Thursday, November 24, 2011

नातं

शिवाजीपार्कच्‍या कट्ट्यावर तो एकटाच बसला होता. छान संध्‍याकाळ रंगून आली होती. त्‍याला आवडणारा पिवळसर प्रकाश पसरला होता. कितीतरी जोडपी, मित्रमैत्रीणींचे घोळके त्‍याच्‍या आजूबाजूला होते. मस्‍त गलका होता आजूबाजूला. आणि तो गप्‍प.
जवळपास अर्धा तास झाला असेल. तो तिथेच बसून होता. विचार करत. मध्‍येच स्‍वतःशी बडबडायचा. मग त्‍याला सभोवतालचं भान यायचं आणि मग पुन्‍हा गप्‍प बसायचा. स्‍वतःशी बोलताना तो नुसता बडबडायचा असं नाही. तो हातवारे करायचा, त्‍याच्‍या चेह-यावर संभाषणातले भाव यायचे. जणू काही समोर बसलेल्‍या ख-याखु-या व्‍यक्‍तीशीच बोलतोय जणू. दुस-या कुणी पाहिलं तर मानसिक रोगीच वाटला असता तो. पण तो तसा नव्‍हता. चारचौघांसारखाच तो सामान्‍य मुलगा होता.
ब-याचदा तो कुणा मुलीसोबत दिसायचा तिथे. त्‍यांचं छान संभाषण चालायचं. तिच्‍या सहवासात तो फुलून यायचा, त्‍याच्‍या सहवासात ती रंगलेली असायची. त्‍यांना कधी हातात हात घातलेलं किंवा खांद्यावर हात टाकून चाललेलं कुणी पाहिलं नाही. पण ते एकत्र असायचे तेव्‍हा त्‍यांच्‍या डोळ्यात परस्‍परांबद्दल खूप आपुलकी, प्रेम असायचं. कधी पार्कात, कधी शिवाजीमंदीरच्‍या फुटपाथवर, कधी कुठे चहाच्‍या टपरीवर, एखाद्या हॉटेलात, नाही तर दादर स्‍टेशनच्‍या फलाटावर उभं राहून ते कितीतरी वेळ गप्‍पा छाटायचे.
गप्‍पांना कोणताही विषय पुरायचा त्‍यांना. साहित्‍य, चित्रपट, सामाजिक घडामोडी, घरगुती गोष्‍टी, नातेसंबंधांवर चर्चा, असं बरंच काहीसं असायचं त्‍यांच्‍या बोलण्‍यात. आणि या सगळ्यात त्‍यांच्‍या मनातल्‍या चोरकप्‍प्‍यात बंद असलेलं आपसुक वर यायचं. मग ते शेअर व्‍हायचं. समजून घेतलं जायचं. चर्चीलं जायचं. कधी भांडणंही व्‍हायची. पण भांडणाचा स्‍वर कानापर्यंत पोचून मागे फिरायचा. त्‍याने कधी मनात उतरण्‍याचा प्रयत्‍नही केला नाही.
कधी ती डिस्‍टर्ब असायची. मग तो तिला बोलावून घ्‍यायचा. कधी त्‍याला कसनुसं वाटत असायचं. मग ती त्‍याला भेटायला बोलवायची. दोघेही यायचे. त्‍यांच्‍या मनात परस्‍परांबद्दल जेवढी माया होती तेवढाच आदरही होता. शिवाजीमंदिर आणि पार्काच्‍या सान्‍नीध्‍यात कितीतरी सांजरंग पाहिले होते त्‍यांनी. तिथंच त्‍यांचं नातं बहरलं. घट्ट झालं. माणसं देवळात जायची आणि तो तिला भेटायचा. ती माणसांपासून चार हात लांब रहायची आणि त्‍याची वाट पहात तिथं उभी रहायची. दोघांनाही परस्‍परांचे विचार ठाउक होते. कल्‍पना ठाउक होत्‍या. मर्यादांसोबत विस्‍तार ठाउक होते. एवढं, की दोघांना परस्‍परांच्‍या मनातलं न सांगता कळायचं. अतिशयोक्‍ती नाही, खरंच कळायचं. आपल्‍याला जाणणारं याजगात नक्‍की कोण आहे हे दोघांनाही माहित होतं. तोच त्‍यांचा आनंद होता...
... पण आज त्‍याच्‍या चेह-यावर तो आनंद दिसत नव्‍हता. तो तिची वाटही पहात नव्‍हता. कट्ट्यावरून उठून तो चौपाटीकडे चालू लागला. त्‍याची नजर उगाच कुठेतरी गुंतलेली होती. रस्‍ता ओलांडून तो किना-यावरच्‍या बागेत आला. तिथल्‍या भिंतीजवळ जाउन तो उभा राहिला.
मंद वारा सुटला होता. समोर पहुडलेला समुद्र खूप शांत वाटत होता. किती खोल होता तो कुणास ठाउक. किती घडामोडी घडत असतील ना त्‍याच्‍या अंतरंगात? पण तरीही वरून अगदी गंभीर वाटत होता. पलिकडे असलेली सूर्यही तसाच सकाळी किती प्रखर होता. आता डोळे भरून पाहता येतंय त्‍याच्‍याकडे. पण आता तो वेगानं अस्‍ताला चालला होता. तो सूर्याकडे बघत राहिला नुसता. त्‍याला अशावेळी आकाशातले रंग खूप आवडायचे. कदाचित कधीतरी न बोलता जवळ बसून त्‍यांनीही सूर्यास्‍त पाहिला असावा. कुणास ठाउक पण, आज त्‍याला सूर्य खूप जवळचा वाटला. अगदी त्‍याच्‍यासारखा. थोडा निस्‍तेज. अंधाराच्‍या कुशीत गडप होण्‍यास उत्‍सुक असा.
काही वेळातच अंधार पडला. त्‍याची पावलं माघारी फिरली. शांतपणे. खरंच शांत होता. त्‍याच्‍या मनात रोष नव्‍हता, असुया नव्‍हती, तिच्‍या आयुष्‍यात दुसरं कुणी आल्‍याची सलंही नव्‍हती. त्‍यांचं नातं खरंच तेवढं प्रगल्‍भ होतं. पण तरीही त्‍याचं मनं घडल्‍या घटनांचं कारण शोधत होतं. तिचं जाणं सहज नव्‍हतं. त्‍यात खूप अवघडलेपण होतं. समोरासमोर आल्‍यानंतर जे ओठ तासनतास बोलत रहायचे ते आता शब्‍दांना थोपवू पहात होते. ज्‍या डोळ्यांनी परस्‍परांचा आनंद पाहिला ते आता प्रयत्‍नपूर्वक दुसरीकडे गुंतू पहात होते आणि हे सगळं त्‍याला सहन होतं नव्‍हतं. नातं तुटलं नव्‍हतं, पण त्‍याचा प्रवाह आटला होता. पाणी वाहून गेलं होतं, पण तिथे न दिसणारे ओघळ त्‍याच्‍या नजरेत खुपत होते. म्‍हणून त्‍याला उत्‍तर हवं होतं.
अचानक वाट्याला आलेली ही शांतता त्‍याच्‍या अंगावर येत होती.
ती त्‍याला कंटाळली होती का? तर नाही.
तिला तो आवडत नव्‍हता का? असंही नाही.
तिच्‍या एकाएकी जाण्‍याचं त्‍याला आता एकचं उत्‍तर समोर दिसत होतं.
त्‍याच्‍या जीवनातली तिची भूमिका संपली होती. ती त्‍याच्‍या आयुष्‍यातून कदाचित दूर जाणार नाही, पण आधी होती तशीही राहणार नाही. ती असेल, पण थोड्या बदललेल्‍या रूपात. कुठल्‍यातरी वेगळ्या जागी. कारण आधीची जागा त्‍या आधीच्‍या 'तिने' व्‍यापलेली होती. आणि राहील. नाती संपत नाहीत, तुटत नाहीत, ती बदलतात. त्‍याच्‍या मनाच्‍या जवळ असलेलं हे नातं बदललं. याची सवय होईपर्यंत, मनानं ते नीट मान्‍य करेपर्यंत त्‍याचा थोडा त्रास होईल त्‍याला. जुन्‍या चित्रांमधले रंग आठवतीलही. पण नंतर घेईल जुळवून तो. घ्‍यावंच लागेल त्‍याला.
तो आत्‍ममग्‍नतेने चालला होता. समुद्र अजूनही शांत होता. पार्कातला गजबजाट कमी होउ लागला होता. अंधार पसरत होता. मावळलेला सूर्य उद्याच्‍या सूर्योदयाच्‍या तयारीला लागला असेल, बस... ही रात्र तेवढी सरावी...

No comments:

Post a Comment