीजरेखेवर घुटमळणारी पावलं
अन् स्‍वतःच्‍याच डोळ्यांसमोर होणारा स्‍वतःचा सूर्यास्‍त

जगण्‍यातल्‍या भेगा भरणं या जन्‍मी शक्‍य नाही
फक्‍त त्‍यांची खरवड इतरांना जाणवू नये म्‍हणजे झालं...
मनाच्‍या तारा झंकारून उठल्‍यात
फक्‍त त्‍यांचा नाद आतून बाहेर जाऊ नये म्‍हणजे झालं...

त्‍या अव्‍यक्‍ताची वेदना माझ्या उरी उमटावी
त्‍याच्‍या नकळतच त्‍याच्‍या वेदनेला मीही साथ द्यावी
आयुष्‍याचा किती मोहक खेळ हा...
वेदनांचा थोडा भार त्‍यानं उचलावा... थोडा माझ्या वाट्याला यावा
''आता यालाच खरी साथ म्‍हणून का?''

सागराला भेटत असताना
वाटेतल्‍या ओढ्यांची ओल असावी तिच्‍या किना-यावर
कारण तिकडे ओढ्यांनीही जपून ठेवलेत
आपले ओलसर किनारे!

या जंगलातल्‍या सगळ्याच पायवाटा
बाहेर पोहोचतात असं नाही...
कधी कधी काही पायवाटा अर्ध्‍यातच विरून जातात
त्‍या अफाट जंगलाच्‍या ह्रदयगर्भात मनोमन मिसळून जाव्‍या तशा...

... ही अधुरी पायवाटही तशीच विरून गेली...

No comments:

Post a Comment