दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये नाटक पाहायला गेलो होतो. एकटाच!
शिवाजी मंदिरला गेलो की 'मॅजेस्टीक'च्या बुक गॅलरीत चक्कर टाकायचा शिरस्ता आहे. तेव्हा खिशात शिलकीचे पैसे राहू लागले होते. पुस्तकं विकत घेऊ लागलो होतो. तिथे पुस्तकांच्या रांगांतून फिरता फिरता 'ऐक! टोले पडताहेत! - रत्नाकर मतकरी यांच्या ३० गूढकथा' हे पुस्तकं दिसलं. घेतलं.
थेटरात सीटवर येऊन बसलो. नाटक सुरू व्हायला वेळ होता, पण बॅगमधलं पुस्तक चैन पडू देत नव्हतं. पुस्तक काढलं. वाचायला सुरूवात केली. आजुबाजूची सगळी लोकं येऊन बसली. अनाऊन्समेंट झाली. नाटक सुरू होण्यापूर्वी माझी शिर्षक कथा वाचून झाली होती. पुढची 'तारकर' ही कथा वाचायला सुरू करणार इतक्यात दिवे मंद झाले. नाटकाचे तिसरे टोले पडले. थोडा हिरमुसलो. वाटलं, शिवाजी मंदिरऐवजी शिवाजी पार्कात जाऊन बसलो असतो तर बरं झालं असतं. प्रयोग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकाचा रसभंग करणारं ते बहुधा पहिलं नाटक.
रत्नाकर मतकरींच्या लेखनाशी मी नेमका कधी जोडलो गेलो ते आठवत नाही. मात्र फार मागे जाणारी आठवण तिच! त्या पुस्तकानंतर मतकरींची एकामागोमाग एक सर्व पुस्तकं कपाटात जमा झाली. ते नाटककार होते. त्यांनी वैचारिक लेखन केलं, लहान मुलांसाठी कथा-नाटकं लिहिली. पण मी त्यांच्या गूढ जगताने जास्त भारावलो. त्यांच्या कथा धुंद करणाऱ्या होत्या. निजधाम, निर्मनुष्य, पावसातला पाहुणा, फिरून त्याच जागी अशा कित्येक कथांची निवेदनशैली-कथेची रचना अफलातून होती. त्यांची 'कोळसा' ही कथा डेल टोरोच्या 'डेव्हील्स बॅकबोन' या सिनेमाच्या प्रकृतीशी जुळणारी वाटली होती.
'बुकशेल्फ' सुरू केल्यानंतरही भरतच्या फ्लॅटवर आमचा बहुभाषी बुक क्लब सुरूच होता. मी त्यात मतकरींच्या 'पावसातला पाहुणा' आणि 'कोळसा' या कथा हिंदीत भाषांतरीत करून वाचल्याचं आठवतं. हिमाचलचा भरत आजही 'कोळसा' या कथेची आठवण काढतो.
मतकरींच्या अनेक कथा वाचताना स्क्रीनप्ले वाचल्यासारखा फिल यायचा. हे स्पष्ट जाणवलं ते त्यांच्या 'कबंध' या कथेमधून. त्यांनी उत्तम लघुकथा लिहिल्या, त्यामागे त्यांना नाटक आणि सिनेमा या माध्यमांची असलेली जाण नक्कीच कारणीभूत होती. त्यांच्या लेखनात नेमकेपणातून परिणाम घडवण्याची ताकद होती.
आम्ही 'थिंक महाराष्ट्र' आणि 'ग्रंथाली'च्या माध्यमातून रामदास भटकळ यांची जाहीर मुलाखत घेतली होती. त्यावेळी रत्नाकर मतकरी मुलाखतकाराच्या भूमिकेत होते. मुलाखतीच्या तयारीच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही भेटीगाठी झाल्या.मतकरींनी माणसातलं, त्याच्या कृतीविचारांतलं गूढ मांडलं. मानवी मनाइतकं गूढ काहीच नाही हे त्यांच्या लेखनातून पानोपानी प्रत्ययाला येतं. माझ्यावर झालेल्या वाचनाच्या संस्कारात रत्नाकर मतकरींच्या साहित्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments:
Post a Comment