Thursday, January 13, 2011

अस्वस्थ मी...

            प्रत्येक मुंबईकराप्रमाणे मीसुद्धा रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत मी रोज फलाटावर पोहोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. इतरांसारखं हे सगळं माझ्याही अंगवळणी पडलंय. गेली १० वर्ष मी ट्रेनचा प्रवास करतोय, पण आज मला आतमध्ये कुठेतरी एक वेगळीच अस्वस्थतेची भावना अनुभवला येतेय़ माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेलेला हा प्रवास करताना मी कुठेतरी बिचकतोय़ हा प्रवास मला नकोसा वाटू लागलाय़ विचित्र गोष्ट म्हणजे हि अस्वस्थता या रोजच्या प्रवासातूनच निर्माण होतेय.

          माझं ऑफिस चिंचपोकळीला आहे. मी रोज जोगेश्वरीवरून दादरपर्यंत ट्रेनने येतो. मग मध्य रेल्वेवरून गाडी बदलतो आणि चिंचपोकळीला उतरतो. हाच प्रवास जाताना उलट होतो. मुंबईतल्या माणसाला गर्दी नवीन नाही. पण तरीही रात्री कामावरून परतताना हा प्रवास मन काहीसं अस्थिर करून जातो. चिंचपोकळीवरून गाडी पकडल्यानंतर जेव्हा मी दादरला उतरतो तेव्हाच दृश्य या अस्वस्थतेत आणखीनच भर घालतं.
          दादरचा फलाट क्रमांक १ रुंदीने कमी आहे. गाडी जेव्हा फलाटावर येते तेव्हा फलाट ओसंडून वाहणारी, गाडीत चढण्याच्या प्रचंड ईर्ष्येने उभी असलेली गर्दी नजरेस पडते. छाती दडपून टाकणारी गर्दी! गाडी फलाटावर येत असताना माणस एवढ्या जवळ उभी असतात कि एखाद्या वेळेस कुणीतरी गाडीखाली येईल कि काय याची भीती वाटते. त्या क्षणी एवढी गर्दी तिथे मावते तरी कशी हा प्रश्न प्रत्येकाला पडावा अशी ती स्थिती असते. ही गर्दी केवळ फलाटावर नसते. फलाट संपून जिथे जिना सुरु होतो तिथे संपूर्ण जिन्यावर दोन्ही बाजूला गाडीची वाट पाहत उलटी रांग उभी असते. त्यामुळे मधोमध थोडी जागा उरलेली असते ज्यामधून नुकतीच उतरलेली माणसे वर जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण समोरूनही फलाटावर येणारी नवी माणस असतातच. त्यामुळे खाली येण्यासाठी आणि वर जाण्यासाठी एका जबरदस्त स्पर्धा चाललेली असते. हा प्रत्येक मुंबईकराचा आणि मुंबईबाहेरून येणाऱ्या अनेक माणसांचा दिनक्रम आहे. सगळ्यांसाठी ही ‘नेहमीची’ गोष्ट आहे़ पण या स्पर्धेला येऊ पाहणारं किंवा आलेलं अमानुष रूप मला अस्वस्थ करतं.
              गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाला गाडीतून बाहेर पडायची घाई आणि चढणाऱ्या प्रत्येकाला गाडीत शिरण्याची घाई असते. उतरणाऱ्या लोकांपेक्षा चढणारे नेहमीच जास्त आक्रमक असतात. मग त्यांना काहीही करून क्षणभरासाठी रोखता यावं यासाठी उतरणारे गाडी थांबण्यापुर्वीपासून जोरजोरात ओरडत, किंचाळत बाहेर पडतात. अशा आरोळ्या देत गाडीतून काही माणस उतरली कि बाहेरची गर्दी घिसाडघाई करत आत शिरू लागते. मग उतरणाऱ्या लोकांमध्ये जे शेवटी असतात त्यांच्या नशिबी संघर्ष येतो. त्यांच्यातही एखादा अंगाने दुबळा असेल तर मग तो पुढच्या स्टेशनला गेलाच म्हणून समजावा. गर्दीने भरलेला फलाट आणि दंगल उसळावी तसा सुरु असलेला गोंधळ अंगावर काटा आणतो. हे चित्र पाहिलं कि 'हीच का आमची व्यवस्था?' असा विचार मनात येतो. या गदारोळात अनेकदा माणस पडतात, धडपडतात, हमरीतुमरीचे प्रसंग येतात, मारामाऱ्या होतात. पण ट्रेनमध्ये हे असं घडणार, हे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं आहे. प्रवास व्यवस्थीत व्हावा म्हणून ही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. पण तो तसा होत नाहीये.
          हा सगळा गोंधळ माझ्या अंगावर येतो़ त्या सगळ्या झगडणाऱ्या शरीरांना माणूस म्हणावं का? हा प्रश्न मनात यावा इतपत ती परिस्थिती मला भयावह वाटते़. मी जी परिस्थिती पाहतो त्यात मला जगणं कमी आणि ओरबाडण्याचा, जनावरांसारखा भांडण्याचा प्रकार जास्त दिसतो. माणूसपणाच्या कुठल्याच व्याख्येत हे बसवता येत नाही़ ‘हे नेहमीचं आहे’ आणि ‘मुंबईत गर्दी असतेच’ अशी वाक्य उच्चारून मला मला ही अस्वस्थता दूर झटकायची नाही़ हे माझ्यासोबत घडतंय, माझ्या शहरासोबत घडतंय, इथल्या माणसांसोबत घडतंय, हे वास्तव आहे.
          हे सगळं माणसांवर वाईट परिणाम करतंय. पण सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घडत असून कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही. आता हा विरोधाभास पहा! प्रदूषण, अन्नधान्यातील भेसळ, सिगारेट-गुटखा या गोष्टी आरोग्यावर वाईट परिणाम करतात म्हणून त्यांच्याविरुद्ध ओरड होते, मोहिमा काढल्या जातात. पण इथं शरिराची हेळसांड होत असताना, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतानाही याकडे कुणाचाच लक्ष जात नाही. त्रास होणं हा एक मुद्दा झाला़ पण त्याहूनही एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ‘मना’ संदर्भात होणारा परिणाम! प्रत्येक माणसाच्या आत क्रौर्य दडलेलं असतं. ती त्याची आदिम भावनाच आहे. हे क्रौर्य आणीबाणीच्या प्रसंगी वर येतं. का येतं? याचं साधं कारण म्हणजे, माणसाला जेव्हा असुरक्षीतता निर्माण होते, तेव्हा तो स्वत:च्याच रक्षणासाठी पेटून उठतो़ हे सगळं मानसिक पातळीवर घडतं. वरवर पाहता तो रागावलेला माणूस दिसत असेल, पण प्रत्यक्षात तो मनातून घाबरलेला असतो. त्याची असुरक्षीतता याला कारणीभूत ठरत असते़ आता या प्रकारे माणसातलं क्रौर्य उफाळून वर येणं ही क्वचित घडणारी घटना असावी, असं मला वाटायचं. पण हे असे 'आणीबाणीचे प्रसंग' दादर, कुर्ला, ठाणे, अंधेरी अशा अनेक स्थानकांवर दररोज येतात आणि या क्रौर्याच्या वेगवेगळ्या कमी-अधिक स्वरूपांचं दर्शन मला होतं. मलाच काय, इतरांनाही होत असणार. या प्रवासात इतरत्र पाहताना माणसं ज्या पद्धतीने   वागतात, ते पाहिलं की मला माणसातलं हे क्रौर्य खरोखरच वर आल्यासारखं भासत. इतरांच्या लेखी 'क्रौर्य' हा शब्द चुकीचा असेल, पण इथं माणस ज्या पद्धतीने आक्रमक होतात, त्यात मला त्या क्रौर्याचा अंश दिसतो.
          मग मी कधी कधी विचार करतो, कि जेवढा वेळ मी ट्रेनमधून प्रवास करतोय तोपर्यंत 'मी माणूस आहे' ही गोष्ट जाणीवपूर्वक विसरून जावी. कारण इतर बहुतेकजण ते विसरलेले असतात. असं दररोज स्वत:च्या माणूसपणाचा विसर पडण्याचं अनेकांच्या अंगवळणी पडलंय. माणसं काही वेळासाठी आपले संस्कार, भावभावना, इतरांना समजून घेण्याची वृत्ती, समंजसपणा साºया गोष्टी विसरून जातात आणि ही बाब कुणालाच, खुद्द त्यांनाही गंभीर वाटत नाही. आपला हा प्रवास आपल्यावर काहीतरी वेगळा परिणाम घडवून आणतोय हे कुणाच्याच लक्षात येत नाही़ असं कसं? का मीच या गोष्टींचा कीस काढत बसलोय? तरी मी त्यांना दोष देत नाही. तो त्यांचा नाईलाज असतो. प्रचंड वाढलेली लोकसंख्या आणि तिच्या भाराने प्रवासी व्यवस्थेचा उडालेला बोजवारा ही यामागची (यापेक्षा नक्कीच अधिक) कारण असली तरी या सगळ्यामुळे माणसांवर आणि त्यांच्या मनांवर जो वाईट परिणाम होतोय तो मला अधिक भयावह वाटतो.
          ट्रेनच्या त्या गर्दीत शरीर अक्षरश: चुरगळून जातं. हातापायांना रक्तपुरवठा होऊ नये इतपत शरीर अवघडून जातं. शरीराचे हाल होतात ते होतातच, पण त्याचसोबत मनावर ताण येतो तो वेगळाच. पुढच्या स्टेशनला किती गर्दी मिळेल? उतरायला जमेल कि नाही? उतरल्यावर पुढच्या ट्रेनला किती गर्दी असेल? तिथे चढायला जागा असेल का? विचारांची ही मालिका मन अस्थिर करत जातं. स्टेशन जवळ आलं कि उतरण्याच्या विचाराने माणूस अधिकाधिक आक्रमक होत जातो.
          हे विचार अगदी अशा स्पष्ट स्वरूपातच मनात येतात असं नाही, पण हि प्रक्रिया व्यक्तीच्या नकळत मनाच्या अनेक स्तरांखाली घडत असते. ही सगळी परिस्थिती शरीर आणि मनावर हळूहळू एक प्रभावी असा गहिरा परिणाम करत चाललीय. हा परिणाम अत्यंत संथगतीने होत असल्यामुळे तो लक्षात येत नाही. पण त्याची परिणीती मनाच्या वाढत्या अस्थिरतेमध्ये होत चाललीय. ही अस्थितरता प्रवासापुरती मर्यादीत नाही़ ती त्याच्या व्यक्तीगत जिवनापर्यंत पोहोचते़ कारण हा ताण इच्छीत स्थानकावर उतरलं कि नाहीसा होईल, अशातला भाग नाही़ त्याचा थोडा अंश मनात कुठं न कुठं शिल्लक राहतो. माणसं हा ताण स्वत:सोबत वागवत नेतात. आपल्या घरी. कामाच्या ठिकाणी. त्याचे परिणाम काय होतात हे मला ठावूक नाही. पण होत असणार एवढं नक्की!
          या सगळ्या वातावरणा सान्निध्यात येणाऱ्या मनांवर दाब पडतोय. कोणताही दाब हा नव्या आकारांना जन्म देतो. या ताणापायी मनांच्या रचना बदलू लागल्या असल्याचं कधीतरी जाणवतं. ही बाब अनुभवालाही येते.
          ट्रेनमधून प्रवास करत असताना पावलो पावली या ताणापायी उद्भवलेल्या फुकाच्या आक्रमकतेला तोंड द्यावं लागतं. दरवाजावर, दोन सीटमधल्या जागेत किंवा इतर कुठेही उभं असताना प्रत्येकाला आपली जागा जाण्याची आणि मिळालेली जागा टिकवण्याची भीती वाटत असते. येणारा प्रत्येकजण जास्त आक्रमक असेल या भावनेतून ती व्यक्ती आधीच आक्रमकतेचा बुरखा पांघरून घेते. मग चुकून लागलेला लहानसा धक्काही भांडण सुरु करायला पुरेसा ठरतो. ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू भासतात. भांडणाऱ्यापैकी बसलेला उतरला की उभा असलेला बसतो. झाली भूमिकांची अदलाबदल. हे चक्र पुढे सुरूच राहत.
          या अगदी लहान घटना वाटतात. पण त्या घडण्याच कारण गंभीर आहे. मला वाटत, की एखाद्या माणसाला हत्या करण्यासाठी उद्युक्त करणं जेवढ गंभीर आहे, तेवढंच व्यक्तीला या प्रकारे विचार करण्यास आणि वागण्यास उद्युक्त करणंही गंभीर आहे. मी एकदा कुठतरी वाचलं होतं. ‘गर्दीला मन नसतं’. ही गोष्ट या प्रवासात तंतोतंत अनुभवला येते. त्या प्रवासातल्या या घडामोडी पाहिल्या की या गर्दीतल्या अनेक व्यक्तींचे मन आणि संवेदना त्या वेळेपुरत्या हरवलेल्या असल्याचं जाणवतं. एक व्यवस्था काही काळासाठी का होईना पण माणसाच्या 'माणूसपणावरच ' थेट आघात करतेय, ही गोष्ट खरोखर वाईट आहे.
          माझंही अनेकदा लहानसहान कारणांवरून ट्रेनमध्ये भांडण झालेलं आहे. पण भांडण झाल्यावर मन प्रदूषित झाल्यासारखं वाटायचं. त्या क्षणी कुणाशीतरी भांडताना योग्य काय, अयोग्य काय, याचा विसर पडायचा. आपण आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय असं उगाचच मनाला वाटत रहात. पण नंतर झाल्या गोष्टींचा विचार केला कि 'काय वेडेपणा होता' असं वाटायचं. त्या वेळी झालेली मनाची ती अवस्था नकोशी वाटायची. या सगळ्यातून माझ्या मनावर पडत असलेला ताण, माझी होत असलेली विचित्र अवस्था मला लक्षात आली. मला प्रथमच माझ्या मनाची चिंता वाटू लागली. मग यापासून प्रकर्षाने दूर राहायचं ठरवलं. आता ट्रेनमध्ये काहीही झालं तरी मी कुणाशीच भांडण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्याला पुढं जायचं त्याला जाऊ देतो, जो धक्का मारू पाहतो त्यापासून दूर जातो. पण मी कितपत यापासून स्वत:ला अलिप्त ठेऊ शकणार? शेवटी तो तात्पुरता का होईना, एक प्रवाह आहे. त्याच्याजवळ येणारा माणूस प्रवाहाबरोबर जाणारच.
          दादरला उतरायचा नेहमीच गोंधळ असतो. म्हणून मी नेहमी चिंचपोकळी ते दादरपर्यंत दरवाजावर उभं राहाण पसंत करतो. एक दिवस माझ्या मागे एक मुलगा उभा होता. कॉलेजमध्ये जाणारा असावा. उतरणारी माणसं सहसा पुढच्या माणसाला प्रश्न करतात, ''उतरणार ना?'' त्याने मला प्रश्न केला, ''मला उतरायला देणार ना?''
          या गर्दीची, कशाचाच विचार न करणाऱ्या तिच्या त्या जीवघेण्या वेगाची केवढी भीती मनांमध्ये दडलीय याचा मला झटक्यात अनुभव आला. दररोज अवस्थ करणाऱ्या या प्रवासानं त्या दिवशी प्रथमच माझ्यासारख्याच एका अस्वस्थ मनाचं दर्शन घडवलं. कुणास ठाऊक अजून किती मनं अशी अस्वस्थ असतील?

2 comments:

  1. chaan! Ha aswasth karnaara vishay maazyaasarkhyaa badlapur-dadar waalyaancha aahe. 8:53 chukli ki 9:25 paryant waat paha.. aani milaalich train tar ti chaalu asataanach dhaawat jaaun khaambaala pakdun aat shira. nantarchyaa gardila chukvnyaasaathi he dhaadas! karaavach laagat! naahitar thane-ghatkopar paryant ubha raahanyaachi shikshaa tharlelich. Aat shirlyaanantarchi gardi hi aanakhi vegalaa bhaag. He gardi aswasth karnaari aste he khar aahe pan anekda tyaathi khup chaangle anubhav yetaat. chaanglech jaast. baajuchyaa handicap compartmentmadhil to donhi paayaani apang aslela kaala saavla maanus... badlapur platformvar aaplyaa chaakwaalyaa paatavar basun gaadichi waat paahat asato. gaadi aali ki konitari madatila yet. tyaacha chaakwala paat aani tyaala dabyaat chadhawat. Daadarla utarla ki punha tasach. 6 no.chya mothya bridgechya paayaashi aala ki to aapla maandikhaalacha paat haatane kaadhun var dhaklaayla laagto. baghanaaryaan paiki koni tari pudhe yet. to paat uchlun vaparyant neto. aani var paayryaanlagat theun deto. toparyant ha dhadpadat paayryaa chadhat var yeto. rojach drushya he.. kasli madatichi yaachana naahi, madat kelyaacha phukaa mothepanaa naahi aani ugaache dhanywaad naahi. sagal na bolta ekmekaanparyant pohochnaar. Ekdamach kaahi samvedna haravleli naahi ya gardine. aani aapan ti harvu dyaaychi naahi!!! jara jaastach lihilay na?

    ReplyDelete
  2. bar zale khup divasapasun story sapadat navhati movie sathi...story hoti pan OSKAR milawa ashi navhati......pan aata maja to pravas sampala...
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    BIG BROTHER miss you

    ReplyDelete