| अवतार चित्रपटातील नावी जमात |
| 2009 मधे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला टीव्हीवर ‘अवतार’चे प्रोमोज येऊ लागले होते. ती विचित्र माणसं, त्यातले वेगळे प्राणी हे सगळं पाहून हा फार जुन्या कालखंडात घडणारा चित्रपट असावा असा समज झाला. चित्रपट पहाण्याची आवड आणि कॅमरूनचं नाव यामुळे इतरांप्रमाणे मीदेखील चित्रपट पहायला गेलो. प्रत्यक्षात ती निघाली सायन्स फिक्शन फिल्म. पाहताक्षणी मला चित्रपट खूप आवडला. पृथ्वीवर खनिजांच्या जाणवत असलेल्या कमतरतेमुळे माणसं पँडोरा नावाच्या एका ग्रहावर खनिजांच्या शोधार्थ जातातं. तिथं नावी नावाची मानवसदृष्य जमात वास्तव्यास असते. ही खनिजं प्राप्त करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नावींशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी त्यांच्यापैकी एकास नावींकडे पाठवण्यात येते. त्यानं मैत्री करून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षीत असतं. पण घडतं उलट. नावींचं आयुष्य जाणून घेताना तो माणूस त्यांच्याशी एकरूप होत जातो. अखेरीस झालेल्या नावी विरूद्ध मानव अशा युद्धात नावींच्या बाजूनं उभा ठाकतो. निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात असलेला माणसाचा पुन्हा निसर्गाकडे होणारा प्रवास इथं दिसतो. असो; चित्रपटाचं परिक्षण लिहीण्याचा इथं उद्देश नाही. निसर्ग आणि मानवावर आधारलेली चित्रपटाची ही संकल्पना आवडण्यासारखी होतीच, पण त्याचबरोबर चित्रपटातले ग्राफिक्सही तितकेच प्रभावी होते. नावी जमातीचं शरिर हे जवळपास आठ ते दहा फूट उंच होतं. त्वचेचा निळा रंग, लांब कान, शेपटी, मोठाले डोळे, रूंद नाक, मांजरासारखी बुबुळं अशी त्या शरिराची इतर वैशिष्ट्यं होती. हे झालं केवळ त्यांच्या शरिराचं वर्णन. पँडोरा ग्रहावरचा निसर्ग, आश्चर्यकारक आकाराची झाडं, ड्रॅगनसारखे प्राणी, नावींच्या राहण्याचं ठिकाण असं सगळंच विशेष तांत्रिक मेहनतीनं तयार केलं होतं. तो निसर्ग वेगळा आहे हे दाखवणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे ही सगळी वैशिष्ट्यं बऱ्याच प्रमाणात मनाला पटतात. चित्रपट पाहिल्यानंतर हा निसर्ग, कसा तयार करण्यात आला असेल? याचं चित्रीकरण पृथ्वीवरच्या कोणत्या भागात करण्यात आलंय? त्या नावी जमातीचा मेकअप नक्की कसा केलाय? हे काही केल्या मला कळेना. अखेर हे सगळं फार चांगल्या पद्धतीनं तयार केलंय, असं ढोबळ विधान मनात ठेऊन मी गप्प बसलो. माझा लहान भाऊ सूरज अॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्टचा कोर्स करतोय. त्यानं हा चित्रपट पाहिला. त्याच्या शिक्षणाच्या जवळची गोष्ट म्हणून तो त्यातल्या खाचाखोचा शोधू लागला. एक दिवस आम्ही बोलत असताना अवतारचा विषय निघाला. तेव्हा मी पँडोराचा निसर्ग दाखवण्यासाठी कॅमरूनने ज्या जागांची निवड केली त्या छान आणि वेगळ्या होत्या असं म्हटलं. त्यावर सूरज म्हणाला, ‘‘दादा, तो सगळा चित्रपट स्टुडीओच्या आत शूट झालाय.’’ आता हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. माझा विश्वास बसत नाही म्हणून सूरजने मला अवतारची मेकींग ऑफ दाखवली. मी पाहिलेले (नावी जमातीच्या रूपातील) कलाकार प्रत्यक्षात चेहºयाने वेगळेच होते. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रूग्णालयात शरिराला लावतात तशा लहान लहान वायर जोडल्या होत्या. ‘‘यांच्या माध्यमातून त्या कलाकराच्या केवळ हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. याला मोशन कॅप्चरींग म्हणतात.’’ सूरज माहिती पुरवत होता. ‘‘यामध्ये अॅनिमेशनचाही भाग असतो. या मोशन्स त्या कलाकारासाठी तयार करण्यात आलेल्या एका ग्राफिकल मॉडेलमध्ये टाकल्या जातात. मग ते मॉडेल थेट त्या कलाकाराप्रमाणे हालचाली करू लागतं. त्या मॉडेलवर इतर संस्कार करून त्याला एक चेहरा दिला जातो. अवतारमधली सगळी नावी जमात अशीच तयार झालीय.’’ मोशन कॅप्चरींग, कम्पोझीटींग, मॅच मूव्हींग, रोटोस्कोपी, लायटींग, मॉडेलिंग. अशा अनेक पद्धतींबद्दल तो बरंच काही सांगत राहिला. मी पहात होतो. चित्रपटातल्या एक दृष्यात ते दोघे उंच झाडाच्या जाडजूड फांद्यांवरून उड्या मारत चाललेले असतात. पण प्रत्यक्षात ते एका स्टुडीओमध्ये तयार केलेल्या लाकडी रस्त्यांवरून उड्या मारत होते. ‘‘हे शूट झाल्यानंतर त्याच्या मागे ती झाडं वगैरे तयार करण्यात आली. त्यातला एवढासाही भाग खरा नाही. सगळं काही बनवण्यात आलंय.’’ हे सगळं निदान माझ्यासाठी तरी अकल्पित होतं. स्पेशल इफेक्ट काय असतात, हे समजण्यापुरतं जुजबी ज्ञान मला होतं. पण हे काहीतरी अचाटच वाटलं. चित्रपट क्षेत्रात शिरकावं करणारा हा एका नवाच घटक होता. नसलेल्या गोष्टी खऱ्याखुऱ्या आहेत असा विश्वास बसावा इतकं ते सगळं बेमालुम होतं. तसं पहायला गेलं तर स्पेशल इफेक्टस्मध्येही हेच असतं की. मोठमोठे बॉम्बस्फोट, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्का, एलियन्स अटॅक किंवा सुपरहिरोंचे चित्रपट. या सगळ्यांमध्ये भरगच्च स्पेशल इफेक्टस् असतात. पण ते पहाताना ‘हे स्पेशल इफेक्ट आहेत’ हे माहित असतं. तसं इथं घडलं नाही. पडद्यावर दिसणारं सगळं खरं आहे असं मनानं चटकन मान्य केलं होतं. हे थोडं गंभीर वाटलं. मी पाहिलेल्या काही सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये भविष्यातील जगात येऊ शकणाऱ्या कृत्रिमतेचे चित्रण पहिले आहे. अवतारनं निर्माण केलेल्या त्या जगातून मला ही कृत्रिमता चित्रपट क्षेत्रापुरती का होईना, पण येऊ घातल्याचा भास झाला. एकेकाळी चित्रपट केवळ स्टुडिओमध्ये चित्रीत केला जात असे. बाजार, बगिचे, रस्ते वगैरेंचे सेट उभारून चित्रीकरण पार पडत असे. त्यानंतर चित्रपट स्टुडिओबाहेर बाहेर आला. चित्रपटाला वास्तवाचा जास्तीत जास्त स्पर्श व्हावा या हेतूनं (मग ते केवळ चित्रीकरणाच्या पातळीवर का असेना) चित्रपटकर्त्यांकडून प्रयत्न होऊ लागला. मात्र गेल्या दशकभराच्या काळामध्ये चित्रपट अधिकाधिक वास्तव (केवळ प्रसंगांच्या बाबतीत हा!) करण्याच्या नादात कृत्रिमतेचा आधार घेण्याकडे कल वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणजे आता तयार केले जाणारे चित्रपट हे तंत्रबंबाळ होऊ लागले आहेत. चित्रपटाची कथा आणि पर्यायाने तिचा परिणामही तंत्राच्या भडीमारात गुदमरू लागलाय. सूरज नेहमीच माझ्याशी इफेक्ट, ते तयार करण्याची पद्धत, अमुक एका चित्रपटात केलेलं मॉडेलिंग, नवीन आलेले थ्री-डी चित्रपट वगैरेंवर गप्पा मारत रहातो. त्याच्या सहवासाने मलाही त्यातल्या बाबींची माहिती होऊ लागली आहे. त्याच्या क्लासमधली मुलं घरी येत असतात. त्यांच्या गप्पा कानावर पडतात. ही सगळी मुलं त्या तंत्रानं भारून गेल्यासारखी वाटतात. आता तो त्यांच्या शिकण्याचा भाग आहे म्हणून त्याच्याशी जवळीक साधणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. पण त्यांच्या बोलण्यामध्ये तंत्रानंतर कोणतेच विषय नसतात. ही झाली त्या क्षेत्राशी संबंधीत असलेली माणसं. इतरांचं त्याहून वेगळं नाही. हे तंत्र आता सगळ्यांनाच आवडू लागलंय. थ्रीडी किंवा इतर स्पेशल इफेक्टस् हे आजच्या प्रेक्षकाला आकर्षित करण्याचं काम करतायत. या नवनव्या तंत्रासाठी चित्रपट पाहिले जातायत. पण चित्रपटांसाठी ही चिंतेची बाब आहे. चित्रपट माध्यम हे स्वत:च एक तंत्र असल्यामुळे त्यात तांत्रिक अंगानं बदल होणारच. पण यानंतरही तो चित्रपट आहे याचा विसर पडू न देणं महत्त्वाचं ठरतं. त्यातल्या चित्रांमधून मांडली जाणारी कथा, तिचा आशय, दिग्दर्शक-लेखक आणि तंत्रंज्ञांचादेखील दृष्टीकोन, त्यातून चर्चील्या जाणाऱ्या गोष्टी हे सगळंच चित्रपटाला परिपूर्ण करत जातं. त्यातली दृष्यभाषा तर फार महत्त्वाची. ही भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी, एखादा आवश्यक परिणाम साधण्यासाठी तंत्राचा वापर नक्की करण्यात यावा. पण घडतंय उलटं. आज चित्रपट अर्थपूर्ण नव्हे तर देखणे, थरारक, रोमांचक अन् लोकप्रिय करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जात आहे. वापर नव्हे भडिमार केला जातोय. त्यामुळे तंत्रज्ञान हे काहीतरी घडवण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट न रहाता चित्रपटाची कथा, आशय, इत्यादींच्या रांगेत जाऊन बसलंय. प्रेक्षकांचाही तोच समज झालाय. आज अवतारचे इफेक्टस्, टॉय स्टोरी-आईस एजमधील थ्रीडी टेक्नॉलॉजी, या अॅनिमेशनपटांतील मॉडेल यांची चर्चा होते. अर्थात ती व्हावी. त्या गैर काहीच नाही. पण त्याबरोबरीने आशय आणि अर्थपातळीवर मूल्यात्मकता या संबंधानेही चित्रपटाचा विचार होणे आवश्यक ठरते. ती घडताना कुठेच दिसत नाही. म्हणजे अवतारच्या इफेक्टबद्दल बोलणारी अनेक माणसं मी प्रत्यक्षात आणि माध्यमांमध्येही पाहिली. मात्र कोणत्याही ठिकाणी त्या चित्रपटाची मूळ संकल्पना चर्चीली गेलेली मला आढळली नाही. चित्रपट आणि पर्यायानं प्रेक्षकांवर होणाऱ्या तंत्राच्या भडीमारात चित्रपटातले कलागुण, त्यातून मांडला जाणारा आशय या महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी दुय्यम स्थानावर ढकलल्या जात आहेत. बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड, कोणत्याही प्रदेशातील चित्रपट पहा. हे सगळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाटतात. हॉलिवूडमध्ये केला जाणारा तंत्राचा वापर तर विस्मयचकित करणारा आहे. त्या तुलनेत भारतीय चित्रपटांमध्ये तंत्राचा त्या सफाईने वापर केला जात नसला तरीही हे सगळे चित्रपट अत्यंत चकचकीत असतात. रजनिकांतचा रोबोट, लव्ह स्टोरी 2050, क्रिश, यांसारख्या कित्येक चित्रपटांसाठी परदेशातून तंत्रज्ञ मागवण्यात आलेले आपण पाहिले. या गोष्टींची बेसुमार चर्चा वर्तमानपत्रं, वाहिन्या, मुख्यत्वेकरून चित्रपटांशी संबंधीत वाहिन्यांवर केली जाते. चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या तंत्रांचा गवगवा होतो, मात्र चित्रपटांमधून काय दिलं जातंय हे दुर्लक्षीतच रहातंय. अर्थात ही काही आज घडणारी गोष्ट नाही. अमिताभच्या तारूण्यात त्याने केलेले चित्रपटही असेच होते. त्यांचा भर मनोरंजनावर होता. या चित्रपटांतून त्याची इमेज लार्जर दॅन लाईफ झाली आणि कथावस्तू दुय्यम होत गेली. प्रेक्षक त्याला पहायला चित्रपटगृहात यायचे. आज अमिताभची जागा तंत्राने घेतली एवढंच. रोबोट या चित्रपटात मांडण्यात आलेली संकल्पना म्हणजे ‘यंत्रमानवाला भावना बहाल केल्या आणि तो तुमच्यावर प्रेम करू लागला तर मग काय?’ या संकल्पनेवर 2001 साली स्टीव्हन स्पीलबर्गने ‘आर्टीफिशल इंटेलिजन्स’ हा चित्रपट तयार केला होता. या संकल्पनेवर चर्चा करण्यास तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. हे ‘रोबोट’ संदर्भात घडलं नाही. कारण तो पूर्णपणे मनोरंजनमूल्यांवर आधारित होता. हीच बाब लव्ह स्टोरी 2050 ची. वर्तमानकाळात आपलं प्रेम हरवलेली एक व्यक्ती त्या प्रेमाच्या शोधार्थ भविष्यकाळात जाऊन पोहोचते हा चित्रपटाचा विषय. भविष्यामध्ये जेव्हा तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली असेल, त्याचा मानवावर, त्याच्या जाणिवा आणि भावनांवर तेवढाच मोठा परिणाम होत असेल, अशा काळात त्याच्या प्रेमाच्या व्याख्या कशा असतील? त्याच्या भावना बदललेल्या असतीरल का? तो प्रेमाला कोणत्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल? अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पडताळून पाहता आल्या असत्या. प्रत्यक्षात झालं नेहमीसारखंच. हा चित्रपटही भविष्यातलं भौतिक जग दाखवण्यापुरताच मर्यादीत राहिला. विज्ञानकथेच्या अंगानं जाणारे हे चित्रपट एक फॅन्टसी स्टोरी बनून राहिले. त्यांच्यावर अखेरपर्यंत दिसून आला तो केवळ तंत्राचा प्रभाव. इथं पुढारलेलं तंत्र आणि मागासलेले विचार असं व्यस्त प्रमाण दिसतं. तंत्र वापरलं जाऊ नये असं म्हणणं नाही. उलट तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेले काही चांगले चित्रपटही उदाहरणादाखल सांगता येतील. 1997 साली आलेला ‘कॉन्टॅक्ट’ हा एलियन्स संपर्कावर आधारित चित्रपट अत्यंत माफक इफेक्टचा वापर करून देव, माणूस अन् श्रद्धा यांवर भाष्य करतो. त्याउलट 2000 साली आलेल्या वाचोस्की बंधूंच्या ‘मेट्रीक्स’ या चित्रपटात अनेक स्पेशल इफेक्टचा भरणा होता. मात्र तो कुठेच चित्रपटावर कुरघोडी करत नव्हता. अवतारमध्येही बऱ्याच प्रमाणात तंत्रामधून आवश्यक परिणाम साधण्यात आला आहे. (पण अवतारची ही तंत्रं एवढी लोभस आणि आकर्षक आहेत की प्रेक्षक चित्रपटाचा अर्थ लावण्यापेक्षा त्यांच्या देखणेपणातच गुंतून पडतो) बदलत्या काळानुसार तंत्र पुढे येणारंच. पण ते चित्रपटाच्या पुढं न जाता त्याच्या बरोबरीनं वापरलं जाणं गरजेचं आहे. अन्यथा सध्या ज्या प्रमाणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे थ्रीडीपट केवळ ‘थ्रीडी इफेक्टस्’साठी पाहिले जातात, तसे उद्या बहुतांश चित्रपट हे केवळ त्यांच्यात वापरण्यात आलेल्या मनमोहक तंत्रासाठी पाहिले जातील. |

No comments:
Post a Comment