Thursday, October 6, 2022

कोरडा

तुझ्या न झाल्या भेटीची वर्णनं
माझ्या शक्तिहीन गात्रांना आता झेपत नाहीत
तुझ्याशी न केल्या गुजगोष्टींची आवर्तनं
आताशी मनाच्या सांदीकोपऱ्यात पुरत नाहीत

सतारीची तार छेडण्याच्या प्रबळ इच्छेने
मी बोटं नेतो तुझ्या अधरांजवळ
तुझ्या कानशीलांवरुन ओघळणाऱ्या बटेजवळ...
मी तुझ्या पापणीवरुन खाली गालावर हलकेच घसरत
तुझ्या गळ्याजवळच्या घळईपर्यंत येतो
स्तनांच्या अरुंद वाटेनं नाभीतल्या डोहापर्यंत पोचतो
नेहमीप्रमाणे... तो डोह दुर्लक्षित करुन
मी पलिकडच्या वाटेने पुढे सरकतो

मागे पडलेल्या त्या डोहात उतरायचं सोडून
आतल्या जिवंत रसरशीत प्रकाशात पोहायचं सोडून
तिथल्या आसमंतातली उमटणारी स्पंदनांची कंपनं अनुभायची सोडून
मी कोरडाठार दरीत उतरत जातो
अॅडव्हेंचर असतं ते माझ्यासाठी
हस्तमैथुनासारखं

मी तिथून स्तनांपर्यंत झेप घेऊन
तुझ्या अधरांशी मैफल रंगवण्याच्या वाटाघाटी करत राहतो
अंगप्रत्यंगाला भूल पडलेली असली तरी मला धून गवसत नाही
आणि तू मात्र स्तनभूमीत खोल गाडलेली कुठलीशी सुरावट
अस्पर्शीत राहिल्याची खंत करत मूक पडून असतेस...

जलप्रवाहाच्या काठावर आयुष्य कंठणारे
आम्ही तहानलेले अभागी
संगीत कसं ऐकावं
हे आम्हाला कधी कुणी शिकवलंच नाही

No comments:

Post a Comment