Sunday, September 25, 2011

कधी कधी...

बगळ्यांची जोडी नजरेसमोरून जाताना
डोळ्यातलं पाणी हळूच थरारलं होतं
त्‍यात पडलेलं त्‍यांचं प्रतिबिंब
गालावरून ओघळतं कधी कधी

वा-याच्‍या बदललेल्‍या दिशा 
आता सवयीच्‍या झाल्‍यात मला
त्‍याचं मला अनुकूल होणंच
अस्‍वस्‍थ करतं कधी कधी 

कानांवर आदळणारी आतली शांतता
कान दडपून टाकते माझे 
मग बाहेरचा हा कोलाहलही
हवाहवासा वाटतो कधी कधी 

स्‍पंदनांची धगही आता 
मंदावल्‍यासारखी भासते
ही चेतनाही शरिराबाहेर
डोकावून पाहते कधी कधी 

कड्यावरून पहावा
तो सूर्य मावळताना 
त्‍या रंगात विरघळण्‍यासाठी 
तोल हा जावा कधी कधी 

पैलतीरीच्‍या प्रदेशात तरी
नको पाऊलखुणा त्‍या एकट्या 
त्‍यांनाही सोबत व्‍हावी
कुणा पावलांची कधी कधी... 

3 comments:

  1. कानांवर आदळणारी आतली शांतता
    कान दडपून टाकते माझे
    मग बाहेरचा हा कोलाहलही
    हवाहवासा वाटतो कधी कधी

    हे सगळ्यात सुंदर आहे.

    ReplyDelete
  2. शितल आणि हिना, दोघींचे आभार.

    ReplyDelete